Enquire Now

Request A Quote

नवं वर्ष शुभेच्छा , नवे उपक्रम वगैरे ....

'चिन्ह'च्या सर्व फेसबुक फ्रेंड्स , वाचक आणि हितचिंतकांना नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा ! 

कोरोना कालखंडात सुरु झालेला प्रश्न'चिन्ह' ज्याचं नामकरण नंतर 'गच्चीवरच्या गप्पा' असं झालं , तो कार्यक्रम अत्यंत अल्पावधीत चांगलाच रुळला आहे . त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं . चित्रकार देखील तो कितपत पाहतील याविषयी मनात खरं तर शंकाच होती , मग सर्वसामान्य प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची अपेक्षा करणं दूरच राहिलं  . 

पण झालं उलटंच सर्वसामान्य कलारसिकांनी तर तो उचलून धरलाच पण चित्रकारांनी देखील त्याला चक्क प्रतिसाद दिला आहे . हे खरोखरच धक्का  देणारं आहे . 'चिन्ह'च्या कट्टर वाचकांनी मात्र हा ही उपक्रम प्रचंड उचलून धरला . फेसबुकवर तो कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांची नोंद सेकंदासेकंदाला होत असते . साहजिकच कार्यक्रम यशस्वी झाला की नाही किंवा किती प्रेक्षकांनी पाहिला हे लगेचच जाणून घेता येतं . 

कार्यक्रम चालू असताना सतत फिरणारे , वाढत जाणारे हे आकडे अक्षरशः डोळे विस्फारून टाकतात . कोणे एके काळी दीड दोन हजार प्रतींनी सुरु झालेला 'चिन्ह'चा प्रवास ( ज्या प्रती संपवताना प्राण अगदी कंठाशी यायचा ) आज फेसबुकवरचे सतत फिरणारे आकडे किंवा गुगल स्टॅटिस्टिक द्वारे मिळणारे वेबसाईटच्या वाचक प्रतिसादाचे आकडे अक्षरशः मती गुंग करून टाकतात . १९८६ साली धडपडत सुरु झालेल्या या प्रवासाला जागतिकीकरणामुळे असं काही वळण मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं . 

कोरोना कालखंडामुळे तर या साऱ्या प्रवासाला एक आणखीन मोठं वळण मिळालं हेही अनपेक्षित होत . कोणे एके काळी एक अंक साधारणपणे आठ - दहा लोकांपर्यंत पोहचतो असं गृहीत धरलं जात असे , म्हणजे एक हजार अंकांची आवृत्ती साधारणपणे सात - आठ किंवा फार तर नऊ हजार लोकांपर्यंत पोहचत असे , त्या पार्श्वभूमीवर आता सुरु असलेला लाईव्ह कार्यक्रम संपेपर्यंतच अक्षरशः कितीतरी हजार लोकांपर्यंत पोहचतो . इतकंच नाही तर नंतरही असंख्य रसिक फेसबुकवर कुणाच्या तरी शिफारशीवरून तो सतत पाहत राहतात आणि आता तर यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमाने जे फेसबुकवर कार्यरत नाहीत अशांपर्यंत देखील सहजपणे पोहचता येतं . ( ती आकडेवारी अर्थातच पुन्हा वेगळी ) हे सारंच मती गुंग करून सोडणारं आहे . कधी कधी मनात विचार येतो की आपण आणखीन आठ - दहा वर्ष उशिरा जन्मलो असतो तर बरं झालं असतं . आणखीन नवे नवे प्रयोग , उपक्रम करता आले असते . पण ते असो . 

नवं वर्ष दिनानिमित्ताने एक - दोन छोट्या घोषणा करीत आहोत . उदाहरणार्थ www.chinha.co.in ही आमची वेबसाईट आता आठवड्यातून निदान तीन वेळा तरी नक्कीच अपडेट केली जाणार आहे . कोरोना कालखंडामुळे या वेबसाईटची इंग्रजी आवृत्ती रखडली गेली ती देखील लवकरच सुरु करायचं ठरवलं आहे . त्यामुळे मराठीच नव्हे तर जगभरातल्या वाचकांपर्यंत इथल्या कलाविषयक घडामोडी देखील अनायासे जाऊ शकतील . हे सारे लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे . 

१ मे २०२० रोजी ' जेजे जगी जगले'चं प्रकाशन ठरलं होतं पण कोरोना लॉकडाऊनमुळे सारं काही जागच्या जागी थांबलं . सदर ग्रंथ आता २०२१ च्या पूर्वार्धात प्रसिद्द होईल तर उत्तरार्धात ' व्यक्तिचित्रं पण शब्दातली ' . त्याविषयीचे अपडेट्स फेसबुक , इन्स्टाग्राम तसेच इथं वेळोवेळी मिळतच राहतील . 

पुन्हा एकदा सर्वांना नवं वर्षाच्या मनापासून शुभेच्छा !
सतीश नाईक  

Top Features

 

Feature 1

जेजेचो माजी विद्यार्थी मालवणी संस्कृतीचो उध्दारकर्तो !

अधिक वाचा

Feature 2

देस परदेस ....

अधिक वाचा

Feature 3

सोलापूरचे शिल्पकार रामपुरे देवरुखला का गेले ?

अधिक वाचा

Feature 4

नवं वर्ष शुभेच्छा , नवे उपक्रम वगैरे ....

अधिक वाचा

Feature 5

बाहुल्यांची ओढ आणि मी ...

अधिक वाचा
12345678910...