Enquire Now

Request A Quote

चित्रकार की चित्रविक्रेता?

सुहास शिलकर हे नाव अनेक दिवसांपासून ऐकून होतो. पण त्याचा प्रत्यक्ष परिचय होण्याची वेळ कधी आलीच नाही. अजूनही आम्ही प्रत्यक्ष असे भेटलेलो नाहीत. सुमारे दहा अकरा वर्षांपूर्वी कधी तरी त्याचा मला फोन आला. 'गायतोंडे' ग्रंथासंदर्भात तो विचारणा करीत होता. मग वरचे वरच त्याचे फोन येऊ लागले. हळू हळू फोनवरील संभाषण वाढू लागलं. 'गायतोंडे' यांच्या चित्रांचा बारकाईनं अभ्यास केला होता. गायतोंडे यांची चित्र नं चित्रं त्यानं अभ्यासली होती. माझ्याप्रमाणेच 'गायतोंडे'त्याचे आयडॉल होते.

गायतोंडे यांना तो दिल्लीत जाऊन प्रत्यक्ष भेटूनसुद्धा आला होता. साहजिकच आमच्या फोनवरच्या गप्पाचे विषय 'गायतोंडे'च असत. गायतोंडे यांच्या विषयी तो अतिशय भरभरून बोलत असे. गायतोंडे यांच्या चित्रांचं तो अगदी सहजगत्या विश्लेषण करत असे. 'गायतोंडे' मूळचे गोव्याचे असल्यामुळे सुहासला त्यांच्याविषयी जरा जास्तच जिव्हाळा होता, आहे. त्यामुळेच की काय गेलं तब्बल एक दशक, किंबहुना अधिक काळ आणि एकमेकांशी फोनवर सातत्यानं संभाषण करीत असतो. 

सुहास हा मूळचा गोव्याचाच. पणजीतच तो वास्तव्यास आहे. तो गोआ स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी. १९८२ साली तो पासआउट झाला. घरचा त्याचा व्यवसाय, साहजिकच नोकरी करायचा प्रश्नच नव्हता. १९८२ साली कॉलेज मधून बाहेर पडल्यावर त्यानं जे पेंटिंग सुरु केलं. ते तो अजूनही सातत्यानं करतोच आहे. गोव्यातून जे चित्रकार सातत्यानं काम करीत आहेत त्यात त्याचं नाव वरच्या श्रेणीत घेतलं जातं. 


त्याचं माझं अधिक जमलं याचं कारण त्याचं वाचन आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणं हे देखील असावं. त्याच बरोबर त्याचं वाचन प्रचंड आहे. चित्रकार असून, त्यातही गोव्यातला असून तो मराठी ललित साहित्याविषयी बरंच काही जाणून आहे. ते देखील त्याच्यात आणि माझ्यात अधिक जमण्याचं कारण असावं. आणखीन एक समान दुवा म्हणजे तो निसर्गदत्त महाराजांचा साधक आहे. मी साधक नाही पण गायतोंडे यांच्यामुळे मी निसर्गदत्त महाराजांचं साहित्य वाचू लागलो. त्यांच्या लोकविलक्षण आयुष्याविषयी समजून घेऊ लागलो. या साऱ्या प्रवासात कधीतरी माझ्या बोलण्यातून निसर्गदत्त महाराजांचा उल्लेख होताच सुहास धडाधड त्यांच्या विषयी बोलू लागला, सांगू लागला. निसर्गदत्त महाराजांच्या कोकणातल्या मूळ गावी देखील जाऊन आला होता. तिथं त्यांचा पुतळा बसवला तेव्हा तो देखील तिथं उपस्थित होता. 


योगी श्री अरविंद यांचं साहित्य देखील त्यांनं पचवलं आहे. त्या बाबतीत कुठलाही संदर्भ लागला की त्याला फक्त विचारायचं तो धो धो बोलू लागतो. आणखीन एक महत्वाचं म्हणजे अस्तित्ववादाचा त्यानं प्रचंड अभ्यास केला आहे. आणि मुख्य म्हणजे  हे सारं त्यानं स्वतःत उतरवायचा प्रयत्न केला आहे. साहजिकच त्याच्या जगण्यात या गोष्टींचा प्रभाव पडला नसता तर ते नवलच ठरलं असतं. 


सुहास पूर्ण वेळ चित्र काढतो. त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. तो भाऊ सांभाळतो. भावाला जर थोडी बहुत मदत लागली तर तो करतो, अन्यथा याचं पूर्ण वेळ चित्र काढणं आणि वाचणं चालूच असतं. सुरवातीला त्याची चित्र काही विकली जात नसत. पण नंतर ती जाऊ लागली. कुठल्याही गॅलरीत प्रदर्शन न भरवता ती जाऊ लागली. पणजीतच त्याचं भलं मोठं घर आणि स्टुडिओ आहे. जेव्हा त्याची चित्रं त्याच्या घरातून किंवा स्टुडिओतून विकली जाऊ लागली तेव्हा त्यानं एक महत्वाची गोष्ट केली ती सहसा कुणीचं आर्टिस्ट करत नाहीत, ती म्हणजे आपल्या त्या भल्या थोरल्या घरात त्यानं आपल्या चित्रांसोबत गोव्यातल्या त्याच्या समकालीन मित्रांची देखील चित्र प्रदर्शित करायला सुरुवात केली. 


त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या चित्रांसोबत त्या मित्रांची चित्र देखील विकली जाऊ लागली. २००७ साली त्यानं पहिल्यांदा हा प्रकार सुरु केला. तो सांगत होता, आजतागायत त्यानं जवळजवळ अशी ५० लाखांची चित्र त्यानं विकली आहेत. त्यासाठी त्यानं आर्टिस्ट मित्रांकडून कुठल्याही प्रकारचं मानधन, मोबदला किंवा कमिशन घेतलेलं नाही. हे सारं तो स्वान्तसुखाय करतो. तो म्हणतो त्यात काही विशेष नाही, मला यातनं खूप आनंद मिळतो. कलासंग्राहकांना देखील नवं काम नवा आर्टिस्ट बघायला मिळतो. आर्टिस्टला देखील त्यानं खूप आधार मिळतो. नवं काम करायला स्फूर्ती  मिळते. कलावंतांनी अशा पद्धतीने काम केल्यास आर्ट गॅलऱ्यांची, विक्रेत्याची गरजच भासणार नाही. 


त्याच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलण्यासाठीच 'चिन्ह'नं  येत्या शनिवारी म्हणजे दि.१३  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५.०० वाजता त्याला 'गच्चीवरील गप्पां'मध्ये आमंत्रित केलं आहे. अवश्य ऐकायला या ! 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...