वयाची ४५ वर्ष देखील पूर्ण नाही झाली तोपर्यंत प्रफुल्ल सावंत यांनी अक्षरशः गगनाला गवसणी घातली आहे . आज त्यांच्या खात्यावर असंख्य आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रकलेची बक्षिसं , प्रदर्शनं , प्रात्यक्षिकं , शिष्यवृत्या आणि असंख्य पाश्चात्य देशांची आमंत्रण - निमंत्रण इत्यादी जमा आहेत . हे सारं त्यांनी नाशिक सारख्या मुंबईच्या तुलनेनं छोट्या शहरात राहून साध्य केलं आहे . आज प्रफुल्ल सावंत हे सातत्यानं परदेशात जाऊन येऊन असतात .
एक नाही , दोन नाही तब्बल २१ देशात ते आपल्या चित्रांची प्रदर्शनं भरवून किंवा प्रात्यक्षिकं सादर करून आले आहेत . यापैकी काही देशात तर ते चार - चार , पाच - पाच वेळा जाऊन आले आहेत . एकट्या चीनमध्ये आज वर ते ११ वेळा जाऊन आले आहेत . चीनमध्येच त्यांचे दोन सोलो शो झाले आहेत आणि निमंत्रणावरून तब्बल ९०-१०० जागतिक प्रदर्शनांमध्ये ते सहभागी झाले आहेत . याला अपवाद आहे तो फक्त लॉकडाउनच्या या वर्षाचा .
२०१४ सालापर्यंत प्रफुल्ल सावंत नाशिकच्या एका कला महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करीत होते . तीन साडे तीन वाजे पर्यंत कला महाविद्यालयातअध्यापनाचं काम नंतर तासभर विश्रांती आणि मग चार साडे चार वाजता आपल्या स्टुडिओत जाऊन पेंटिंग सुरु केलं कि रात्री उशिरापर्यंत त्यांचं काम सुरूच राहायचं . स्टुडिओत केलेल्या या नियमित रियाजामुळे त्यांची चित्रं ही रसिकांचं लक्ष वेधणारी ठरली नसती तर नवलच ठरलं असतं .
२०१३ साली मात्र एक वेगळीच घटना घडली चीन सरकारच्या निमंत्रणावरून ते काही काळ चीनला जाऊन आले . पाठोपाठ त्यांना मलेशियन सरकारचं देखील निमंत्रण आलं . रजेसाठी अर्ज द्यायला गेले तर कला महाविद्यालयाच्या संचालकांनी त्यांचा अर्ज फेटाळला . खरं तर अशी निमंत्रणं येणं आणि हे जितकं त्या कलावंतासाठी महत्वाचं असतं तितकंच ते तो कलावंत ज्या महाविद्यालयात शिकवतो त्या कला महाविद्यालयाला देखील अत्यंत भूषणावह असतं . त्या शिक्षकाच्या विद्यार्थ्यांना देखील त्यातून खूप काही शिकता येत असतं .
त्या कला महाविद्यालयाच्या संचालकांनी सावंत यांना रजा द्यावयास नकार दिला . म्हणाले ते तिकीट परत देऊन टाका . ते ऐकून प्रफुल्ल सावंत संचालकांच्या केबिनमधून बाहेर पडले आणि मलेशियन सरकारला तिकीट परत पाठ्वण्याऐवजी त्या कला महाविद्यालयाच्या शिक्षक पदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले . त्यानंतरचा इतिहास आपण लेखाच्या सुरुवातीला वाचलाच आहे .
आज प्रफुल्ल सावंत सहा - सात महिने परदेशातच असतात . प्रदर्शनं , प्रात्यक्षिकं आणि प्रवास यात ते इतके गुंतुन गेलेले असतात की २०१३ सालापासून त्यांना भारतात स्वतःची प्रदर्शनं देखील भरता आली नाहीत . पाच -पाच वर्ष आधी बुक केलेल्या जहांगीरच्या तारखा देखील त्यांना रद्द कराव्या लागल्या . ते सांगत होते ' परदेशातल्या प्रात्यक्षिकांचं एक बरं असतं की त्याला आलेले बहुसंख्य विद्यार्थीच तुमचं काम विकत घेऊन टाकतात . त्यामुळे प्रदर्शनं वगैरे भरवायची तशी गरज देखील उरलेली नाही .' वगैरे . मी विचारलं कला महाविद्यालय , अध्यापन वगैरे सोडल्याचं कधी वाईट वाटलं का ? त्यांचं पटकन उत्तर आलं 'नाही , मुळीच नाही . मागे वळून पाहिलं देखील नाही . त्याला वेळ देखील मिळाला नाही . खूप आनंदात आहे मी . चित्रकार म्हणून पूर्ण वेळ जगता येतं यापेक्षा आणखीन काय हवं होतं मला ?'
त्यांचे हे देशापरदेशातले अनोखे अनुभव जाणून घेण्यासाठीच तर 'चिन्ह'नं त्यांना शनिवार दि १६ जानेवारी रोजी 'गच्चीवरील गप्पा' या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे .