Enquire Now

Request A Quote

बाहुल्यांची ओढ आणि मी ...


'चिन्ह'नं  येत्या ०९ जानेवारी रोजी मुंबईच्या तरुण चित्रकार भावना सोनवणे यांची बाहुल्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे . लॉकडाउनच्या काळात भरपूर वेळ मिळाला आणि आपल्या मुलीला शिकवण्यासाठी म्हणून त्यांनी बाहुल्या करायला घेतल्या .  त्यात त्या गुरफ़टूनच गेल्या . त्यांची ही नवं निर्मिती पाहून 'चिन्ह'नं बाहुल्यांच्या कार्यशाळेची कल्पना मांडली जी त्यांनी उचलून धरली . या कार्यशाळेच्या निमित्तानं त्यांनी लिहिलेला हा छोटा लेख .   

 पूर्वी गल्लीत, लहान मुलंमुली जमून जिन्याखाली भातुकली मांडून घर संसाराचा खेळ खेळायची. त्यातच कोणी नटून थटून भटजी बनून अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणून अगदी  गुळ शेंगदाणे फुटाण्यांचा खाऊ वाटून बाहुला बाहुलीची लग्न देखील लावायची. यातूनच घर, नाती व घराची ओढ प्रकर्षानं जाणवत असे. खेळणी म्हटलं की पूर्वीपासून बाहुल्या महत्वाच्या होत्याच की. अगदी नाजूक नसतील पण छान परकर पोलकं .. साडी नेसून नटलेल्या बाहुला बाहुलीचा खेळ लहानपणी कोणी खेळलं नाही असं कोणीच नसेल. 


भारतभर विविध प्रांतात त्या त्या ठराविक राज्याप्रमाणे तेथील ठराविक पोषाखात या बाहुल्या घराघरातून हातानं बनवल्या व मिरवल्या जायच्या. त्या बाहुल्यांच्या चेहऱ्यांचे मुखवटे, नथ, बांगड्या, मण्यांनी नटलेले सर्व साजही ठराविक दुकानांमध्ये उपलब्ध होत असत. सोलापूरला गड्डा नावाचे मार्केट भरते. तेथे, बालीश, तरूण, म्हातारी, सावळी किंवा गोऱ्या चेहऱ्यांची , नवरी, नर्तिका, नवरा मुलगा, म्हातारा, शिक्षिका इ. सर्वच मुखवटे अगदी आता आता पर्यंत मिळायचे. 


माझ्या लहानपणी शेजारच्या ताईचे वडिल कलाकार होते. ते शूटींग निमित्त महाराष्ट्राबाहेर गेले की तिच्यासाठी बाहुल्यांचे सामान आणत. त्यांनी जयपूरहून दीड दोन इंचाचे मीरा, राधा, मणिपुरी नर्तिका, कथ्थक वगैरेचे मुखवटे आणले व सोबत मण्यांचे दागिनेही. एके दिवशी ताईनं समोरच्या काचेच्या कपाटात त्या बाहुल्या मांडल्या. ते तिच्या तरूणपणात केलेल्या बाहुल्या अगदी फिल्मी नट्या जणू आशा पारेख, वहिदा रहमान, शर्मिला टागोर, हेलन, मुमताज यांच्या प्रतिकृती प्रमाणे भासत होत्या. माझी आई सांगत असे, मेरा नाम जोकर फिल्म रिलीज झाल्यानंतर काही ठिकाणी लाकडी जोकरही बाजारात मिळू लागले होते. सुरूवातीचे सोपी बाहुली बनविण्याचे धडे आईनं दिले. पण नंतर मी त्या ताईकडून  ही कला शिकण्यासाठी धडपडू लागले. त्यानंतर स्वत: प्रयोगही केले. मध्यंतरी दादरच्या सौभाग्य वस्तू भांडार मध्ये कापड व कागदाचे चेहरे विकत मिळाले. पण इतर सामग्री स्वत: तयार करावी लागली आणि ती इवलीशी बाहुली संपूर्ण तयार व्हायला महिना घेऊ शकते हे लक्षात आलं. 

भारताबाहेर इतर देशातही पोर्सेलीन, माती , लाकूड वापरून बाहुल्यांचे चेहरे, हात वगैरे अतिशय लोभस बनवलेले दिसतात.
मी पॅरीसमध्ये एका खाजगी बाहुली संग्रहालयाला भेट दिली होती. तेथे त्या कलाकाराने काही खूप जुन्या बाहुल्या मांडल्या होत्या. त्याच्या मुलांचे फोटो व शेजारी त्या लेकरासारखी दिसणारी व तसेच कपडे घातलेली बाहुली. किती सुंदर कल्पना आहे नाही ही ! तसंच दिल्लीला एक मोठे बाहुल्यांचं संग्रहालय आहे. तेथे जगातील जुन्या व नव्या बऱ्याच विविध बाहुल्या जतन केलेल्या आहेत. ते पाहिल्या पासून मी माझ्या या जुन्या छंदाच्या अधिक प्रेमात पडले.

साधारण 1959 मध्ये बार्बीनं बाजारात पदार्पण केलं पण तिला भारतात घराघरात पोहोचायला अधिक वेळ लागला. मी शाळेत असताना एखाद्या मुलीकडे ही महागडी ओरिजीनल बाहुली असणे ही इतर मुलींसाठी हेवा वाटण्याचा विषय ठरत असे.  बार्बीनं  जणू लहान मुलींना बालवयातच तिच्या फिगरची भुरळ घातली. नंतर ती महागडी बार्बी वेगवेगळ्या कमी जास्त आकारात व किंमतीत उपलब्ध होऊ लागली. भारतात भारतीय वेशभूषा, स्पेन मध्ये तो लांब फीलवाला फ्रॉक, अमेरिकेत  सॅटीन गाऊन , कधी ऑफिससाठी तयार तर कधी पार्टीला सजून निघालेली अन् कधी स्विमींग सूट मधली फीट बार्बी. हळूहळू तिचे  नातेवाईकही बाजारात डोकावले.  नंतर डिस्ने कंपनीने  निर्माण केलेले ऍनिमेशन कॅरेक्टरही बाजारात आणले. आज स्नो व्हाईट, सिंड्रेला, फ्रोझन , मोआना वगैरेनी खेळण्यांची दुकानं भरलेली असतात. मोआना माझी व माझ्या लेकीची आवडती ठरली. मोआना बार्बी पेक्षा खूप वेगळी, ही सतत मेकअप मधली गोरीपान स्लीम मुलगी नसून सावळी कुरळे केस असलेली साधारण पोशाखातली एक कोळी आदिवासी पण अत्यंत धीट मुलगी आहे. 

खेळण्यात जशी सुधारणा होऊ लागली तसं प्लास्टीक माध्यम फिनीशींगसाठी व हालचालीसाठी खूप महत्वाचं ठरलं . हे सर्व खेळण्याचं जग आता प्लास्टीकच्या आधारावर बांधलं जातंय. तसेच आता जास्तीत जास्त चायनामेड बाहुल्याही बाजारात आहेत.

पण या हातानं बनवलेल्या बाहुल्यांचा आनंद निराळा. आता कित्येक वर्ष झाली.व्यावसायिक चित्रकारी करता करता गेली वीस वर्ष ही माझी आवड जोपासायला वेळ मिळाला नाही पण ह्या लॉकडाऊन मध्ये माझ्या लेकीसाठी खेळणी करायला घेतली आणि त्यात मी ही अगदी लहान होऊन रमले. आता कलाकार म्हणुन वाटतं की या विषयाकडेही थोडं अधिक वळायला हवं . नैसर्गिक म्हणा किंवा टाकाऊपासून टिकाऊ म्हणा हवं तर ही हस्तकला आपण नव्या पिढीनं जोपासायला हवी.
भावना सोनवणे.

Top Features

 

Feature 1

काव काव काव काव...!

अधिक वाचा

Feature 2

अस्वस्थ करणारं गायतोंडेंचं केलिडोस्कोपिक दर्शन !

अधिक वाचा

Feature 3

काक स्पर्श

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडेनं मला आतून झिंझाडून टाकलं !

अधिक वाचा

Feature 5

आठवणीतले सोलापूरकर सर !

अधिक वाचा
12345678910...