Enquire Now

Request A Quote

सोलापूरचे शिल्पकार रामपुरे देवरुखला का गेले ?

" गोरेगावात भाड्यानं स्टुडिओ घेतला होता . जेजेतून शिक्षण घेतल्यानंतरचा तो पहिला स्टुडिओ . पहिला दिवस मुहूर्ताचा . म्हणूनच महत्वाचा , काही तरी करावं म्हणून माती चांगली मळली आणि तिचा चांगला गोळा केला आणि नंतर काय झालं मला ठाऊक नाही . माझ्या हातातला तो मातीचा गोळा मी तसाच टेबलावर ठेवला आणि मग दुसरं काम करायला लागलो. जरा वेळाने त्या मातीच्या गोळ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या मातीच्या गोळ्यात काही तरी साकार झालं 
आहे ." 

" ते दुसरं - तिसरं काही नसून ती माझ्या हातून तयार झालेली एक अगदी वेगळ्या प्रकारची गणेश प्रतिमाच होती . ती चांगली दिसते आहे हे माझ्या लक्षात आलं . म्हणून मग मी त्याचा मोल्ड घेतला . फायबरमधला तो मोल्ड जेव्हा मी फिनिश केला तेव्हा तर तो अतिशय सुंदर दिसू लागला . तोच मोल्ड नंतर मी मागून कापला आणि 'रामपुरे आर्ट' असं नाव टाकलं . स्टुडिओत जे मित्र येतील त्यांना ती प्रतिमा भेट म्हणून देता येईल असा विचार करून मी ते केलं होतं . पण त्याच वेळी माझा एक ग्राहक मित्र स्टुडिओत आला होता . त्यानं ती प्रतिमा बघितली त्याला ती खूप आवडली म्हणून मग मी त्याला ती भेट म्हणून देऊन टाकली . त्याच्या सोबत त्याचा भागीदार आला होता त्यालाही मी ती दुसरी प्रतिमा देऊन टाकली . तीन दिवसाने त्याचा फोन आला मला ते गणपती खूप आवडले . पण मला या दिवाळीला माझ्या ग्राहकांना ती भेट म्हणून द्यायची आहे . मला तिच्या २०० कॉपीज काढून देशील का ?" 

" मी म्हटलं नाही , मी ते फक्त 'रामपुरे आर्ट' तर्फे देण्यासाठीच तयार केलं आहे . पण तो ऐकेच ना म्हणाला गेल्या तीन दिवसात माझ्याकडे ५० लोकांनी या प्रतिमेविषयी विचारणा केली आहे . त्यामुळे या दिवाळीला मी तीच द्यायची विचार केला आहे . हो  नाही  हो नाही म्हणता म्हणता मी अखेरीस तयार झालो . मी विचार केला की दिवाळी आली आहे स्टुडिओतल्या कारागिरांना बोनस वगैरे द्यावाच लागतो , त्यासाठी उपयोगी येईल . मी त्याला होकार दिला . त्यांनी त्या २०० कॉपीजचा ऍडव्हान्स देखील देऊन टाकला . बाकीचे म्हणाला काम पूर्ण झाल्यावर ." 

" मी त्या २०० कॉपीज तर काढल्याचं पण माझ्यासाठी देखील ३०० कॉपीज काढल्या आणि त्या मित्रपरिवारांमध्ये वाटून टाकून दिवाळीसाठी सोलापूरला घरी निघून गेलो . दिवाळीची सुट्टी संपवून आठ दिवसांनी परत आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की माझी मेसेज डायरी संपूर्णपणे भरून गेली होती . कोणाला एक गणपती हवा होता तर कुणाला दोन , कुणाला पाच हवे होते तर कुणाला दहा तर कुणी कुणी पन्नास-पन्नासची कॉपीजची ऑर्डर नोंदवली होती . झाडाला फुटलेल्या फांद्यांसारखं झालं होतं जिथं जिथं त्या कॉपीज गेल्या होत्या तिथून तिथून मागणी आली होती . मी अक्षरशः थक्क झालो होतो . जणू काही गणपतीनेच माझ्यावर कृपा केली होती . १९९३ साली मी भाड्याच्या जागेत स्टुडिओ उघडला होता . पण त्या गणपतीच्या प्रतिमेनं असा चमत्कार घडवला की अवघ्या एका वर्षात  म्हणजे १९९४ सालीच मी स्वतःच्या मालकीच्या जागेत शिफ्ट झालो आणि लगेचच १९९५ साली मी मुंबईत स्वतःच्या मालकीच्या घरात देखील शिरलो . "

भगवान रामपुरे सांगत होते आणि मी फक्त आ वासून ऐकत होतो. त्यानंतर मुंबईतच नाही तर सारीकडेच रामपुरे यांचे गणपती दिसू लागले . आज आपण कुठल्याही गाडीमध्ये डॅशबोर्डवर देखील जो गणपती पाहतो तो रामपुरें यांचाच असतो . इतका त्या स्टुडिओत पहिल्या दिवशी तयार झालेल्या गणपतीने चमत्कार घडवला होता . भगवान रामपुरे यांचं नाव तिथूनच सर्वोतोमुखी झालं . 

त्यानंतरचा इतिहास आपल्याला ठाऊकच असतो . म्हणजे उदाहरणार्थ विजय तेंडुलकर , गुलजार , हृदयनाथ मंगेशकर , डॉ श्रीराम लागू , दिलीप प्रभावळकर , अमीर खान अशा अनेक दिग्गजांची शिल्प रामपुरे यांनी साकारली . पण एवढं यश मिळून देखील रामपुरे कधीच संतुष्ट राहिले नाहीत . सतत झपाटल्यासारखं काम करत राहिले . एखाद्या स्थलांतरिता सारखं इकडून तिकडे जात राहिले . सोलापूरहून मुंबई , मुंबईहून पुणे , पुण्याहून परत सोलापूर आणि आता सोलापूरहून वयाच्या ६०व्या  वर्षी ते कोकणात देवरुख येथे येऊन स्थायिक झाले आहेत . 

देवरुखच का ? तर त्यांच्या पत्नीला राधिकाला कोकणात फिरायला गेले असताना दृष्टांत झाला म्हणून . तिथं एक सहा एकर जागा घेऊन ते या वयात स्वामी समर्थांचं शिल्प चरित्र साकार करणार आहेत . या वयात हे सारं करणं खूपच मोठा धाडसी निर्णय होता . पण त्यांनी तो घेतला . ते सांगत होते 'ठाऊक नाही मला किती वर्ष लागतील हा प्रकल्प पूर्ण करायला . कदाचित १० -१२ वर्षात तो पूर्ण होईल कदाचित १५ वर्षही लागतील . पण मी माझ्या मनाची तयारी केली आहे . सोलापूरचा स्टुडिओ मुलाच्या ताब्यात सोपवून इथं येऊन स्थायिक झालो आहे .' आज सकाळीच सांगत होते कुठल्याही क्षणी जागा ताब्यात येईल . घर वगैरे तर मी आधीच घेऊन मोकळा झालो आहे . प्राथमिक काम देखील सुरु झालं आहे . 

हे सारंच चकरावून टाकणारं आहे . मला कितीही प्रश्न पडले तरी मी काही ते विचारायचे थांबत नाही आणि रामपुरे देखील उत्तर देताना थकत नाहीत . असं सगळं असलं तरी माझ्यापाशी काही प्रश्न शिल्लक आहेतच आणि तेच सारे मी ०९ जानेवारीच्या 'गच्चीवरील गप्पां'मध्ये रामपुरे यांना जाहीरपणे विचारणार आहे . यावेळीच्या गप्पा देखील चुकवू नका .   
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

जेजेचो माजी विद्यार्थी मालवणी संस्कृतीचो उध्दारकर्तो !

अधिक वाचा

Feature 2

देस परदेस ....

अधिक वाचा

Feature 3

सोलापूरचे शिल्पकार रामपुरे देवरुखला का गेले ?

अधिक वाचा

Feature 4

नवं वर्ष शुभेच्छा , नवे उपक्रम वगैरे ....

अधिक वाचा

Feature 5

बाहुल्यांची ओढ आणि मी ...

अधिक वाचा
12345678910...