Enquire Now

Request A Quote

नॅशनल पार्क शेजारचे चित्रकार वाघमारे

जे त्याला गुरुसमान होते त्या प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील बावीस मजली भल्या थोरल्या टॉवर खाली तो उभा होता. कोलते सरांच्याच घरी जाण्यासाठी. स्कुटर पार्क करून तो रस्ता क्रॉस करू लागला तर नंतर काय झालं हे त्याला कळलंच नाही. शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळलं की आपल्याला एका भरधाव वेगानं आलेल्या मोटरसायकलने सुमारे १५ - २० फूट लांब किंवा उंच भिरकावून दिलं आहे. 

तिथून मात्र त्याच्या मागे अक्षरशः पनवती लागली असं म्हणतात ना ते झालं. तो पर्यंत त्याचं सगळं नीट आणि सुखात चाललं होतं. नॅशनल पार्क शेजारच्या श्रीकृष्ण कॉलनीमध्ये नदीला लागून असलेल्या एका इमारतीत पाचव्या की सहाव्या मजल्यावर त्यानं स्वतःचा स्टुडिओ सुरु केला होता. तिथंच राहायचं तिथंच काम करायचं, कंटाळा आला की स्टुडिओच्या मोठ्या खिडकीमधून नॅशनल पार्कचं सौंदर्य न्याहाळत बसायचं, वेळ मिळेल तितकं शास्त्रीय संगीत ऐकायचं, मराठी साहित्यविषयक पुस्तकं बिस्तकं वाचायची, आप्तमित्र मैत्रिणी, गुरुजन किंवा स्नेह्यांना घरी बोलावून स्वतःच्या हाताने सुगरास जेवण तयार करून खिलवणं हे त्याचे फावल्या वेळातले उद्योग होते. एखाद्या सुगरणीच्या हातात जी जादू असते ती त्यानं कमावली होती त्यामुळे वर उल्लेख केलेल्यांमधील अनेकजण अनेकदा किंवा वरचेवर त्याच्याकडं हक्कानं जेवायला येत. 

असं सगळं छान चाललं असतानाच हा अपघात झाला आणि त्याचं सारं आयुष्यच विस्कळीत झालं. ज्या मुलाच्या मोटर सायकलनं त्याला उडवलं होतं तो मुलगा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला नंतर आज तागायत त्यानं किती लोकांचं आयुष्य बरबाद केलं असेल कुणास ठाऊक. हे जे काही मी लिहितोय ते माझा मित्र चित्रकार प्रकाश वाघमारे याच्याबाबत. इथूनच त्याच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरु झाल्या, नको नको ती औषधं मागे लागली. तसा तो तब्येतीनं चांगला ठणठणीत होता, खूप कष्टानं दिवस काढले असल्यामुळं कणखर देखील होता. पण त्या अपघातानं त्याला काहीसं लेचंपेचं केलं. चांगला सुदृढ दिसणारा प्रकाश काहीसा हताश झालेला दिसू लागला. त्यातच ज्यांना तो प्रारंभापासून मानत होता त्यांनी त्याच्याशी निष्कारण संबंध तोडले, त्याला बघायला देखील हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. हा धक्का मात्र त्याला खूपच दुखावून गेला. आता तो अधिकच एकटा वाटू लागला, अस्वस्थ वाटू लागला. हे सारं कमी झालं म्हणून की काय चित्रकलेतली मंदी देखील त्याला सतावू लागली. 


गणपतीच्या दिवसात तो दरवर्षीप्रमाणे गावाला म्हणजे रोह्याला जायला निघाला. मखर वगैरे गणपतीच्या खरेदीसाठी तो बोरिवली मार्केटमध्ये गेला असताना तिथंच त्याला भोवळ आल्यासारखं झालं. त्याच्या इमारतीतल्या त्याला ओळखणाऱ्या कुणीतरी त्याची अवस्था पाहिली आणि त्याला उचलून थेट घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले थोडा उशीर केला असतात तर... वगैरे. 

हा प्रकार घडला त्याचवेळी मी नेमका त्याच्या मोबाईलवर फोन केला होता. पण तो काय बोलत होता हेच मला कळत नव्हतं, मला वाटलं की हा नेटवर्क प्रॉब्लेम असावा. पण तो नेटवर्क प्रॉब्लेम नव्हता, हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता. हे मात्र मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या भावाने फोन उचलला तेव्हाच कळलं. या विचित्र अनुभवाच्या संदर्भात मी तेव्हा फेसबुकवर जी पोस्ट लिहिली होती ती भलतीच व्हायरल झाली होती. 

रोज सकाळी नियमितपणे व्यायाम करणाऱ्या, नॅशनल पार्कमध्ये रोज पहाटे नेमानं फिरायला जाणाऱ्या प्रकाशला उच्च रक्तदाबाचा दोष निर्माण झाला होता. त्या अनोळखी मोटरसायकल स्वाराने दिलेल्या प्रसादाने आता आपले खरे रंग दाखवले होते. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढून मग तो रोह्याला गेला. तूप रोटी खाऊन परत आला, आता तो तसा बरा आहे पण अधनं मधनं प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतातच, गोळ्या वगैरे नियमितपणे घ्याव्या लागतातच. मोठे कॅनव्हास पेंट करताना खूप त्रास वगैरे होतो, पण तो अत्यंत जिद्दी आहे आणि स्वतःच्या कामाविषयी प्रामाणिक देखील. त्यामुळे अगदी ठामपणे तो पेंटिंग करीत असतो, आपले विचार ठासून मांडत असतो. अशा या प्रकाशला मी ठरवलंय की येत्या शनिवारी म्हणजेच २७ तारखेला बोलतं करायचं. ऐकायला पाहायला विसरू नका. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...