Enquire Now

Request A Quote

गच्चीवरील गप्पांची पंचविशी

आज सायंकाळी गच्चीवरील गप्पा अर्थात प्रश्नचिन्ह या कार्यक्रमाचा २५ वा भाग प्रसारित होणार आहे. सहा सात महिन्यांपूर्वी जेव्हा अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची कल्पना डोक्यात आली तेव्हा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होईल असे स्वप्नात देखील वाटलें नव्हते. किंबहुना लॉकडाऊन नंतर हा कार्यक्रम आपोआप बंद होईल असं काहीस मनात आलं होतं. पण तसं काही झालं नाही. कार्यक्रम आपआपल्या गतीनं चढतच गेला. अगदी पहिल्या कार्यक्रमापासूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतच गेला आणि आता अलीकडेच आम्ही या सर्व कार्यक्रमांचे व्हिडीओ आम्ही आमच्या युट्युब चॅनेलवर टाकले आहे. त्याची अद्याप आम्ही जाहिरात करू शकलो नाही पण तरी देखील युट्युबवरही वाढत्या संख्येनं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. 


या साऱ्याचं विश्लेषण करण्यात आम्हाला कुठलंही स्वारस्य नाही किंवा तितका वेळही आमच्याकडे नाही. ज्यांना ते करावसं वाटत असेल त्यांनी ते अवश्य करावं. या कार्यक्रमाविषयी इतकंच सांगेन की कोरोनामुळे ही संधी आयती चालून आली, आम्ही ती स्वीकारली.  ती स्वीकारताना कुठलाही व्यावसायिक विचार मनात नव्हता. १४व्या अंकानंतर चिन्हचं प्रकाशन बंद केलं. ते एका वेगळ्या पद्धतीनं चालू करावं असं बरेच दिवस मनात होतं. ते या निमित्तानं साध्य झालं त्याचा आनंद खूप मोठा आहे. केवळ मुंबई पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्याच नव्हे तर किंबहुना जगभरातल्या कलारसिकांशी आम्ही जोडले गेलो आहोत. हा आनंद मोठा अवर्णनीय आहे. 


खरं तर हे अशा स्वरूपाचं काम एखाद्या संस्थेनंच हाती घ्यायला हवं होतं. पण चित्रविक्री खेरीज अन्य कोणत्याच गोष्टीत रस नसलेल्या कलासंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे आजपर्यंत पूर्णतः दुर्लक्ष केलं ही वस्तुस्थिती आहे. आज सोशल मीडियाच्या काळात देखील मागील पानावरुन सारे जसेच्या तसे पुढे चालले आहे याची खंत जरूर आहे. पण आम्ही काही कोणी पुढे येईल म्हणून वाट पाहत बसलो नाही. काळाशी जुळवून घेतलं आणि तंत्रआधुनिकतेचा सर्व फायदा घेऊन येणाऱ्या नव्या काळाशी आम्ही स्वतःला जोडून घेतलं. अडचणी खूप आल्या किंबहुना हा साराच प्रवास खडतर होता. पण दमलो नाही, वाकलो नाही आणि मोडलो देखील नाही. 


गेल्या चार पाच महिन्याचा अनुभव खूप छान होता, पण अगदी मनापासून सांगायचं तर अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करण्याचा अनुभव मात्र मला अजिबात नव्हता. किंबहुना मुखदुर्बळ असल्यामुळं आलेल्या अनेक संधी मी नाकारल्या देखील होत्या. हा कार्यक्रम करायचं निश्चित झालं तेव्हा मात्र काही गोष्टी अगदी ठरवून केल्या. उदाहरणार्थ कार्यक्रमाला कुठलीही लिखित संहिता ठरवायची नाही, कुठलीही पूर्वतयारी करायची नाही हे अगदी मनाशी पक्क होतं. सुरुवातीला अनेकांनी लेखी प्रश्न देण्याविषयी सुचवलं पण त्यालाही मी चक्क नकार दिला. त्यामुळे काही ज्येष्ठ कलावंत कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही तेही मी शांतपणे स्वीकारलं. या साऱ्याचा परिणाम असा झाला की कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे सादर होऊ लागले. त्यात सतत ताजेपणा आणि टवटवीतपणा राहिला. अनेकांना स्वतःला अशी भीती होती की आपण बोलू शकू की नाही पण ती देखील त्यांच्या मनातून काढून टाकण्यास मी यशस्वी ठरलो. अनेकांना वाटत होतं की आपण अर्धा तास देखील बोलू शकणार नाही पण अशांचेच कार्यक्रम दीड दोनतास चालले तेव्हा त्यांचं त्यांनाच नवल वाटलं. मला असं वाटतं की या साऱ्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला असावा. 


आता २५ भाग झाले आहेत, आणखीन २५ झाले की थोडंसं थांबायचं  असं ठरवलंय पण ज्या पद्धतीचा प्रतिसाद येतोय तो पाहता हे कितपत शक्य होईल असे वाटत नाही. २५ वा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं साजरा करावा असं ठरवलं होतं खरं पण आज तो ज्या पद्धतीनं साजरा होणार आहे तसं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...