Enquire Now

Request A Quote

निसर्गशिल्पा

९० च्या पूर्वार्धात आर्टिस्ट सेंटर या आता अस्तंगत झालेल्या कलासंस्थेसाठी मी तीन आर्टिस्ट कॅम्प आयोजित केले होते. जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर वगैरे निसर्गरम्य ठिकाणी ते कॅम्प्स होते. त्या कॅम्प्समध्ये त्या काळात ज्यांचं काम मला महत्त्वाचं वाटत होतं असे अनेक तरुण कलावंत मी घेतले होते. त्यातले दोनचार कलावंत सोडले तर आता सारेच कलाक्षेत्रात मोठे नाव कमावून आहेत. 

शिल्पा जोगळेकर ही त्यातलीच. ती आमच्या जेजेचीच विद्यार्थिनी. दूरदर्शनमधल्या त्या काळच्या प्रख्यात निर्मात्या विजया जोगळेकर त्यांची ती कन्या. तिचे कामही त्या काळात थोडंसं वेगळं वाटत होतं आणि पुढं जाऊन ती काहीतरी वेगळं करील असा विश्वास होता म्हणूनच मी तिला कॅम्पसाठी निवडलं होतं. मुरुड जंजिऱ्याच्या कॅम्पमध्ये ती होती. तो कॅम्प अनेक कारणांमुळे गाजला होता. उदाहरणार्थ, आम्ही त्या दिवशी ज्या एसटी स्टँडवरून मुरुडला गेलो तोच एसटी स्टॅन्ड बहुदा दुसऱ्याच दिवशी मुंबईतल्या दंगलींमध्ये संपूर्णतः जळाला होता, इतकंच नाही तर मुंबई नंतर अक्षरशः अनेक दिवस जळत राहिली होती. अशा असंख्य आठवणी त्या कॅम्पशी निगडित आहेत. पण त्याविषयी आता नाही नंतर कधीतरी लिहीन. आता एवढं मात्र आठवतं की त्या कॅम्पमधली शिल्पाची उपस्थिती ही अनेकांच्या दृष्टीनं आकर्षण होती. पण ते एक असो. 

त्या कॅम्पमधले असंख्य कलावंत एकत्र आले होते. ते त्यांचं एकत्र येणं आजतागायत टिकलेलं आहे. तो कॅम्प अनेकांच्या दृष्टीनं टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरणार नाही कारण पौर्णिमेच्या आधी चार दिवस आणि नंतर चार दिवस समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ते दिवस कुणालाही अद्याप विसरता आलेले नाहीत. शिल्पा ही बहुदा त्यातली एक असावी. 


शिल्पाचं पेंटिंग रीतसर सुरूच होतं. तिला सूर सापडायला वेळ लागला होता. मग तिच्या आयुष्यात आला तो रचना संसदचा काळ. रचना संसदनं तिला फाईन आर्ट कॉलेजचा अभ्यासक्रम करण्यासाठी बोलावलं आणि तिच्या हातात सारी सूत्र दिली. त्या कॉलेजची ती चक्क प्राचार्या झाली. तिथं ती टिकली असती तर ते नवलंच ठरलं असतं. कारण तिच्यातला कलावंत सतत जागा होता. 


२००९ च्या सुमारास तिचं दिल्लीच्या त्रावणकोर हाऊस मध्ये प्रदर्शन भरलं होतं. त्या प्रदर्शनाच्या वेळी गॅलरीच्या बाहेर एक झाड कापलेलं तिला पाहावयास मिळालं. किंबहुना तिच्या समोरच ते झाड कापलं जात होतं. तो घटनाक्रम पाहून ती अस्वस्थ झाली. त्या झाडांच्या फांद्या तिनं गोळा केल्या आणि त्यातूनच तिनं एक मांडणी शिल्प साकार केलं. ही तिच्या नव्या कामाची सुरुवात ठरली. त्यानंतर तिनं मात्र कधी मागं वळून बघितलं नाही. भारतातच नाही तर जपान, तैवान, कोरिया, फ्रान्स या देशातून तिला निमंत्रणं आली. आणि तिथं तिथं जाऊन तिनं आपली इंस्टॉलेशन्स केली. प्रामुख्यानं झाडांच्या फांद्यांचा किंवा बांबूंचा वापर करून ती आपली शिल्प साकार करते. अनेकदा तिला पाण्यात दोन दोन तीन तीन आठवडे उभं राहून काम करावं लागलं आहे. पण ती मागे हटत नाही. युट्यूबवर तिच्या कामाच्या फिल्म्स बघितल्या किंवा गुगलवर तिच्या कामाची आणि त्यातल्या आव्हानांची कल्पना येते. 

तिचं  रहाणं देखील मुलखावेगळं आहे. मुंबईत ती १५ दिवस असते पण १५ दिवस मात्र बहुतांशी आपल्या स्टुडिओत. रायगड जिल्ह्यात पालीजवळ एक एकर जमिनीत तिनं आपला स्टुडिओ उभारला आहे. तो स्टुडिओ देखील असाच नैसर्गिक संसाधनं वापरून तयार केला आहे. तिथंही अर्थात पाणी आहेच. आणखीनही बरेच काही प्रकल्प ती करू पहातेय. त्या विषयीच गप्पा मारण्यासाठी ती येत्या शनिवारी गच्चीवरील गप्पांमध्ये येणार आहे. गच्चीवरील गप्पांमधील आणखीन एक चक्रावून टाकणारं व्यक्तिमत्त्व बघायला विसरू नका.  


सतीश नाईक.

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...