Enquire Now

Request A Quote

आम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...

जेजे मध्ये शिकत होतो तेव्हापासूनच मला चित्रकला शिकणाऱ्या पण वेगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताविषयी उत्सुकता वाटत आली आहे . उदाहरणार्थ दादासाहेब फाळके, दामू  केंकरे, प्रमिला दंडवते, रघुवीर तळाशिलकर, मोहन वाघ, रमाकांत देशपांडे, इर्शाद हाशमी,  प.शरद साठे, भानू अथय्या   नंतरच्या पिढीतले अमोल पालेकर, नाना पाटेकर, मंगेश कुलकर्णी, मीना नाईक, प्रिया तेंडुलकर किती म्हणून नावं सांगू ?  त्यातूनच मग मला 'चिन्ह'च्या पहिल्या अंकासाठी लेखमाला सुचली. "जेजे जगी जगले" जी नंतर खूपच गाजली आणि ती आता लवकरच  ग्रंथरूपात प्रसिद्ध होऊ घातली आहे. 

महाराष्ट्रात जी अन्य कला महाविद्यालयं आहेत. त्यातील अशा वेगळ्या वाटा निवडलेल्या कलावंतांची देखील आत्मकथनं मला प्रसिद्ध करायची होती पण 'चिन्ह'चं अवतारकार्य संपलं आणि ते राहूनच गेलं. लॉक डाउनच्या काळात फेसबुक लाईव्हचा पर्याय समोर आला आणि मग ते सारेच विषय पुन्हा एकदा वर डोकं काढू लागले. 'चिन्ह' आणि प्रश्न'चिन्ह'च्या गप्पाना मिळणारा  प्रचंड प्रतिसाद पाहून दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी करायची कल्पना आली आणि 'दिवाळीचे चार दिवस' अंतर्गत चार प्रतिभावंताशी गप्पा मारायचं  निश्चित केलं. 

पहिलं नाव सुचलं ते अर्थातच सुनील बोरगांवकर यांचं. माझा चित्रकार मित्र प्रकाश वाघमारे याचा सुनील हा जवळचा मित्र. सुनीलच्या गाण्याविषयी मी आधीपासूनच ऐकून होतो पण ते प्रत्यक्ष ऐकायचा योग मात्र कधी आला नव्हता. आणि मग प्रकाशमुळेच माझ्यात आणि सुनीलमध्ये हळूहळू संभाषण होऊ लागलं. नंतर कधीतरी पळशीकरांच्या शताब्दी वर्षात त्याचं गाणं ऐकायचा पहिल्यांदाच योग आला. सुनील ज्या पद्धतीने तानपुरा लावत होता ते पाहिल्यावरच माझ्या लक्षात आलं गडी भलताच तयारीचा आहे. 

सुनीलची ती सारीच मैफल मला अतिशय आवडली. त्या मैफिलीच्या वेळी अनेकदा मला का कुणास ठाऊक अमीर खा साहेबांचं स्मरण होत होतं. सुनील ती मैफिल मला इतकी आवडली की मला त्या मैफिलीवर लिहिल्या वाचून रहावेना. गाण्यावर लिहिणं हे माझं क्षेत्र नसतानाही मी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती खूपच वाचली गेली. 

सुनिलचं आणि माझं आता अधनं मधनं फोनवर बरंच बोलणं होऊ लागलं. मीही लहानपणापासून खूप संगीत ऐकलंय. शेकडो कॅसेट्सचा संग्रह केलाय तसेच संगीतासंबंधी १९७५ सालापासून आलेले लेख देखील मी जपून ठेवले आहेत. हे कळल्यावर तर आमच्या दोघातलं संभाषण अधिकच वाढत गेलं. मग आम्ही एक संगीत या विषयावरचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्या मुळे संगीताची आणि माहितीची खूप देवाण घेवाण होऊ लागली. एके दिवशी सुनीलनं मला चांगलाच धक्का दिला. अमीर खा साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यानं अमीर खा साहेबांवर लेख लिहिला आणि तो त्या ग्रुपवर पोस्ट केला. अतिशय सुंदर लेख होता तो. माझ्या नजरेतून सुटलेली अमीर खा साहेबांवरची फिल्म्स डिव्हिजन तयार केलेली एक सुंदर फिल्म त्यानं त्या लेखासोबत पोस्ट केली होती. त्या लेखानं आणि फिल्मनं आमच्यातला संवाद अधिकच वाढत गेला. 

एके दिवशी तर त्यानं मोझार्टवर लेख लिहून मला पाठवला. तो वाचल्यावर तर मी अक्षरशः आवाक झालो. सुनीलनं कुठून कुठून काय काय घेतलं आहे आणि आपलं गाणं आणि व्यक्तिमत्व समृद्ध केलं आहे. याची जाणीव करून देणारं ते लिखाण होतं. हे दोन्ही लेख प्रश्न'चिन्ह' या फेसबुक समूहावर आम्ही प्रसारित करणार आहोत. अवश्य वाचा. 

दिवाळीचे चार दिवसमध्ये निवड करताना सहाजिकच सुनीलचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. पण सुनील काही तयार होईना. 'मी या साऱ्यापासून लांब असतो. सोशल मिडीया देखील हाताळत नाही. सतत संगीतावर विचार, रियाझ आणि उरलेल्या वेळात चित्रं काढणं असा माझा दिनक्रम असतो. त्यामुळे तुम्ही म्हणता ते मला जमणार नाही' असं सुनीलने ठामपणे सांगून टाकलं. तो म्हणत होता ते अगदी खरं होतं. तो खरोखरच कुठंही नसतो. स्वतःतच असतो. केवळ माझ्या आग्रहामुळे तो 'चिन्ह'च्या शास्त्रीय संगीत समूहात सहभागी झाला होता. त्यावेळी मला आणि अन्य सदस्यांना त्याच्याकडून बरंच काही शिकता आलं होतं. दुर्दैवानं तो समूह त्यातल्या काही सभासदांच्या नको त्या पोस्ट फॉरवर्ड करण्याच्या वृत्तीमुळे अचानक बंद करावा लागला त्याचं त्याला अतिशय दुःख झालं. कालांतरानं आम्ही एक समूह स्थापन केला आहे पण तो फक्त शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित आहे. 

सुनील बाकी कशातच नसतो. आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग देखील तो शिष्यांना करू देत नाही. त्याचं नॅशनल गॅलेरीतलं गाणं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं तर त्यानं ती पोस्ट त्याच्या शिष्यांना तातडीनं काढायला लावली होती. याला बहुदा मैत्रीमुळे फक्त मीच अपवाद असावा. या लेखासोबत देण्यासाठी मी त्याच्याकडे रेकॉर्डिंग मागितलं तर म्हणाला माझ्याकडे काहीच नाहीये. मिळालं तर पाठवतो. मी त्याला म्हटलं 'जमुना के तीर' पाठव. तर तो म्हणला प्रयत्न करतो. ते नाहीच मिळालं त्याला. मग प्रकाशकडून मी त्याने काढलेला व्हिडीओ मिळवला. जो सोबत दिला आहे. 

असा हा सुनील. गेल्या महिन्यात आम्ही फोनवर प्रदीर्घ काळ बोललो. तेव्हा त्यानं आपला चरित्रपट मला उलगडून दाखवला. त्याचा आजवरचा साराच प्रवास अफलातून आहे. पण त्यावर मात्र मी या लेखात काही एक लिहिलेलं नाही. ते सारं तुम्ही तो बोलता झालाच तर १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी त्याच्याच तोंडून ऐका. मला खात्री आहे मी त्याला बोलतं करेन याची. जमलं तर त्यानं थोडं तरी गावं असा माझा प्रयत्न असणार आहे. किमानपक्षी 'जमुना के तीर' तरी. पाहूया जमतं का ते ? माझी खात्री आहे आणखीन काही दशकानं तुम्ही इतरांना सांगाल आम्ही सुनील बोरगांवकरांचं गाणं फार आधी ऐकलंय. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...