Enquire Now

Request A Quote

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

सुबोध केरकर विषयी वाचून होतो, ऐकून होतो. त्यांची पहिली एक दोन प्रदर्शनं देखील मी पाहिली होती. तो गोव्याचा असल्यामुळं अर्थातच प्रफुल्ला डहाणुकरानी त्याची माझी ओळख देखील करून दिली होती. त्याच्या प्रदर्शनाला देखील मी गेलो होतो, पण का कुणास ठाऊक त्याचं पारंपरिक शैलीतलं काम काही मला आवडलं नव्हतं, पण त्याचा एकूण वावर आणि धावपळ पाहून मात्र मला असं वाटलं होतं की पुढे हा नक्कीच काही तरी करेल. 


अशीच अनेक वर्ष गेली. मग कुठून कुठून काही काही ऐकू येऊ लागलं. त्याच्या मांडणीशिल्पांविषयीचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. त्यातला एक लेख तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा होता. एकदा तर केतकर यांनी गोव्यातूनच मला थेट फोन केला आणि म्हणाले बोल याच्याशी. हा सुबोध केरकर. मग आमच्या खूप गप्पा झाल्या. केतकर त्याच्या कामाने खूप प्रभावित झाले होते. त्याच्या विषयी अगदी भरभरून बोलत होते. 


त्यानंतर मात्र मी त्याच्या कामाकडे अधिक लक्षपूर्वक पाहू लागलो. गोव्याच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर त्यानं केलेली मांडणीशिल्प मला अतिशय आवडून गेली .  त्याच्या कामातला हा बदल अनपेक्षित आणि तितकाच सुखद होता.  गायतोंडे यांच्या संदर्भात त्याच्यात आणि माझ्यात अधनं मधनं संवाद होऊ लागला. एखाद्याचं काम जर मला आवडलं तर मी त्याला फॉलो करतो. त्याच्याविषयी अधिकाधिक माहिती जमा करू लागतो. सुबोधच्या बाबतीत देखील असंच घडलं. त्याचं हे नवं रूप भलतंच प्रभावी होतं. 

त्याच्या विषयी अधिक जाणून घेतल्या नंतर मग मात्र मी ठरवलं की त्याला केंद्रस्थानी ठेऊन 'चिन्ह'चा एक अंक काढायचा. त्याच्यावर लिहायची जबाबदारी शर्मिला फडके यांनी घेतली. कालांतरानं तो अंक प्रसिद्ध देखील झाला. मी इथं जेवढया सहजगत्या वाक्य लिहिलंय तितक्या सहजपणे तो प्रवास काही झाला नाही. अनंत अडचणी आल्या वर्ष वर्ष दीड वर्ष काम करून, प्रचंड मेहेनत करून देखील आर्थिक अडचणींमुळं भयंकर संकटांचा सामना करावा लागल्यानं अक्षरशः विटून जाऊन मी 'चिन्ह'च प्रकाशन बंद करायचा निर्णय घेतला. 


पण अत्यंत मेहनत करून काढलेल्या या अंकातल्या सुबोध वरच्या लेखानं योग्य ती कामगिरी बजावली होती. सुबोधचं काम आणि त्याची धडपड कलाक्षेत्रातल्या जाणत्या लोकांपर्यत पोहोचवण्यात मात्र आम्ही यशस्वी ठरलो होतो. अत्यंत खर्चिक असा हा अंक होता. त्यामुळे त्याची प्रिंट ऑर्डर खूपच कमी होती. साहजिकच अंक कमी पडला.  'चिन्ह'च्या अत्यंत वाचनीय अंकांपैकी तो एक अंक होता. पण तो अंक 'चिन्ह'चा शेवटचाच अंक ठरला. ही गोष्ट २०१२ - १३ सालची.  ७ - ८ वर्ष झाली त्याला. पण आजही त्या अंकाला सतत मागणी असते.


सुबोध त्या नंतर यशाची एकेक शिखरं चढत जातांना दिसला. हे अर्थात 'चिन्ह'चं कर्तृत्व नव्हतं, ते त्याचं स्वतःचं  कर्तृत्व होतं. गोव्यामध्ये त्यानं स्वतःचं म्युझियम उभारणं हा त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतला कळसाध्यायच ठरला. आता पूर्वीसारखं त्याच्याशी नियमित बोलणं होत नाही. तोही खूप बिझी असतो नव्या नव्या उपक्रमांच्या आखणीत.  समाजमाध्यमाद्वारे मात्र तो काय करतोय हे सतत कळत असतं. म्हणूनच मग ठरवलं की त्याच्याशी एकदा ऑनलाईन गप्पा मारायच्या. त्याच 'गच्चीवरच्या गप्पां'मध्ये सुबोध सहा तारखेला सहभागी होतो.
ऐकायला विसरू नका एका यशस्वी डॉक्टरची, त्याच्या डॉक्टरकी सोडून चित्रकार होण्याची अनोखी कहाणी. 

सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...