Enquire Now

Request A Quote

एक वादळ शांत झालं !

तसा 'गच्चीवरील गप्पा' कार्यक्रम सुरु झाल्यापासून अलीकडे बऱ्याचवेळा त्याचा व्हाट्सअपवर मेसेज यायचा. शुभेच्छा संदेश किंवा सणानिमित्ताने शुभेच्छा वगैरे. मी उत्तरं द्यायचो, पण नंतर तर रोजच मेसेज यायला लागल्यावर मी त्याकडे दुर्लक्ष  करू लागलो. एकदा दोनदा भरपूर बोलला देखील. लय भारी काम चाललंय तुझं वगैरे वगैरे. मला आपलं उगाचच वाटलं की याला मी 'गच्चीवरील गप्पा'मध्ये निमंत्रित करावं म्हणून तर तो मला सतत मेसेज आणि फोन करत तर नाहीये ना ? कारण मध्यंतरी तो माझ्या अजिबात संपर्कात नव्हता. 


लग्न केलं,  लोणावळ्याला साऱ्यांना घेऊन गेला होता, पण मला काही निमंत्रण दिलं नव्हतं. दिलं असतं तरी मी गेलो असतो की नाही कोणास ठाऊक, कारण मी सहसा लग्न समारंभामध्ये सहभागी होत नाही. पण त्याच्या पत्नीचं दुर्दैवी आजारामुळे निधन झालं तेव्हा आवर्जून लोणावळ्याला गेलो होतो. त्यानंतरही काही दिवस त्याच्या संपर्कात होतो. पण मग असं कळलं की तो दिल्लीला गेला. दिल्लीत त्यानं  धिंगाणा वगैरे घातला. अधनं मधनं फोन यायचा. काय चाललंय कसं चाललंय चौकश्या करायचा. दसरा, दिवाळी, पाडव्याला आवर्जून शुभेच्छा संदेश पाठवायचा. 


एके दिवशी रात्री दोन वाजता त्याचा फोन आला. मला वाटलं आता काहीतरी वाईट बातमी मिळणार. तर फोनवर हा. मी म्हटलं काय रे ? तर तो म्हणाला, काही नाही असाच केला. म्हटलं ही काय वेळ झाली फोन करायची ? कशाला केलास ? तर म्हणाला असाच केला. म्हटलं बरा आहेस ना ? आणि कुठे आहेस ? तर म्हणाला चंदीगडला का कुठेतरी आहे. एका आर्टिस्ट कॅम्पसाठी आलोय. सोबत पाडेकर सुद्धा आहे. रात्री बोलत बसलो तर तुझी जाम आठवण झाली. म्हणून फोन केला. म्हटलं का ? तर म्हणाला ९० च्या दशकात तू जे चार आर्टिस्ट कॅम्प केले होतेस त्या कॅम्पची सर कुठल्याही कॅम्पला नाही हे आज मला इथं जाणवलं. म्हणून तुला इतक्या रात्री फोन केला. म्हटलं तुला आता झाला का तो साक्षात्कार ? हरिहरेश्वरच्या कॅम्पमध्ये धिंगाणा घालताना तुला तो झाला नाही ? तेव्हा तो तुला झाला असता तर नंतर पुन्हा तसे कॅम्प आयोजित करण्यातलं माझं स्वारस्य कधी संपलं नसतं आणि माझी कारण नसताना केलेली बदनामी देखील वाचली असती. चित्रकारांच्या नंतरच्या पिढीचं नुकसान झालं नसतं नाही का ? त्यावर त्यानं काही उत्तर दिलं नाही. पाडेकरशी बोल म्हणाला. तेव्हा तो प्यायलेला होता की नाही हे मला आठवत नाही. पण दिवसा उजेडी देखील तो प्यायलेल्या सारखंच बोलायचा. पण केव्हाही तो जे बोलायचा ते अत्यंत मार्मिकच बोलायचा. अतिशय छान असा सेन्स ऑफ ह्युमर होता त्याला. 


समजा मी जर बोलावलं असतं त्याला एखाद्या गप्पांच्या कार्यक्रमात तर तो काय बोलला असता ? याला त्याला शिव्या देण्याखेरीज दुसरं काही  त्यानं केलंच नसतं, म्हणूनच मी ते होता होईतो टाळलं. पण हा असा त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम मला करावा लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. संपलंय ते आता सारं. एक वादळ शांत झालंय. पण त्यानं जे काही केलं  किंवा केलं नाही याविषयी कलाविश्वात सातत्यानं चर्चा होतच राहील या विषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही. 

येत्या रविवारी म्हणजे १४ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आशुतोष आपटे, चंद्रजीत यादव आणि अभिनव पासून त्याला जवळचा असलेला शाम भुतकर हे सारे माझ्या सोबत त्याच्या सगळ्या कडूगोड आठवणी जागवणार आहेत. तो जसा होता तसाच हा कार्यक्रम देखील वेगळा होईल आणि रव्या अर्थात रवींद्र साळवे जिथून तो बघेल तिथून तो म्हणेल 'आयला, लई भारी कार्यक्रम केला राव' याची देखील मला खात्री आहे
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...