काही काही माणसांचा जन्म हाच मुळी मुलखावेगळं आयुष्य जगण्यासाठीच झालेला असतो की काय असं प्रतीक जाधव कडे पाहिल्यावर वाटू लागतं. आता उदाहरणार्थ बघा, गेल्या वर्षी या प्रतीकनं जेजे स्कूल ऑफ आर्ट मधला आपला शिल्पकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण करताना सर्वसाधारण विद्यार्थी असं ठरवतो की आता आपण पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश घ्यायचा किंवा बहुसंख्य विद्यार्थी असं ठरवतात की बस झालं शिक्षण आता आपण नोकरी करायची किंवा काही विद्यार्थी तर धंदा व्यवसाय करायची स्वप्न पाहतात.
प्रतीकनं मात्र हे सारं झुगारून दिलं आणि त्यानं ठरवलं की आपण आता सायकल घेऊन थेट भारत भ्रमणालाच निघायचं. निश्चय केला म्हणजे अर्ध्यावर मोडील तर तो प्रतीक कसला ? सारी जय्यत तयारी त्यानं केली.अगदी व्यवस्थित,रूपरेषा,आरखडा वगैरे आखून त्यानं ती केली.तसा मूळचा तो सडाफटिंग. एकटा जीव सदाशिव. आई वडील लहानपणीच गेलेले. जवळच्या नातेवाईकांनीच त्याला लहानाचं मोठं केलेलं. गाव सोडून शिक्षणाच्या निमित्तानं तो मुंबई सारख्या महानगरात येऊन स्थिरावलेला. अशा परिस्थितीत तो वाया जाण्याचा धोका अधिक होता.
प्रतीकनं या साऱ्यातून मार्ग काढत स्वतःच्या आयुष्याला छानसं वळण दिलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करीत असतानां भारत भ्रमणाची स्वप्न पडू लागली होती. इंटरनेट वापर करून त्यानं व्यवस्थित प्लॅनींग केलं. माणसं तर तो पहिल्यापासून जोडत गेला होता. त्याचा हा संकल्प जाणून त्यातले बहुसंख्य हात त्याच्या मदतीला आले. प्रवासाला लागणार होती सायकल. ती सायकल घेण्यापासूनच त्याला मित्रांनी मदत करायला सुरवात केली. समाजमाध्यमांवर आवाहन प्रसिद्ध होताच शेकडो हात त्याच्या मदतीला आले. ( त्या संदर्भात प्रसिद्ध झालेले लेख 'चिन्ह'च्या याच वेबसाईटवर तसेच 'चिन्ह आर्ट न्यूज'च्या फेसबुक पेजवर वाचावयास मिळतील.)
आणि अखेरीस सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात करून प्रतीक भारत भ्रमणावर निघाला देखील. प्रवास चालू असतांना प्रतीक वेळोवेळी व्हाट्सअँपद्वारे ख्यालीखुशाली कळवत असे. गरज भासलीच तर फोन देखील करत असे. त्याच्या वेबसाईट वर तसेच फेसबुक वर सतत लिहीत असे. काढलेली चित्रे किंवा फोटोग्राफ्स अपडेट करीत असे. अतिशय आनंद व्हायचा ते सारं वाचून आणि कधीमधी त्याचा हेवा देखील वाटायचा. छान लिहीत होता त्याचे एकेक अनुभव. भारतभरची खूप असंख्य माणसं जोडली होती त्यानं. लोककलांचा सुरेख अभ्यास करत चालला होता तो.
कोरोना आला आणि अचानक सारं थांबलं. सिलिगुडी मध्ये होता तो तेव्हा. ज्या घरात तो उतरला होता त्या घरातली सारीच माणसं अनोळखी. आधी कधीही न पाहिलेली. पण ती प्रतीकला सोडीनात. त्याला मुंबईला परतू देईनात. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच त्यांनी त्याला मुंबईला जाऊ दिलं. सायकल आणि थोडं बहुत सामान तिथंच ठेऊन तो आता मुंबईला परतला आहे. सारं स्थिरस्थावर होताच पुन्हा सिलिगुडीला जायचं आणि तिथूनच पुन्हा उर्वरित भारत भ्रमणाला निघायचं असं त्यानं ठरवलं आहे.
मुंबई देखील तो काही शांत बसलेला नाही. बरंच काही त्याच्या आणि मित्रांच्या डोक्यात चालू आहे. ते माझ्याशी शेयर करण्यासाठी मध्यंतरी तो घरी देखील येऊन गेला. त्याचं आणि त्याच्या मित्रांचं प्लॅनिंग ऐकून मी तर चक्रावून गेलो.पण त्या विषयी आता मात्र काहीही सांगू इच्छित नाही पण एवढं मात्र सांगेन की खरोखरच ही सारी मुलखावेगळी मुलं आहेत. यांना जपायलाच हवं. बाकी सारं येत्या शनिवारच्या मुलाखतीसाठी राखून ठेवतोय.