Enquire Now

Request A Quote

टोपकर सर

आपल्या स्मृतिपटलांची एक मोठी गंमत आहे, कधीकधी आपण एखादी गोष्ट खूप आठवण्याचा प्रयत्न करतो अगदी बुद्धीला ताण दिला तरी त्या पटलावर कसलीही अस्पष्टशी देखील स्मृतिचित्रे, चिन्हे किंवा तो प्रसंग येतच नाही. आणि कधीकधी आपण नकळतपणे शांत बसलेलो असताना अचानक काहीतरी वाचनात येते, किंवा समान दृश्यानुभव येतो आणि आठवणींचे पदर असे उलगडू लागतात की जणू आपण फ्लॅशबॅकमध्ये जणू संपूर्ण चित्रपटच बघतोय. असंख्य बारीकसारीक गोष्टी मनःपटलावर झरझरपणे आपल्यासमोर उलगडत जातात. आज अशीच भेट होऊन चाळीसपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेल्या टोपकर सरांची आठवण प्रकर्षाने झाली आणि डोळ्यांत पाणी आलं.


सन 1980 च्या सुमारास मी पाचगणीच्या संजीवन विद्यालयात शिकायला होतो. गणित हा विषय आला, तो विषय शिकवणारे एस.डी.देशपांडे सर लांबून येताना जरी दिसले की मला कापरे भरायचे, अचानकपणे घंटानाद झाल्याप्रमाणे भितीने हृदय थरथर कापायचे, हृदयाचे ठोके वाढायचे. काही चुकले की ते कान असा पिळायचे की तीनचार दिवस कानाच्या पाळ्या अगदी लालेलाल गाजरासारख्या दिसायच्या आणि खूप दुखायच्या. एकदा माझं होमवर्क राहिलं होतं. मनात प्रचंड भिती वाटत होती मग मी गणिताच्या तासाला दांडी मारली व शाळेच्या पाठीमागच्या झाडीत लपून बसलो.


थोड्या वेळाने तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी निघालो तर त्या रस्त्यातच एका बाजूला एक वयोवृद्ध, जाड भिंगाचा मोठा चष्मा घातलेले, काळसर वर्णाचे, पायजमा शर्ट, अंगात ग्रे कलरचा अर्धा स्वेटर व चटईवर बसून समोर प्राचार्यांच्या निवासस्थानाचे बंगल्याच्या परिसराचे चित्र काढणारे एक चित्रकार निवांतपणे रंगकाम करत बसले होते. लँडस्केपच्या हाफ इंपिरियल साईजची ती फ्रेम होती, त्यावर ताणून बसवलेल्या हँडमेड पेपरवर अतिशय तल्लीनपणे ते चित्र काढण्यात ते रममाण झाले होते. मी ते चित्र बारकाईने पाहण्यात इतका गुंग झालो की पाणी पिण्याचे विसरूनच गेलो आणि अचानक देशपांडे सरांचा पाठीवर हात पडला. त्याचवेळी जागृत अवस्थेत आलो. त्यावेळी चित्रकाराबरोबर बोलायचे मात्र राहून गेले पण त्यांचे रंगकाम व चित्र मात्र कायम मनात घर करून राहिलं.


एकदा संजीवनच्या लायब्ररीमध्ये रावसाहेब पंडीत व कृष्णराव पंडीत या फाऊंडर्सची लाईफ साईजची ऑईल कलरमध्ये केलेली दोन मोठी पोर्ट्रेट्स लावली गेली त्या दोन्ही चित्रांवर सही होती बी.आर.टोपकर. मी फार भारावून गेलो होतो ती चित्रे पाहून. 
 

एकदा पाचगणीच्या मुख्य रस्त्यावर श्रीकृष्ण मेडीकलच्या अरुंद माडीवर थंडीताप आला म्हणून डॉ. अरुण परब यांच्याकडे गेलो होतो तर दवाखान्यात बाहेरच्या वेटींग रुममधून दोन पोर्ट्रेट्स पहिली. एक चित्र होते डॉ. सावंत आणि दुसरे डॉ. परब यांच्या वडिलांचे. त्या दोन्ही चित्रांवर सही होती बी.आर टोपकर. मग सतत आजारी पडण्याचा बहाणा करून मी चित्रे ती पाहायला जायचो. पुढे मी चित्रकार व्हायचे व एकदा तरी टोपकर सरानां भेटायचेच हे मनात मी ठरवूनच ठेवले होते.
        

कलाशिक्षणाच्या निमित्ताने मी बाहेर पडलो आणि टोपकर सरांची भेट घ्यायची राहूनच गेली. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पाचगणीला आलो त्यावेळी कोणीतरी सांगितले टोपकर सर सिझनमध्ये महाबळेश्वरला दर उन्हाळ्यात चित्र काढायला येतात. मग मात्र मी एकदा चित्रकार टोपकर यानां भेटायचेच असे ठरवून एसटीने महाबळेश्वरला पोहचलो. मे महिना संपून पावसाळा लागणार होता, महाबळेश्वरमध्ये नेहमीप्रमाणे थंडी होतीच पण नुकताच पडलेल्या पावसामुळे सर्व वातावरणही उदास होते. महाबळेश्वरच्या पेटीट लायब्ररीच्या चौकातच पुनम व नुक्कड नावाची दोन मोठी हॉटेल होती, त्या दोन्ही हॉटेलांच्यामध्ये साधारपणे सहा फूटाचे एक बोळ होते. त्या बोळामध्ये टोपकर सर राहतात व तेथेच चित्रे काढतात ही माहिती मी मिळवली होती. माझ्या मनात त्यानां खूप वर्षानंतर भेटायची अनावर ओढ, उत्सुकता व प्रचंड उत्साह होता.
            

एसटी बस मधून उतरून मी घाईने चालत पूनम हॉटेलच्या चौकात पोहचलो, माझी नजर टोपकर सरानां अधीरपणे शोधत होती पण टोपकर सर कोठेच दिसत नव्हते. त्या बोळात तीन चार मोठ्या पिशव्या व इतर थोडेफार साहित्य अस्ताव्यस्तपणे पडले होते. फ्रेम केलेली काही निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे पावसाने चिंब भिजून वेडीवाकडी रस्त्यावर पडली होती. चित्रांच्या फाईली व त्यातील जलरंगातील चित्रे पावसाने भिजल्यामुळे रंग ओघळून चिकटून बसली होती. मी त्या उघड्यावर पडलेल्या चित्रांची, चित्रकाराच्या संसाराची झालेली वाताहात पाहून खूप उदास झालो, व्यथित झालो. पण जवळपास चित्रकार कोठेच दिसेना. मग हॉटेलवर चौकशी केली तर एकाने समोर बोट दाखवले. आता ज्या ठिकाणी पार्कींग व टॅक्सीस्टॅन्ड आहे तेथे पूर्वी पटांगण व मराठी शाळा होती व त्या शाळेच्या आवारात चित्रकार बी.आर.टोपकर डोके मानेत खूपसून मोठमोठ्याने, हमसून हमसून, उसासे टाकत, लहान मुलाप्रमाणे रडत भींतीला निराश अवस्थेत टेकून बसले होते.
             

मी जवळ गेलो ,त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांचे डोळे पुसले. लाल ओल्या मातीने त्यांचा पायजमा शर्ट खराब झाले होते. रडून रडून डोळे सुजलेले होते. मी त्यानां माझी ओळख करून देताना संजीवनचा माजी विद्यार्थी सुनील काळे आहे आणि त्यांच्याच चित्रप्रेरणेने आता कलामहाविद्यालयात शिकत आहे हे ऐकून त्यानां बरे वाटले. आपल्या क्षेत्रातील कोणीतरी विद्यार्थी भेटला हे ऐकून त्यानां तरतरी आली. मी त्यानां जवळच्या हॉटेलमध्ये नेले, चहापाणी, नाश्ता खायला घातल्यानंतर थोडे मन स्थिर झाल्यावर त्यांनी मग त्यांची हकीकत सांगायला सुरवात केली.
            

टोपकर सर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात बरीच वर्षे कलाशिक्षक होते. मुलांना चित्रकला शिकवताना ते क्राफ्टही शिकवायचे. सुट्टीमध्ये महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात जावून वेडीवाकडी वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करायच्या. त्या वाळलेल्या फांद्यामधून वेगवेगळ्या आकाराचे प्राणी, पक्षी, मूर्त, अमूर्त भन्नाट आकार शोधायचे. त्या फांद्या योग्य त्या साईजमधून कापायच्या, त्यानां घासूनपुसून स्वच्छ करायचे, पॉलीश करायचे व सुंदर शोपीसेस बनवायचा त्यानां छंद लागला होता. 


एकदा जंगलात गेल्यावर कोणत्यातरी विषारी गवताची त्यानां ॲलर्जी झाली. त्या ॲलर्जीची इतकी वाढ झाली की ते सतत शरीर खाजवू लागले. हातपायासोबत संपूर्ण चेहरा व शरीराच्या प्रत्येक भागात ही खाज वाढू लागली. ते एकही मिनिट स्वस्थ बसत नसत, अनेक उपचार करून झाले पण वाढलेली ॲलर्जी व कलेच्या प्रति असलेली निष्ठा व प्रेम ते थांबवू शकले नाहीत. या प्रचंड जीवघेण्या रोगाला सोबत घेऊन ते जगत होते आणि सगळा भार परमेश्वरावर सोपवत आनंदाने कलासक्त मनाने जगत होते. त्या विधात्यावर चिडण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या कलाकार ताकदीवर त्यांची श्रद्धा मोठी होती. शाळेने इतर मुलानां ही ऍलर्जी होऊ नये म्हणून त्यांना रामराम केला पण त्याची त्यांनी कधी तक्रार केली नाही.


महाबळेश्वर परिसराची जलरंगात, तैलरंगात निसर्गचित्रे काढायची, काष्ठशिल्पे तयार करायची, कोणत्याही व्यक्तींची ऑर्डरप्रमाणे फोटोवरून तर कधी समोर बसवून चित्रे काढायची आणि न लाजता पूनम व नुक्कडच्या बोळात चित्रे विकायची व तेथेच बैठक मारून कलासाधना करायची. हात सतत चालू ठेवत राहायचा त्यांना ध्यास होता. त्यांना चित्र काढण्याच्या विषयाचे कोणतेही बंधन नव्हते.
         

कधी कधी महाबळेश्वरला येणारे हौशी पर्यटक राहत असलेल्या हॉटेलवर त्यांना बोलावून घेऊन स्त्रीयांची, मुलांची, स्वतःची एकत्रित चित्रे काढून घ्यायला सांगायचे. एकदा दूरवर असलेल्या हॉटेलमध्ये ते चालत गेले होते. त्यांचे इतर सामान व डिस्पेलीची चित्रे त्यांनी पूनम हॉटेलच्याच बोळामध्ये ठेवलेली होती. ऑर्डरचे चित्र पूर्ण करून ते निघाले आणि अचानक वळवाचा मोठा धुवांधार पाऊस भर दुपारी कोसळू लागला. टोपकर सर वेगाने धावत ओलेचिंब होऊन रस्त्याने पळत सुटले होते. पण चार पाच किलोमीटरचे अंतर ते पार करू शकले नाहीत. दोन्ही हॉटेलमध्ये बोळात ठेवलेली त्यांची अनेक चित्रे, फ्रेम्स, जलरंगातील पोर्टफोलीओ, काष्टशिल्पातील अनेक नमूने, जगण्याचे सामान, पुस्तके, कपडे व इतर वस्तू वेगाने छपरावरून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झालेले होते.
              

ज्या टोपकर सरानां पाहण्याची, त्यांची चित्रे बघण्याची, त्याच्यांशी कलाविषयक गुपिते जाणून घेण्याची जी ओढ होती ती अशा विपरीत परिस्थितीत याच दिवशी पूर्ण होईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी त्यांना शाळेत चित्र काढत असताना पहात होतो याची आठवण करून दिली. आणि आता आर्ट कॉलेजला शिकतोय याचा त्यांना भारी आनंद झाला. हाताला तर कधी पायाला सतत खाजवत माझी चित्रे पाहायला येणार असे ते म्हणायचे. यथाशक्ती मी त्यांना थोडी आर्थिक मदत केली व आम्ही पूनम चौकात आलो. 


मग मी त्यांचा संसार पुन्हा उभा करायला मदत केली. जलरंगातील सगळी चित्रे एकमेकाला चिकटून थबथबीत भिजलेली होती, ती चित्रे सुटी करताना ते मला त्या प्रत्येक चित्रांची स्टोरी सांगायचे, पण चित्रांचे रंगच ओघळून अस्पष्ट झालेले दृश्य काही दिसायचेच नाही. मग ते मला सांगताना भावनाविवश व्हायचे. खूप छान झाले होते हे चित्र, यातला लाईट भारी पकडला होता, या चित्रात डेफ्थ, परस्पेक्टीव्ह छान जमले होते, यातले कंपोझिशन झकास झाले होते असे काहीबाही आठवेल तसे ते बोलत सुटले होते. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांत पाण्याच्या धारा सतत वाहत होत्या व हात चिकटून पडलेली चित्रे सोडवण्यात मग्न होता. खरं सांगायचे तर एखाद्या मरण पावलेल्या स्वतःच्याच अपत्याचे शेवटचे मुखदर्शन घ्यावे तसे आपल्याच चित्रांचे अंतिम मुखदर्शन घेत होते.


संपूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत मी त्यानां मदत करत होतो. हळूहळू सगळी वाया गेलेली चित्रे आम्ही वेगळी केली, त्याचा ढिगारा तेथून हलवला. काष्ठशिल्पे व इतर चांगल्या अवस्थेतील वस्तू स्वच्छ पुसून घेतल्या व संध्याकाळी परत दुकान सुरु झाले . संध्याकाळी परत जाताना त्यांच्या चेहर्‍यावर माझ्या मदतीमुळे हसू पसरले. त्यांनी त्यांचा हात माझ्या हातात दिला तो हात खरबरीत होता पण त्यात कृतज्ञता व्यक्त होत होती. मग आठवण म्हणून मी माझ्याकडे चपट्या रोल असलेल्या कॅमेरात आमचा मोकळ्या पटांगणात एकमेव फोटो काढला आणि निरोप घेतला.
        

कोल्हापूरला बी.आर.टोपकर 'आण्णा टोपकर' नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड ( जि.कोल्हापूर ) येथे ७ मे १९२४ रोजी झालेला होता. १९५१ मध्ये ते जी.डी.आर्ट पेंटीग ही पदविका मिळवलेले कलाकार होते. चित्रकलेवर प्रचंड निष्ठा, श्रमांची कोणतीही सीमा ओलांडणारी कुवत, प्रतिभेचा स्पर्श आणि निष्काम कर्मयोग आचरणात आणून विरुद्ध परिस्थितीला सतत सामोरे जात कलेवर असलेली श्रध्दा त्यांनी कधी ढळू दिली नाही. निराश न होता, त्वचेची असह्य व्याधी सोबत असून सांपत्तिक स्थिती चांगली नसूनही ते हौसेने कलाशिक्षक, आर्ट कॉलेजचे प्राध्यापक, मुक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार, म्हणून कलाजीवन जगत राहीले.
         

त्यांच्यासारखाच प्रसंग माझ्यावर एकदा आला होता. 1999 साली मॅप्रो गार्डनमध्ये माझे प्रदर्शन वळवाच्या पावसाने धुवून गेले. असंख्य चित्रे पावसात भिजून वाया गेली. कोणीही मदत केली नाही. त्यावेळी बी.आर.टोपकर सर आठवले. त्यांची कोणतीही आसक्ती न धरता कलेप्रती पूर्ण श्रद्धापूर्वक जीवन जगण्याची ओढ आठवली. सर्व काही संपले असले तरी हातातली कला संपत नाही हे वाक्य आठवले. 'उषःकाल होता होता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला होता. तो संदेश घेऊन मी पुन्हा सावरलो. 


आपण पुन्हा उभे राहून दुःखाच्या यातनांना निर्भिडपणे नव्याने विपरीत परिस्थितीतून जात चित्र निर्मितीला सामोरे जाणारे टोपकर सर प्रत्येक अडचणींच्या प्रसंगावेळी मला आठवत राहतात. चित्रकलेसारख्या अनिश्चित क्षेत्रात अनेक अडचणींना सातत्याने तोंड देऊन जगताना माझे प्रेरणास्थान ठरतात. त्वचेची आग व सतत खाज होताना एकही मिनिट स्वस्थ बसू न देणारी अस्वस्थता मात्र त्यांच्या कलाकृतीत कोठेही दिसत नाही हे टोपकर सरांच्या चित्रकलेचे वैशिष्ठ्य मला कायम स्मरणात राहिले. 
             

आजही मी महाबळेश्वरला गेलो की पूनम हॉटेलच्या चौकात मुद्दाम जातो. थांबल्यावर तिथे त्या बोळात मला टोपकर सर दिसतील. मन लावून चित्र रंगवताना. आजूबाजूला कितीही गर्दी असली तरी सर्वांबरोबर गप्पा मारत सफाईदारपणे कुंचला चालवत गप्पागोष्टी करत कोल्हापूरी स्टाईलने सांगत राहतील 'हा लई बेस्ट स्पॉट होता' असे वाटत राहते.
             

तुम्हीही मुद्दाम महाबळेश्वरला गेला की पूनम चौकात जरूर जा. आता तिथे भव्य असे मोठे अत्याधुनिक पूनम हॉटेल दिसेल. त्याच्या उजव्या बाजूचे छोटेसे बोळ म्हणजे टोपकर सरांची प्रदर्शनाची जागा. त्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताच्या भिंतीवर तुम्हाला दिसेल फूल इंपिरियल साईजमध्ये केलेले जुने पूनम हॉटेलचे चित्र. त्या मालकांनी फ्रेम करून आठवणीने लावले आहे. आणि त्या चित्राच्या खाली सही असेल. ती जरूर पहा. तेथे लिहलेले असेल बी.आर .टोपकर. 

         
मी यापुढे तेथे गेलो की कॉफी पिताना अर्धा कप टोपकरांसाठी जरूर ठेवीन. त्यांची आठवण म्हणून, कारण तेथेच आमची कॉफी घेत पहिली भेट झाली होती. ९७ वर्षाचा खूप मोठ्या प्रदीर्घ प्रवासात अनेक अडचणींचा सामना करत, त्वचेच्या व्याधीला हरवून, अनेक चित्रांच्या आठवणी ठेवून, आता टोपकर सर सर्वांचा निरोप घेऊन खूप खूप लांबच्या प्रवासाला गेले. पैलतीरी......
कधीही परत न येण्यासाठी ........
सुनील काळे

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...