Enquire Now

Request A Quote

आहे हे असं आहे !

बापरे. केवढा गदारोळ झालाय माझ्या एका वाक्यानं ? काहीशा अनवधानानं लिहून गेलेल्या या विधानानं जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ' चिन्ह ' तर्फे मी अत्यंत मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.

खरं तर आजवर जे काही थोडंबहुत कर्तृत्व मी दाखवू शकलो असेलच  तर त्यात पुण्याचा वाटा खूप मोठा आहे हे  मी  मोकळेपणानं मान्य  करतो. कुमार वयात किंवा तरुण वयात मी जे जे म्हणून काही वाचलं  केसरी ,साधना ,  सोबत , माणूस , जत्रा,  नभोवाणी ,सह्याद्री , राजस , मनोरा , स्त्री , मनोहर , किर्लोस्कर , समाज प्रबोधन पत्रिका अशी न जाणो पुण्यातून प्रसिद्ध होणारी कितीतरी नियतकालिकं असतील ज्यांचा माझ्या जडण घडणीवर फार  मोठा प्रभाव पडला आहे हे मान्य करायलाच हवं. विशेषतः पुण्यातील नाटक , संगीत , साहित्य , चित्रपट तसेच सामाजिक चळवळी या संदर्भात झालेल्या प्रचंड लिखाणानच माझं जगणं समृद्ध केलं आहे असं माझं मत आहे. या संदर्भात मी ' चिन्ह ' च्या अंकात किंवा ' निवडक ' च्या विविध प्रस्तावनात तसेच ग्रंथालीच्या ' रुची ' च्या अंकातील  एका प्रदीर्घ लेखात वेळोवेळी लिहून ठेवलं आहे. फेसबुक वरील लेखात देखील मी अनेकदा ते लिहिलं आहे. दुर्दैवानं चित्रकलेच्या बाबतीत मात्र तसं लिहिणं केवळ अशक्य आहे कारण वर उल्लेखलेल्या क्षेत्रात जे प्रागतिक पाऊल पुण्यानं वेळोवेळी उचललं तसं चित्रकलेच्या बाबतीत कधीच होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. 

७०च्या दशकाच्या पूर्वार्धात मी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हा किंवा त्याच्याही आधीपासून अत्यंत बारकाईने केलेलं हे माझं निरीक्षण आहे. उदाहरणं खूपच देता येतील पण विस्तार भयास्तव ती देणं टाळतो. पण एक उदाहरण मात्र आवर्जून देतो , ते उदाहरण वर उल्लेख केलेल्या विषयांमधील नाटकांसंदर्भातले आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक आधी पीडीएनं आणि नंतर थिएटर अकॅडमीनं रंगभूमीवर आणलं. एकच शतक नाही तर नंतरची अनेक शतकं जागतिक रंगभूमीवर देखील व्यापून उरेल असा तो अभूतपूर्व प्रयोग होता. ( पण त्या प्रयोगामुळे तेंडुलकर, जब्बार पटेल आणि घाशीरामच्या संचाला कोणत्या कोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागलं ? ) तसं चित्रकलेच्या बाबतीत पुण्यातल्या कलावंतांनी काही करून दाखवलं आहे का ? असा माझा प्रश्न होता. या प्रश्नाचं अनुरूप उत्तर मला अद्यापही मिळालेलं नाही. 

कालपासून आलेल्या असंख्य प्रतिक्रियांवर मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा अनेक गोष्टी मला आठवल्या. उदाहरणार्थ जेजेमध्ये शिक्षण घेत असताना चित्रकलेच्या क्षेत्राकडे बारकाईनं पाहायची संधी मला मिळाली. किंवा कदाचित असंही म्हणता येईल की माझं वाचन अफाट असल्यामुळे मी ती साधली. त्या काळातली काही निरीक्षणं आजही चांगलीच आठवतात. सकाळीच पुण्याहून सिंहगड किंवा डेक्कन क्वीननं पुण्यातले चित्रकलेचे विद्यार्थी किंवा चित्रकार मंडळी मुंबईला येत असत. आल्यावर प्रथम ते जेजेला भेट देत असत. हे केळकर, हे जगताप, या सविताबाई, हे अरुण पाथरे, या मिसेस जगताप, या बजाज, हे लाहोटी अशी अनेक नावं कानावर येत. मग पुढं जहांगीरला सतत भेट द्यायची सवय लागली. त्या भेटीत अनेकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळू लागली. पुण्यातल्या एखाद्या कलावंताचं प्रदर्शन असलं म्हणजे पहिल्या दिवशी ते लावायला ही प्रचंड गर्दी असायची. साहजिकच प्रश्न पडायचा ही सारी मंडळी कोण ? ही इथं का आलीत ? वगैरे. रवींद्र साळवे सारखा ( जो नुकताच गेला ) मूळचा पुण्याचा असलेला मित्र त्यांची ओळख करून द्यायचा. हे यांचे सहाय्यक, हे त्यांचे सहाय्यक, हा यांच्या स्टुडियोत काम करतो, ही यांच्या स्टुडियोत काम करते वगैरे. साळवे नावं ठेवण्यात आणि मापं काढण्यात अत्यंत पटाईत. तो त्यांच्या येण्या जाण्याच्या फार गमती जमती सांगायचा. त्या गंमती जंमतींमुळेच जहांगिरवर जमणाऱ्या आमच्या तरुण चित्रकारांच्या ग्रुपचं खूप मनोरंजन व्हायचं. चित्रकार मनोहर म्हात्रे ज्येष्ठ चित्रकार असूनही आमच्याच ग्रुपमधले. पण त्यांना या पुण्याच्या चित्रकारांमध्ये मोठा मान होता. म्हात्रे भविष्य सांगायचे त्यामुळे ती सगळी चित्रकार मंडळी त्यांना मानायची. लग्न कधी होईल इथपासून ते यंदा चित्र विकली जातील की नाही अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं म्हात्रे मोठ्या धमाल पद्धतीने देत असत. 

या सर्वच प्रदर्शनांचं वैशिष्ट्य एकच ते म्हणजे या सर्वच प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी गॅलरीच्या प्रवेश द्वाराशेजारी हटकून एक गणपतीचं चित्र लावलेलं असायचं आणि मग त्या गणपतीची साग्र संगीत पूजा व्हायची. नंतर नंतरतर आम्ही ते गणपतीचं चित्र बघूनच हा आर्टिस्ट पुण्याचा असावा असं ओळखायचो. 

जहांगीरच्या त्या गप्पागोष्टींवरून अनेक गोष्टी नकळत समजून जात असत. उदाहरणार्थ, ही पुणेकर चित्रकार मंडळी जहांगीरच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली की आठ पंधरा - दिवस आधी एकत्र येत आणि नंतर सर्व मंडळी सामूहिकपणे चित्र काढण्याचा कार्यक्रम करीत असत. कुणी कॅनव्हास स्ट्रेच करायचा, कुणी त्याला व्हाईट्नर लावायचा, कुणीतरी तो सुकवायचा, कुणी त्यावर ड्रॉईंग करायचं, कुणी त्यात रंग भरायचा, कुणी तो कॅनव्हास फिनिश करायचा, कुणी त्याला फ्रेमिंग करायचं असं सारं काम एखाद्या मिशनरी वृत्तीनं अत्यंत प्रामाणिकपणे करायचे. ( आमचे म्हात्रे या साऱ्याला वाळवणाच्या पापडाचे उपमा द्यायचे. म्हणजे कसं तर उन्हाळा आला म्हणेज ज्या बाईला पापड करायचे असतील तर तिच्या शेजारच्या साऱ्या बायका तिच्या मदतीला यायच्या आणि मग कुणी लाटतंय , कुणी वाळवतय , कुणी डब्यात भरतंय असं करून सामूहिकपणे तो पापड सोहळा पार पाडला जायचा. त्याची भन्नाट उपमा म्हात्रे मोठ्याने हसत द्यायचे ) आणि सायंकाळी मग तो सारा गोतावळा टेम्पो मेटॅडोर किंवा सिंहगड डेक्कनने मुंबईला यायचा आणि संध्याकाळ झाली की प्रदर्शन करणाऱ्या चित्रकाराला शुभेच्छा देऊन पुण्याला परतायचा. 

यातल्या कुणालाही आपण काही वावगं करतोय असं वाटत नसे. आधुनिक विचाराच्या आम्हाला मात्र हे सारं पाहताना हास्यास्पद वाटत असे. जहांगीरच्या फेरीत हमखास चित्रकार प्रभाकर बरवे यांची भेट व्हायची आणि मग गप्पा गोष्टी, पाहिलेल्या प्रदर्शनावर चर्चा वगैरे. पण बरवे या अशा प्रदर्शनांवर पूर्णतः नाराज असायचे. ते शेवट पर्यंत स्वतःची चित्र स्वतःच काढायचे. त्यांनी कधीही सहाय्यक घेतला नाही. शेवटच्या दोन तीन वर्षात ते तब्येतीमुळे मोठ्या कॅनव्हासवर काम करू शकत नव्हते तेव्हा त्यांनी वॉटर कलर्समध्ये काम करणं पसंत केलं. पण चित्रकाम चालू असताना त्यांनी कुणालाच आपल्या चित्रांना स्पर्श करू दिला नाही. चित्रासंदर्भातले सर्वच विचार बरवे डायरीत नोंदून ठेवत, डायरीतच चित्र काढत. अतिशय गांभीर्याने ते हे सारे करत असत. अशा पार्श्वभूमीवर पुणेकरांची ही प्रदर्शनं आम्हाला अत्यंत विनोदी वाटत. ही मंडळी स्वतःची चित्र स्वतः का काढत नाहीत ? चित्र हे अभिव्यक्तीचं साधन आहे असं का मानत नाहीत ? चित्राला फक्त विक्रीमूल्य असतं असं हे का मानतात ? असा प्रश्न आम्हाला वारंवार पडत असे. अर्थात हा सारा दोन स्कूलमधला वैचारिक संघर्ष होता. मला वाटतं आता तीच परंपरा आजतागायत तशीच चालू आहे. काही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके चित्रकार सोडले ( त्यातल्या काहींनी देखील रागावून माझ्यावर आता टीका केली आहे ) तर सारी परिस्थिती जशीच्या तशी आहे असं माझं मत आहे. 

पुढं या विचारसरणीशी अनेकदा संघर्षाचे प्रसंग आले. पण ना कधी त्यांचे पटले ना आम्ही त्यांना आमचे विचार पटवून देऊ शकलो. या साऱ्याचा संबंध आजच्या कलाशिक्षण पद्धतीशी आहे हे मात्र अनेक प्रसंगातून जाणवून गेलं. 

त्या काळात बॉम्बे आर्ट सोसायटीशी संबंधित होतो. नऊ वर्ष कुठलेही आर्थिक फायदे किंवा बक्षिसं वगैरे लाभ न उठवता निरलसपणे त्या संस्थेचं काम केलं. त्या काळातच बॉम्बे आर्ट सोसायटीची शताब्दी मोठ्या प्रमाणावर साजरी झाली, सोसायटीला वांद्रे येथे भूखंड देखील मिळाला. सोसायटीच्या जहांगीरमधल्या कार्यालयावर आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीवर डोळा ठेवणाऱ्या एका कलावंतानं चित्रकलेशी संबंधित नसलेले लोक सभासद करून घेतले आणि आमच्या गटाला निवडणुकीत पराभूत केलं. यासाठी त्यांना साथ मिळाली ती पुण्यातून आलेल्या एका बसची. पुण्यातले सर्वच कलावंत या बसमध्ये बसून मुंबईला आले आणि आमच्या पॅनलचा पाडाव करून निघून गेले. पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीचे काय आले हे सर्वश्रुतच आहे. एवढ्यात मी त्यावर काही लिहू इच्छित नाही. आत्मचरित्र वगैरे लिहिण्याची वेळ आली तर त्यावर नक्की लिहीन. ज्याने हे सारं घडवून आणलं होतं ते पुण्यातले कलाशिक्षक नंतर महाराष्ट्राचे कलासंचालक झाले. साहजिकच जे सोसायटीचे झाले तेच पुढे कलासंचालनालयाचे झाले आणि नंतर तेच पुढे दिल्लीच्या ललित कला अकॅडमीचे झाले. पुण्यातल्या ज्या स्कूलमधून ते शिक्षक आले होते त्या स्कूलची देखील त्यांनी धूळधाण करून टाकली. आता तर काय त्यांना अख्खा महाराष्ट्र मिळाला होता. वर्षानुवर्षे असलेल्या वीस बावीस असलेल्या अनुदानित कलामहाविद्यालयांची संख्या एका वर्षातच भराभर वाढून दीडशे दोनशेच्या वर गेली. ही कलामहाविद्यालये अर्थातच विनाअनुदानित होती. ती उभारण्यात अर्थातच राजकारणी पुढे होते, गावगुंड देखील पुढे होते. इतकंच नाही तर स्वतःच्या वकुबाविषयी फाजील कल्पना असलेले कलाशिक्षक देखील पुढे होते. गावगन्ना कलामहाविद्यालये उघडली गेली. गोठ्यात, मांगरात , चाळीत , टॉयलेट शेजारी सर्वत्र कलामहाविद्यालये उभी राहिली. ( ही कलामहाविद्यालये कशी उभी राहिली असतील हे लिहायची गरज आहे का ? ) या कलामहाविद्यालयाच्या रूपाने गावागावात आर्ट टिचर काढण्याचे कारखानेच निघाले, शाळेमध्ये आर्ट टिचरचे जॉब मिळतील म्हणून सांगून मुलांना फसवलं गेलं, ( आणि नंतर तर आर्ट टीचर या पदांवर देखील घाव घातला गेला. ) असंख्य पिढ्यांचं नुकसान केलं गेलं. ज्या कलामहाविद्यालयातून हा इसम कलासंचालनायात आला होता, ज्या बसमधून हा इसम बॉम्बे आर्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिक्षकांना घेऊन आला होता त्या शिक्षकांच्या घरादारांवर देखील नांगर फिरवायला यानं मागं पुढं पाहिलं नाही. विनाअनुदानित कलामहाविद्यालयाच्या संचालकांनी (?) " हिस्ट्री ऑफ आर्ट शिकवायला त्रास होतो " अशी तक्रार केली तर त्यांनी हिस्ट्री ऑफ आर्ट हा विषय अभ्यासातून काढून टाकला. याच सो कॉल्ड संचालकांनी सौंदर्यशास्त्र शिकवायला शिक्षक मिळत नाहीत अशी तक्रार केली म्हणून याच माणसानं सौंदर्यशास्त्र हा विषय देखील अभ्यासक्रमातून काढून टाकला. याच्याच तालमीत तयार झालेल्या आणखीन एका कला शिक्षकानं ( तो देखील पुण्याचाच आणि आता जो सीबीआयच्या कार्यालयात चौकशीच्या निमित्तानं खेटे घालतोय अशा एका मंत्र्याच्या हस्तक्षेपानं तेथे आलेला. या मंत्र्याचा हस्तक्षेप तर तंत्रशिक्षण खात्यात देखील तेव्हापासूनच सुरु आहे. कधीतरी पापाचे घडे फुटतातच तसे ते आता फुटले आहेत. ) तर आणखीनच कमाल केली. गावोगावच्या भुक्कड कलाशिक्षकांनी तक्रार केली की " नेचर ड्रॉईंगला सप्टेंबरमध्ये बाजारात फुलं मिळत नाहीत " म्हणून यानं तर एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांमधील ' नेचर ' आणि ' ऑब्जेक्ट ड्रॉईंग ' हा विषयच चक्क काढून टाकला. चित्रकलेमधून निसर्गचित्र हा विषयच काढून टाकला तर उरलं काय ? नशीब असले गाढव शिक्षक आपल्या आरोग्यखात्यात काम करत नाहीत म्हणून नाहीतर यांनी मेडिकल खात्यात सायन्स या विषयाची गरजच काय म्हणून सायन्स हा विषय देखील काढून टाकला असता. हे जे काही मी लिहिलं आहे त्यात अवाक्षरही असत्य नाही. सारे जसे घडले तसे मांडले आहे. 'चिन्ह'च्या २००८ सालच्या काळाबाजार अंकात सारे नवनिशीवर मांडले होते. ( ज्यांना कुणाला हे वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी तो अंक अवश्य मिळवावा ) पण कुणावरही कारवाई झाली नाही कारण वरपासून खालीपर्यंत प्रत्येक जण यात सहभागी होतं. वाझे प्रकरणामुळे पोलिसांची अब्रूची लत्तरं निघाली आहेत. तंत्रशिक्षण खात्यातल्या वरपासून खालीपर्यंतच्या प्रत्येकानं एकमेकाला सावरून धरलेलं असल्यामुळं अत्यंत भयंकर गुन्हे करून देखील संबंधित मंडळी त्यातून सुटली आणि आज घरी बसून छानपैकी हजारो रुपये पेन्शन खाताहेत. ( वाझे प्रकरणात अडकलेल्यांनी संबंधितांचा सल्ला घ्यावा, आरामात सुटता येईल. ) 

हे झालं कलामहाविद्यालयांचं. त्याविषयी लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यावेळची एक आठवण सांगावीशी वाटते, कला शिक्षण क्षेत्रातली घाण काढताना इतका त्रास झाला की एक प्रकरण लिहिताना मी सरळ ग्लानी येऊन कोसळलो होतो. जेजे कलामहाविद्यालय तिथून हलवायचा प्लॅन पक्का झाला होता, आराखडे देखील तयार झाले होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या कानावर हा सारा प्रकार जाताच त्यांनी लोकसत्तेच्या पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली आणि तो सारा प्रकार थांबला. अन्यथा आता चित्रकला शिकायला विद्यार्थ्यांना देवनारच्या कसाईखान्याशेजारी जावं लागलं असतं हे निश्चित. 

काय काय लिहू ? सारं काही कालाबाजार अंकात लिहिलंय. वाटलं होतं हे वाचून जेजेत शिकलेले सारे एकत्र येतील आणि वास्तू वाचवतील. कोणे एके काळी सर्वोच्च पदावर असलेलं महाराष्ट्राचं कलाशिक्षण वाचवतील. पण तसं काहीच घडलं नाही. आजही महाराष्ट्राला कलासंचालक नाही. ज्यांना महाराष्ट्रातल्या चार कलावंतांची देखील सांगता येणार नाही असल्या आचरट लोकांची कलासंचालक पदावर नेमणूक केली गेली, ब्लॅकलिस्टेड कलाशिक्षकाला त्या पदावर नेमलं गेलं. एका कलासंचालकानं तर ज्याची किंमत आज किमान ८० ते ९० कोटी झाली असती असं गायतोंडे यांचं एक अत्यंत दुर्मिळ चित्र उपलब्ध असलेल्या फ्रेममध्ये बसवण्याच्या अट्टाहासापायी कापून टाकलं, कापताना ते मधोमध दुभंगलं, वृत्तपत्रात फोटोसह ते छापण्यात आलं तरी देखील कोणावर कारवाई झाली नाही. हे सारं मी अत्यंत तळतळून लिहितो आहे ते केवळ जेजेच्या प्रेमापोटी. जेजे आणि महाराष्ट्राच्या कलाशिक्षणावर जे अनन्वित अत्याचार झाले त्या साऱ्यास सदर पुणेकर कलाशिक्षकच कारणीभूत ठरला असं माझं मत आहे. किती आणि काय लिहू ? पीएचडीचे किस्से तर महाभयानक आहेत. पीएचडीचा फुलफॉर्म देखील सांगता येणार नाही अशांना पीएचडी प्रदान केली गेली. बाकी बक्षिसं, पुरस्कार यांच्याविषयी काय सांगावं ? काहीही त्यांनी बाकी ठेवलं नाही. महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेचं त्यांनी अक्षरशः कलेवर केलं. महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता , सकाळ आणि चिन्हचा साडे तीनशे पानांचा कालाबाजार अंक या साऱ्यात त्याची नोंद नावानिशीवार वेळोवेळी झाली आहे. पण चित्रकला आहे ना कोण लक्ष देतो ? या वृत्तीनं साऱ्याचीच माती व्हायची वेळ आली आहे. त्या साऱ्याला कारणीभूत ठरला तो एक पुणेकरच. त्यानं अक्षरशः कलाक्षेत्राला बाजारबसवीचं स्वरूप आणलं. आज तो नाही पण त्यानं केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या पुढं पुढं जातंच आहे. जाता जाता एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे कसा भ्रष्टाचार चालला आहे हे सहज उमगेल. मागच्या सरकारनं अर्थसंकल्पात काही काही कोटी रुपये जाहीर केले त्यांचं पुढं काय झालं ठाऊक आहे ? जेजे आणि कलासंचालनालयाला दिलेल्या पैशातून राजकारण्यांच्या पुतळ्यांची कामं काढली जातात. ही कामं करण्यात देखील पुणेकरच आघाडीवर. माती कशी मळायची याची देखील अक्कल नाही अशा लोकांना पुतळ्याची कामं दिली जातात. गुणी कलावंतांकडून राबवून कामं केली जातात, मानधन दिलं तर दिलं नाहीतर नाही दिलं, सोहळे मात्र चांगले इव्हेंटफुली होतात. पुण्याविषयी अतिशय कडवटपणे जे माझ्याकडून गेलं त्याला हा इतिहास आहे. सगळाच इतिहास सांगत बसलो तर पाचशे पानाचा अंकच काढावा लागेल. तरीही खर्च नको म्हणून सोशल मीडियावर कुणाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर त्याला मी तयार आहे.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...