Enquire Now

Request A Quote

करायला गेलो एक !


७०च्या दशकाच्या उत्तरार्धात जेजेमध्ये शिकत असताना एक किडकिडीत मुलगा जेजेत माझ्यासोबत शिकत होता. अर्थातच तो मला ज्युनियर होता. तो कुर्डूवाडीवरून आला होता. आणखीन एक कुर्डूवाडीकर आमच्यासोबत शिकत होता. तो ही मला एक वर्ष ज्युनियर होता. त्याचं नाव होतं विजय शिंदे, ज्यानं चित्रकार म्हणून मोठं नाव कमावलं आणि तितक्याच सहजतेनं ते पुसूनही टाकलं. तो अकाली गेला. नाहीतर आज तो खूप मोठा चित्रकार म्हणून नावारूपाला आला असता. 


ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला आहे तो कुर्डूवाडीकर चित्रकार म्हणजे भगवान चव्हाण. जेजेमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षालाच शिकत असताना त्यानं ललित कला अकादमीचा पेंटिंगसाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. ७०च्याच दशकात प्रभाकर बरवे यांच्यासारख्या चित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत असत त्यामुळे त्या पुरस्कारांना कला जगतात मोठा मान होता. साहजिकच भगवानला विद्यार्थी दशेत तो मान मिळाल्यावर अवघ्या कला जगताला विजेचा धक्का बसावा तसाच धक्का बसला. त्या काळात मुंबईच्या अनेक मान्यवर चित्रकारांना ललित कलेचा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती, पण भगवानसारख्या विद्यार्थ्याला तो मिळाल्यानंतर त्याची कशी प्रतिक्रिया उमटली असेल याविषयी नुसती कल्पनाच केलेली बरी. 

पण नंतर मात्र ललित कलेच्या त्या पुरस्काराचं झपाट्यानं अवमूल्यनच होत गेलं. हे आपलं सहज जाता जाता लिहिलं. भगवानचं ते पुरस्कार विजेतं पेंटिंग मात्र भन्नाट होतं. हा भारतातला खूप मोठा चित्रकार होईल असं त्याच्याविषयी बोललं जाऊ लागलं. कुर्डूवाडीच्या या दोन चित्रकारांच्या स्पर्धेत विजयने मात्र बाजी मारली. त्याच्या चित्रांनी आणि त्याचा वागण्याने अशा दोन्ही गोष्टींनी कलावर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. 

पण भगवान मात्र शांत राहिला. फ्रेंच गव्हर्मेंटची शिष्यवृत्ती मिळताच भगवान पॅरिसला गेला. भगवानला ती खूप मोठी संधी मिळाली होती. तिथंच त्याला चित्रकार रझा भेटले. चित्रकार विश्वनाथन देखील त्यावेळी पॅरिसमध्येच होते. शिष्यवृत्ती संपवून भारतात परतताना त्याची भेट विश्वनाथन त्यांच्यासोबत झाली. त्यांनी भगवानला विचारलं की भारतात राहणार कुठे ? काम कुठे करणार ? वगैरे, तर भगवान म्हणला, मुंबईला तर शक्यच नाही, बहुतेक  सोलापूर किंवा कुर्डूवाडीला जाईन. त्यावर विश्वनाथन म्हणाले, तसं कशाला करतोस ? तुला पेंटिंग करायचंय ना ? मग तू माझ्या चोलामंडल मधल्या स्टुडियोत जा आणि काम कर. मी काही इतक्यात भारतात येणार नाही. भगवानला ती कल्पना आवडली आणि तो भारतात आला आणि थेट चोलामंडल मध्ये राहून काम करू लागला. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता तशात फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळालेली, चोलामंडलमध्ये स्टुडियो यामुळे भगवान विषयी एक छान आदरयुक्त कुतूहल निर्माण झालं होतं. मुंबई दिल्लीत त्याची प्रदर्शनं देखील भरू लागली. याच काळात कधीतरी विश्वनाथन यांना त्यांच्या जागेची आवश्यकता भासली. तितक्यातच चोलामंडलचे एक संस्थापक सदस्य श्री जयपाल यांनी त्यांचा चोलामंडल मधला प्लॉट विकावयास काढला. विश्वनाथन म्हणाले, भगवान तू का नाही विकत घेत तो ? भगवान चोलामंडलच्या प्रेमातच पडला होता. त्याला ती कल्पना खूपच आवडली होती. त्यानं ठरवलं की आता इथंच स्थायिक व्हायचं आणि तो प्लॉट त्याने विकत घेतला देखील. तिथं एक छोटीशी खोली होती. त्यानं ठरवलं की इथं आपण आपलं घर आणि स्टुडियो बांधायचा. दरम्यानच्या काळात एका साऊथ इंडियन मुलीशी त्याचं लग्न देखील झालं होतं. भगवान आता पक्का साऊथ इंडियनच झाला होता. 

चोलामंडलमध्ये स्टुडियो आणि घर बांधायचा भगवानचा निर्णय काहीसा चुकलाच म्हणायचा. नानाविध आर्थिक अडचणींना त्याला तोंड देण्याची वेळ आली. असा अनुभव आधी कधीच घेतला नव्हता. पेंटिंग राहिलं बाजूला आणि आर्थिक कुतरओढ सुरु झाली. भगवान विलक्षण नाउमेद झाला. ज्या गॅलऱ्या त्याची पेंटिंग विकत होत्या त्याही हळूहळू त्यांच्यापासून दूर जाऊ लागल्या. 

हळूहळू या साऱ्या भानगडीतून  भगवान बाहेर पडू लागला. पण त्याची खूप मोठी किंमत त्याला चुकवावी लागली. आयुष्यभर पेंटिंगच करेल असे म्हणणाऱ्या भगवानने चीकमंगळूरच्या एका मोठ्या शाळेत कला शिक्षकाची नोकरी पकडली. आता तो चोलामंडलच्या बाहेर पडला होता. आता तो आधी कलाशिक्षक होता आणि नंतर चित्रकार. साहजिकच त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावयास लागलेच. 

त्याचा हा सारा उतार चढावानं भरलेला प्रवास मी अगदी जवळून पाहत होतो. त्या साऱ्या प्रवासावर त्यानं लिहिलेला एक लेख देखील मी 'चिन्ह'मध्ये प्रकाशित केला होता जो त्या काळात खूप गाजला. त्यानंतर  भगवान त्या शाळेच्या नोकरीतूनही मुक्त झाला. पेंटिंग तर त्याचं चालूच होतं, ते कधीच बंद पडलं नाही, पण भगवानने जेजेमध्ये असताना आपल्या कामात जी चमक दाखवली होती ती मात्र त्याला नंतरच्या कामात दाखवता आली नाही असं जाणकार म्हणतात. 

आपण ठरवतो एक प्रत्यक्षात दुसरंच काहीतरी करावं लागतं. या साऱ्या खटाटोपात वेगळंच काहीतरी घडून जातं असं आपल्याला नेहमीच पाहावयास मिळतं. भगवानचं तसंच काहीतरी झालं असावं असं आता मागे वळून पाहताना वाटतं. ते नेमकं काय असावं ? याचाच शोध त्यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये मी घ्यायचा ठरवलंय. १७ एप्रिल सायंकाळी ५.३० वाजता पाहायला विसरू नका. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...