Enquire Now

Request A Quote

अफाट आणि बेफाट ...

एखादा कलावंत मला ठाऊक नसेल तर सर्वसाधारणपणे मी त्यावर कधीही लिहीत नाही . जरी पत्रकारितेत होतो तरी माहित नसलेली गोष्ट आधी माहित करू घेऊन नंतर त्यावर लिहिणे वगैरे गोष्टींचा मी सदैव कंटाळाच केला . आता अलीकडेच जो 'गच्चीवरील गप्पां'चा कार्यक्रम आम्ही सुरु केला आहे . त्यातल्या बहुसंख्य लोकांना मी आधीपासूनच ओळखत असल्यामुळं या कार्यक्रमाच्या आधी काही पूर्व तयारी करायची वेळ अशी माझ्यावर आतापर्यंत  कधी आलीच नाही .  

याला अपवाद ठरला आहे तो शेखर नाईक यांच्या नावाचा . त्यांच्याविषयी मला काहीच ठाऊक नव्हतं . त्यांचं नाव मी पहिल्यांदा वाचलं ते  'तुझी आम्री' या नाटकाच्या जाहिरातीत . अमृता शेर गिलसारख्या कलावंतांवर कुणीतरी नाटक करतंय  आणि करणारी व्यक्ती चक्क पुण्यातली आहे . हे कळल्यावर मला अधिकच धक्का बसला . 

या नाटकाचा पहिला प्रयोग जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये होता . पण या मातृसंस्थेविषयी माझं काही फारसं चांगलं मत राहीलं नसल्यामुळं मी तिथं जाणं चक्क टाळलं . खरं तर ते योग्य नव्हतं पण तिथं जावून जेजेची आत्ताची अवस्था माझ्याच्यानं बघवली नसती . पण ते असो . नंतर मुंबई - ठाण्यातही काही प्रयोग झाले पण कामातील व्यस्ततेमुळे मला काही जाता आलं नाही . पण एवढं मात्र लक्षात आलं की अमृता शेर गिल हा विषय घेणाऱ्या दिग्दर्शकावर आपण लक्ष ठेवायला हवं . 

आणि मग एके दिवशी असं लक्षात आलं की हा माणूस आपल्या फेसबुकच्या मित्र यादीत आहे . आणि मग हळूहळू तपशील कळतं गेला की हा माणूस चक्क पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे . इतकंच नाही तर प्रख्यात चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडं त्यानं दोन वर्ष व्यक्ती चित्रणाचा देखील अभ्यास केला आहे आणि आपल्या चित्रांची दोन प्रदर्शनं देखील भरवली आहेत वगैरे . 

कोरोना काळ सुरु व्हायच्या आधीची ही गोष्ट . याच कोरोना काळात कधीतरी ऑनलाईन गप्पा करायचं मनात आलं आणि त्यातनंच प्रश्न'चिन्ह' अर्थात 'गच्चीवरील गप्पा' या कार्यक्रमाचा जन्म झाला . कोरोना काळ संपताच ' तुझी आम्री ' नाटकाचे प्रयोग सुरु झाले आणि मी ठरवलं की एखाद्या शनिवारी या माणसाला आपल्या गप्पात सहभागी करून घ्यायचं . 

फोन केला तर पलीकडून अगदी सहज परिचय असल्यासारखं उत्तर आलं . 'बोला सर ' आणि मग ०२ जानेवारीची तारीख नक्की झाली . त्यांच्याविषयी खरं तर मला 'तुझी आम्री ' या नाटकाखेरीज काहीच ठाऊक नव्हतं पण त्यांनी त्यांची माहिती , वेबसाईट , फोटो , कात्रणं इत्यादी पाठवलेलं पाहून मी अक्षरशः थक्क झालो . 

५० वर्षाच्या आयुष्यात या माणसानं काहीही करायचं शिल्लक ठेवलेलं नाही . आर्ट स्कूलमध्ये प्रवेश काय घेतला , चांगलं शिकवत नाही म्हणून कॉलेज सोडून काय दिलं , मग चित्रकार देउस्करांकडे दोन वर्ष काय शिकला , मग पुन्हा मनात आलं म्हणून काय कॉलेजात प्रवेश काय घेतला नंतर दोन - दोन डिप्लोमे काय घेतले . 


मग नाटकात काय शिरला , तेंडुलकर , आळेकर , प्रभावळकर यांच्या एकांकीका  काय दिग्दर्शित केल्या ,  सतीश आळेकरांच्या एकांकीकांचा महोत्सव काय केला , हे सारं कमी पडलं म्हणून की काय जाहिरात क्षेत्रात शिरला , जाहिरातपटांचं  दिग्दर्शन आणि निर्मिती काय करू लागला , हे ही कमी पडलं म्हणून की काय मराठी चित्रपटांच्या निर्मितीत शिरला , मराठी चित्रपट  ' उरूस '  ' श्री सद्गुरू जंगली महाराज ' 'जय शंकर ' आणि पुलं देशपांडे  यांच्या कथेवरचा 'म्हैस ' यासारख्या चित्रपटांची निर्मिती काय करून बसला , हे देखील कमी पडलं म्हणून की काय कुणास ठाऊक 'गुरुदत्त  आणि  गीता दत्त ' यांच्या गाण्यांवरचा 'गुरुगीता ' हा कार्यक्रम काय सादर करू लागला . सारंच अफाट आणि बेफाट . 

प्रत्येक ठिकाणी स्वतःच उभं राहायचं , प्रचंड अभ्यास करायचा आणि नंतर त्यात स्वतःला अक्षरशः झोकून द्यायचं असा सारा खाक्या . सारं त्याच्याविषयीच्या  माहितीतून वाचून आणि ते जाणून घेण्यासाठी त्याच्याशी फोनवर प्रदीर्घ संभाषण करताना मी तर अक्षरशः थकून गेलो . मी त्याला म्हटलं देखील ' आपल्या गप्पा किती तास चालणार आहेत कुणास ठाऊक ? ०२ जानेवारीला सायंकाळी ०५. ०० वाजता ते सारं पाहायला मी देखील तुमच्या इतकाच उत्सुक आहे . तर भेटूच ०२ तारखेला सायंकाळी ०५. ०० वाजता . 
सतीश नाईक  

Top Features

 

Feature 1

जेजेचो माजी विद्यार्थी मालवणी संस्कृतीचो उध्दारकर्तो !

अधिक वाचा

Feature 2

देस परदेस ....

अधिक वाचा

Feature 3

सोलापूरचे शिल्पकार रामपुरे देवरुखला का गेले ?

अधिक वाचा

Feature 4

नवं वर्ष शुभेच्छा , नवे उपक्रम वगैरे ....

अधिक वाचा

Feature 5

बाहुल्यांची ओढ आणि मी ...

अधिक वाचा
12345678910...