Enquire Now

Request A Quote

बोल्ड अँड ब्युटीफुल !


    भावनाची आणि माझी ओळख झाली ती जहांगीर आर्ट गॅलरीच्या पायरीवर. वीस वर्षांपूर्वी बहुदा तिच्या चित्रांचं प्रदर्शन आर्ट प्लाझामध्ये भरलं होतं तेव्हा. त्यालाही आता बरीच वर्ष झाली असल्यामुळं काहीच आठवत नाही. पण तिचा तो तरतरीतपणा, हुशारी, स्मार्टनेस सारं काही लक्षात राहिलं. ती लक्षात राहिली ते तिच्या देखणेपणामुळे देखील. आणखीन एक चित्रकलेशी संबंधित असलेलं किंवा नसलेलं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे बांद्रा स्कूल ऑफ आर्टशी संबंधित ( ज्याचं नाव नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट असं झालं आणि अलीकडे काही वर्षांपूर्वी ते काळाच्या पडद्याआड देखील गेलं ) किंवा तिथं शिक्षण घेतलेल्या मुली या पुढं फारशा कलेच्या क्षेत्रात चमकत नाहीत ( हे मी फाईन आर्ट विभागाविषयी म्हणतोय ). पाच पाच वर्ष शिक्षण घेतात पण चित्रकार म्हणून चित्रकलेच्या क्षेत्रात नावारूपाला येत नाहीत. भावना मात्र याला अपवाद ठरली. भावना म्हणजे आधीची भावना यादव नंतरची भावना सोनवणे. 

प्रेमात पडून तिनं खूपच आधी लग्न केलं. तिची खरी चित्रकला ही लग्नानंतरच बहरली. तिचा नवरा अनिष हा देखील चित्रकारच. साहजिकच लग्नाला घरून विरोध झाला. पण ही ठाम राहिली. लग्नाविषयी टोकलं तर काही बोलायला तयार होईना. मग मी तिला थोडंसं दमात घेतलं. 'बघ तुला लाईव्ह कार्यक्रमात बोलायला लावतो की नाही जाहीरपणे' वगैरे. पण ती ते सारं न सांगण्यावर ठामच राहिली. त्यामुळं पुढे काय लिहायचं हा मला प्रश्न पडलाय. पण ते एक असो. ते शनिवारी पाहू. 

सांगायचं तात्पर्य असं की भावना पहिली जेव्हा भेटली तेव्हा पहिल्यापासूनच ती लक्षात राहिली. यशाचं एकेक शिखर ती चढतच गेली. तिचं काम पाहून चेन्नईच्या आप्पाराव गॅलरीनं तिला पुढं आणायचं ठरवलं. आप्पाराव गॅलरीचा नव्या चित्रकारांसंदर्भात एक प्रकल्प चालू होता. त्या प्रकल्पासाठी भावनाची निवड झाली. 

त्या निवडीनंतर भावना थेट पॅरिसला गेली. तीन महिने तिनं तिथल्या रेसिडेन्सीत काम केलं. पॅरिसमध्ये राहण्याचा तो अनुभव तिला फार काही शिकवून गेला. तिचे आई - वडील शिक्षण क्षेत्रातच काम करणारे. त्यामुळे तिचं वाचन चांगलं नसतं तर नवलच ठरलं असतं. मूळचा स्वभावातला ठामपणा, त्याला वाचनाची जोड आणि त्यात नवऱ्याचं खंबीरपणे मागे उभं राहणं आणि पॅरिस सारख्या चित्रपंढरीत तब्बल तीन महिने काम करावयास मिळणं यामुळे भावनाचं अनुभव विश्व् खूपच समृद्ध झालं आणि तिथून परत आल्यावर ती पाय रोवूनच कलाक्षेत्रात उभी राहिली. 

नंतर सुरु झाला तो प्रदर्शनांचा सिलसीला. एकापाठोपाठ एक अशी तिची प्रदर्शनं भरू लागली, गाजू लागली. मध्येच तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक मोटरसायकलवरून नवऱ्यासोबत मुलाला घेऊन ती थेट लडाखला पोहोचली. चिक्कार हिंडली, भटकली, फोटो काढले, चित्र काढली आणि चक्क प्रवासवर्णन देखील लिहिलं. 'चिन्ह'मध्ये मी ते सारं प्रकाशित करायचं ठरवलं होतं. निर्णय देखील झाला होता पण दुर्दैवानं अचानक मला 'चिन्ह'चं प्रकाशन बंद करावं लागलं आणि मग ते सारं राहूनच गेलं. त्याचं मला आजही राहून राहून वाईट वाटतं. पण त्यामुळे एक झालं भावना आणि माझ्यात चांगला संवाद निर्माण झाला. वेळोवेळी अनेक गोष्टी ती माझ्याशी शेअर करते. मध्यंतरी तिला कोणीतरी सोशल मीडियावरून त्रास देत होतं. त्यावर काय उपाययोजना करायची याबाबत तिनं माझा सल्ला घेतला होता, आणि तिनं नंतर अत्यंत खंबीरपणे तो सारा प्रकार मोडून काढला होता. अर्थात माझा सल्ला निमित्तमात्र होता, ती मूळची खंबीर असल्यामुळं तिनंच ते सारं निपटून टाकलं होतं. 

पेंटिंग तर तिचं चालूच होतं, प्रदर्शनं तर ती भरवतच होती. मधल्या काळात ती ज्या बदलापूरमध्ये राहत होती त्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेने बदलापूरमध्ये कलादालन सुरु करायचं ठरवलं आणि तिच्यातली एकूण धाडसी वृत्ती बघून तिला या गॅलरीशी बांधून घेतलं. श्रीकांत जाधव वगैरे ज्येष्ठ चित्रकारांच्या साहाय्यानं तिनं ते आव्हान स्वीकारलं आणि बदलापुरात एक देखणी आर्ट गॅलरी उभी राहिली. 

या गॅलरीचा प्रसार व्हावा यासाठी तिनं अनेक कार्यक्रम आखले, अनेक स्पर्धा घेतल्या. मध्यंतरी म्हणजे गेल्या पावसात बदलापुरात जो पूर आला त्या पुराचं पाणी त्या गॅलरीत देखील शिरलं पण ती डगमगली नाही.  सर्वच चित्रकारांच्या मदतीनं तिनं त्यावर मात केली ( हे सर्व तिनं केलं असं मी जे म्हणतो ते वाच्यार्थाने घ्यायचं नाही, अशी कामं ही संघ भावनेनेच करायची असतात. याची तिला पक्की जाणीव असल्यामुळं ती स्वतःला या कामांपासून वेगळं करू पाहते. पण या लेखाची नायिका ती असल्यामुळं ही सारी कामं तिच्या नावाशी निगडित होणार हे उघड आहे. पण यामुळे कुणालाही मिरच्या झोंबू नयेत म्हणून हा खुलासा केला. आमच्या कलाक्षेत्रात हे फार आहे. असो )

आजही ती स्वतःच्या पेंटिंगच्या कामात पूर्णपणे मग्न असते. सिरॅमिक, एनामलिंग इत्यादी माध्यमं वापरून देखील ती कलानिर्मिती करण्याच्या प्रयत्नात असते. बदलापुरातल्या बदलापुरात तिचे दोन स्टुडिओ आहेत. एकात ती पेंटिंग करते दुसऱ्यात सिरॅमिक, एनामलिंग इत्यादी. शिवाय नगरपालिकेची गॅलरी. या सगळ्यात ती प्रचंड बिझी असते. बोलायला देखील वेळ नाही असं म्हणत म्हणत खूप खूप बोलत राहते. असं मी का म्हणतो आहे हे समजून घ्यायचं असेल तर येत्या शनिवारी सायंकाळी ०५.३० वाजता फेसबुकवर या. प्रचंड धाडसी, अत्यंत मेहनती आणि तितक्याच संवेदनाक्षम भावना सोनवणेला अवश्य भेटा.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...