Enquire Now

Request A Quote

जेजेचो माजी विद्यार्थी मालवणी संस्कृतीचो उध्दारकर्तो !

हा माणूस कुठल्या मुशीत बनलाय कुणास ठाऊक ! त्याचं ' व्हाया वस्त्रहरण ' हे पुस्तक वाचताना पदोपदी किंवा पानापानावर आपल्याला हा प्रश्न पडतो . न राहवून मी एकदा ठरवलं की त्यांनाच हा प्रश्न थेट विचारायचा . मला  चांगली संधी देखील मिळाली , म्हणजे एकदा ध्यानी मनी नसताना अचानक ते स्वतः ठाण्यातल्या माझ्या घरी आले , पण भेट एव्हडी अचानक ठरली होती आणि ती इतकी धावती होती की त्यावेळी तो प्रश्न विचारणं मला काहीसं अप्रस्तुत वाटलं . 


ही गोष्ट गेल्या वर्षातली कोरोनाच्या आधीची . पण नंतर  कोरोनाच्याच कालखंडात माझ्या पत्नीनं ' मालवणी मॉल 'ची निर्मिती केली आणि नंतर कधी तरी ' व्हय म्हाराजा ... ' ची कल्पना आमच्या डोक्यात शिरली अन मग मात्र मी ठरवलं की आता मात्र  ही संधी व्यर्थ दवडायची नाही. ' व्हय म्हाराजा .. ' या गजालींच्या  कार्यक्रमाला त्यांनाच पाहिलं बोलतं करून , 'वस्त्रहरण' च्या रूपानं त्यांनी  समस्त मालवणी भाषिकांना , भाषेला किंबहुना संस्कृतीला जे काही जागतिक पातळीवर नेवून ठेवलं आहे त्या बद्दल आपणच आपल्या पद्धतीनं त्यांना सलाम ठोकायचा . (  मालवणी भाषेत ठोकुचो )  


ती संधी पण माका लवकरच गावली . कोरोना लॉक डाऊनमुळे जवळ जवळ वर्षभर जैतापूरच्या माडबनात अडकून पडलेले गंगाराम गवाणकर मुंबईतल्या आपल्या मुलाबाळांना भेटून  माडबनला आता कायमचंच राहायला जायचं , मुंबईत परत  यायचंच नाही या हिशेबानं मुंबईतलं आपलं चंबूगबाळं आवरून निघाले त्याच्या आदल्याच  दिवशी ते थेट आमच्या ठाण्यातल्या घरी उगवले . आणि मग तिथंच ' व्हय म्हाराजा .. ' च्या पहिल्या भागाचं रेकॉर्डिंग झालं .


गप्पांच्या ओघात मला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली . अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या . बोलता बोलता अप्रतिम नकला करून  दाखवल्या  जे जे मधले त्यांचे आणि आमचे देखील सर्वात लाडके शिक्षक  प्रा दामू केंकरे यांची केवळ दोन शब्दांचा वापर करून उचललेली लकब किंवा  नक्कल केवळ लाजबाब होती . त्यांच्या सोबत गप्पा रंगवताना पाच साडेपाच तास कसे गेले हे  आम्हाला  कळलं देखील नाही . 


काय काय सांगितलं त्यांनी . काय काय अनुभव होते त्यांचे ? बापरे ! 'व्हाया वस्त्रहरण ' आधीच वाचलं  होतं , पण त्यांच्या तोंडून त्यातले अंगावर अक्षरश: शहारा आणणारे आणणारे प्रसंग प्रत्यक्ष ऐकताना क्षणोक्षणी थक्क व्हायला होत होतं . ज्या पद्धतीनं गवाणकर अत्यंत निर्लेपपणानं , कुठलाही आविर्भाव न आणता , कुठलाही कडवटपणा न बाळगता सारं  काही सांगत होते , ते केवळ अदभूत होतं . 


पंधराव्या सोळाव्या वर्षी मुंबईत आल्यावर त्यांनी पहिली रात्र दाणेबंदरच्या फुटपाथवर काढली . वडील त्या एरियात हातात किटली घेऊन चहा विकण्याचं काम करीत . सहा बाय चारच्या दरवाजा नसलेल्या खुराड्यात झोपत , जेवायला सदानंद हिंदू हॉटेल आणि झोपायला दाणेबंदरचा फुटपाथ असं मुंबईतलं आयुष्य सुरु केल्यावर या माणसानं बालमजूर म्हणून बांधकामाची घमेली उचलायचं काम सुरु केलं आणि पै पैसा जमवून नाईट हायस्कुलला प्रवेश घेतला . 


इथून त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेई पर्यँत केलेला  त्यांचा प्रवास केवळ अदभूत असाच आहे . दुसरा तिसरा असता तर तो कधीच वाममार्गाला लागला असता आणि या महानगरात लक्षावधी लोक कुठून कुठून येऊन  जसे संपून गेले तसा संपून गेला असता . पण गवाणकरांची जगण्याची आस , जिद्द मोठी होती. त्यांनी स्वतःला अक्षरश: उभं केलं . हे करीत असताना त्यांनी जे जे म्हणून  अनुभव  घेतले ते तुम्हा आम्हाला अक्षरश: भेलकांडावून टाकतात . पण हा माणूस मात्र अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीनं शांतपणे  सारं कथन करीत असतो . 


ज्या नाटकानं गवाणकर यांचं नाव अजरामर केलं आहे त्या ' वस्त्रहरण ' नाटकाची जन्म कहाणी तर आपल्याला थक्क करुन टाकते . जेजेमध्ये असताना पहिल्याच वर्षी त्यांनी ' आज काय नाटक व्होवंचा नाय ' या नावाची एकांकिका लिहिली आणि दामू केंकरे याना वाचायला दिली . केंकरे सरानी  ते स्क्रिफ्ट हरवलं . काही वर्षांनी गवाणकर यांनी ते पुन्हा लिहून काढलं . तेच आजचं सर्वात लोकप्रिय नाटक ' वस्त्रहरण ' . या  नाटकाचा आजवरचा  साराच प्रवास आपल्याला थक्क करून टाकतो . तो कथन करीत असताना गवाणकर कुठंही वावगे शब्द उच्चारित नाहीत , कुणाही  बद्दल साधे कडवट शब्द देखील काढत नाहीत . उलट विनोदाचा आधार घेऊन एकेक किस्सा रंगवून रंगवून सांगत जातात . आणि हेच त्यांच्या ' व्हाया वस्त्रहरण ' या पुस्तकाचं सर्वात  मोठं वैशिष्ट्य ठरलं आहे .


गवाणकर जिथून आले तिथंच म्हणजे माडबनला  आता परत गेले आहेत . 'लॉक डाऊननं माझ्यावर उपकारच केले आहेत 'म्हणाले  .' मुंबईत आता  दोन दिवस देखील राहणं नकोसं वाटलं  .सारं चंबूगबाळं आवरून मी आता तिकडेच राहायचा निर्णय घेतलाय' म्हणाले  . गेली ९ १० महिन्यात खूप वाचलं , खूप लिहिलं . खूप फिरलो . लहानपणी गरी  घेऊन मासे पकडायला जायचो . गावातले जुने मित्र भेटल्यामुळे लहानपणी राहून गेलेल्या साऱ्याच गोष्टी आता करतोय . त्यात आनंद घेतोय . खूप समाधानानं सारं  सांगत होते .


ज्या माणसाच्या केवळ एका नाटकानं मालवणी संस्कृतीला अपरंपार अशी लोकप्रियता मिळवून दिली , लोकमान्यता मिळवून दिली किंबहुना मी तर असं म्हणेन की मालवणी  संस्कृतीचा उध्दार केला आणि राजवैभव मिळवून दिलं त्या गंगाराम गवाणकर यांच्या गजालींनी ' व्हय म्हाराजा ! ' या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे हे आमच्या  मालवणी मॉलचं भाग्यच ! 


सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

जेजेचो माजी विद्यार्थी मालवणी संस्कृतीचो उध्दारकर्तो !

अधिक वाचा

Feature 2

देस परदेस ....

अधिक वाचा

Feature 3

सोलापूरचे शिल्पकार रामपुरे देवरुखला का गेले ?

अधिक वाचा

Feature 4

नवं वर्ष शुभेच्छा , नवे उपक्रम वगैरे ....

अधिक वाचा

Feature 5

बाहुल्यांची ओढ आणि मी ...

अधिक वाचा
12345678910...