Enquire Now

Request A Quote

Yashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं !


चित्रकार संजय यमगर हे सध्या आपल्या आठवणी लिहीतायत. अगदी लहानपणापासून उघड्या डोळ्यांनी घेतलेले नानाविध अनुभव ते अगदी अचूक शब्दात मांडू पाहतायत. त्यातले काही अनुभव तर शहरी वाचकांना दचकवून टाकतील असेच आहे. त्यांच्या या लेखमालेतला हा पहिला लेख.  

(1979-83 कडगाव- गडहिंग्लज, कोल्हापूर)

1968 ला सांगलीच्या कला विश्वविद्यालयातून पप्पांनी DTC (Drawing Teachers Course) पूर्ण केला. मग त्यांना कोल्हापूरच्या कलानिकेतन महाविद्यालयात थेट पेंटिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला. त्यांचेच एक पेंटिंगचे शिक्षक साळुंखे सर फोटोग्राफी शिकवायचे. त्यांची डार्करूम पण होती. कॉलेज करत करत दोन्ही शिकून घेतलं. मग साळुंखे सरांच्या आग्रहाखातर एक जपान मेड कॅमेरा -Yashica-635 बुक केला. 1969 मध्ये त्याची किंमत 600रु होती. 50-60रु महिना खर्च जीवावर यायचा. घरची परिस्थिती बिकट होती. नऊ पोरं वाढवताना आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळाला तोंड देता देता आजोबांची फरपट होत होती. आजोबांचा पप्पांवर खूप जीव. काहीही करून या एकातरी पोराला शिकवीन अशी त्यांची जिद्द. कुठूनतरी जमवा-जमव करून ते 600 रु पप्पांना पोचते केले आणि सांगावा धाडला -'हे शेवटचं पैकं माझ्याकडनं तुझ्यासाठी' आता या पुढचा सगळा खर्च पप्पांना स्वतः करावा लागणार होता. कॉलेज करतानाच त्यांना स्वामी विवेकानंद संस्थेत पार्ट टाईम ड्रॉइंग टिचरची नोकरी लागली. पगार 63 रु. फोटोग्राफी चालूच होती. काही दिवसांनी शाळेतून फुलटाईम नोकरी करा अशी मागणी सुरु झाली. कारण शाळेचे समारंभ आणि स्नेहसंमेलनाचे फोटो काढायला आयता फोटोग्राफर मिळणार होता. 1969 ला 220 रुपयावर पहिली फुलटाईम नोकरी सुरु झाली ती वाई जवळच्या किकली या गावात. मग 'पप्पा कोकणात जामगे, भेडसगाव करत करत गडहिंग्लज जवळच्या कडगावला पोचले. 

कडगाव एकदम छोटं, शांत खेडेगाव. बहुतांशी सगळे शेतकरी. माणसं अगदी मनमिळाऊ आणि प्रेमळ. बदलीमुळं गावं बदलली तसे पप्पांचे फोटोचे विषयही बदलले. मी तिसरीत होतो. फोटो काढायला जाताना आणि इतर सगळ्याच वेळेस मी पप्पांच्या मागेमागेच असायचो. कायम त्यांचं बोट धरून बरच काही शिकलो. माणसं कोण-कुठल्यावेळेस आणि कशाचा फोटो काढायला बोलावतील याचा नेम नसायचा. मग बारसं, वाढदिवस, गणपतीची आरास, देवळातला भंडारा याचे फोटो काढायला बोलवायचे. एका शेतकऱ्याने विहीर खांदताना लमाणी कामगारांचा फोटो काढून घेतला. एका बहाद्दरानें तर आपला लहान मुलगा दत्तक देतानाचा फोटो काढून ठेवला. एखाद्या नवीन गाडीची चावी द्यावी तसा. तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर सातबाराच्या नोंदी झळकत होत्या. 

अजून फोटो काढायला बोलवायचे ते म्हणजे कोणाचीतरी गाय किंवा म्ह्स व्याल्यावर. पण तो शेतकरी गाईला खोंड आणि म्हशीला रेडी झाल्यावरच हौसेनं फोटो काढून घ्यायचा. मग कधी दावणीला, कधी झाडाखाली तर कधी चावडीजवळ ज्याला जिथं पाहिजे तिथं फोटो काढायचा. कुणाला म्हुसक्कं नाहीतर कासरा धरलेला, तर कुणाला म्हशीची धार काढताना फोटो काढायचा असायचा. मग ती म्हस आपली आहे हे फोटोत दिसावं म्हणून चुन्यानं त्याचं नाव म्हशीच्या पाठीवर लिहायचा. शेंदूर लावून तिची शिंगं रंगवायचा. त्यानंतर मात्र पुढचे काही दिवस न चुकता खरवस नाहीतर चिक आमच्या घरी पोच व्हायचा. 

एकदा गावात हायस्कुलच्या मागच्या शेतात गोंधळ सुरु झाला. एक पोरगा घरी पळत आला आणि म्हणाला 'सर, लवकर कॅमेरा घिऊन बुलिवलय सरपंचानी' मग आम्ही दोघं पटापटा आवरून शेताकडं पळालो. सगळी माणसं शेतात इकडूनतिकडं पळत होती. कशाला तरी दगडं मारत होती. सगळीकडं नुस्ता धुरळा उडत होता. जवळ गेलो तसं कळलं एक जंगली गवा रेडा शेतात घुसला होता. सगळ्यांनी दगड मारून आणि पळवून त्याला बेजार केला होता. त्याच धांदलीत तो शेतातल्या विहिरीत धाडकन कोसळला. एखाद्यानं स्विमिंग पूल मध्ये मुटका मारल्यावर उडावं तसं पाणी वर उडालं. गुळाच्या खड्याकडे मुंग्या पळाव्या तसे सगळेजण त्या विहिरीकडे पळाले. मग नुसती आरडा-ओरड. हे करा- ते करा सुरु झालं. काही लोकांनी कासरे आणले. पण कासरा बांधायला विहिरीत उतरायची कुणाची छाती होईना. गवा जीवाच्या आकांतानं जोरजोरात उसळ्या मारत होता. असाच अर्धा एक तास गेला आणि त्या अवाढव्य जनावरानं विहिरीतच जीव सोडला. सगळं एकदम शांत झालं. मग मात्र 4-5 जण विहिरीत उतरले. कासऱ्याने पाय बांधून जवळ-जवळ 10-15 जणांनी ओढून बाहेर काढला. विहिरीबाहेर काढल्यावर फोटो काढण्यासाठी सगळ्यांचा गव्याच्या बाजूला घोळका झाला. जणू काही सिंहाचीच शिकार केल्यासारखे त्याला खेटून उभे होते. मीही त्या घोळक्यात कुठेतरी जाऊन उभा राहिलो. फोटोत येण्यासाठी. आणि मग एखादी ट्रॉफी मिळावी तसा एक ग्रुप फोटो झाला. सगळी पांगा-पांग झाली  तरी मी तिथेच उभा होतो. तिथेच शेतात ढोर गल्लीतल्या मोठ्या पोरांनी आणि बाप्यानी तो गवा रेडा व्यवस्थित उभा फाडला. त्यांचं वाटं केलं आणि चांभारवाडा, मांगवाडा, महारवाडा, कैकाड्याची वस्ती, रामोशीवस्ती इथल्या सगळ्या लोकांना वाटले. बापे, बाया आणि पोरं पितळी, परात घेऊन आले आणि विलक्षण आनंदित चेहऱ्याने आप-आपला वाटा घेऊन गेले. पुढचे 2-3 दिवस मी पण गुपचूप कुणाकुणाकडं जाऊन खाऊन आलो - गव्याचं कातडं पांघरून. मग मात्र कातडं गेलं ढोर गल्लीत - काहीतरी कमवायला. काही दिवसांनी तोच गवा सजून-धजून चांभारवाड्यातून बाहेर पडलेला आणि गल्ली बोळातून फिरताना मी बघितला - दोन पायावर. 

सगळ्यात विलक्षण आणि विचित्र प्रसंग म्हणजे गावात मयत झाल्यावर. कोणीतरी निरोप घेऊन यायचं, अमक्या-अमक्याच्या घरी म्हातारा किंवा म्हातारी मेली म्हणून. त्या काळात विशेषतः खेड्यात, गरीब घरात फोटो काढणं ही न परवडणारी आणि दुर्मिळ बाब. फोटो काढायचा तो ज्याचा-त्याचा आई-बाप नाहीतर जवळचा नातलग मेल्यावरच. त्यांची शेवटची आठवण म्हणून. हार घालायला. बोलावणं आलं की मी लगेच तयार. पप्पांच्या आधी. हा कार्यक्रम शक्यतो संध्याकाळी असायचा. सगळे पावणे रावळे येईपर्यंत पप्पाना त्यांचं फोटोचं काम उरकावं लागायचं. मग कॅमेरा, फ्लॅश, बॅटरी, बॅकड्रॉपसाठी सोलापुरी चादर आणि पप्पांचे मित्र परीट सर यांची सायकल घेऊन निघायचो. मयत माणसाच्या घराजवळ माणसं घोळक्यानं बसलेली असायची. काही कानात कुजबुजत तर काही तंबाखू मळत बसलेले. घरात शिरल्यावर हंबरडा फोडून रडणाऱ्या बायकांचा आवाज जरा कमी व्हायचा. पप्पा बॅकड्रॉप म्हणून घरनं आणलेली चादर दोन खुट्टीच्या मध्ये बांधायचे. मी एखादी लाकडी खुर्ची बघून त्याच घरातली एखादी चादर त्यावर टाकून आसन तयार करायचो. (पप्पांचा छोटा असिस्टंट) मग काही पुरुष मंडळी मयत उचलून खुर्चीवर आणून बसवायचे. म्हातारी असेल तर तिला चांगलचं सजवलेलं असायचं. आयुष्यभर एक-एक मणी जोडून केलेलं डोरलं, नाकात कुणाचीतरी नथ. मग एखादी लेक रडत-रडत आपलं फ़ुलं- झुबं तिच्या कानात अडकवायची. 

म्हाताऱ्याच्या फोटोची वेगळीच तऱ्हा. गड्याला चांगला अंगरखा, धोतर आणि पटका बांधून बसवलेला. मग कुणीतरी म्हणायचं खिशाला पेन अडकवा. एखादा शिकलेला आपल्या खिशाचा शाईचा पेन पुढं करून त्याच्या खिशाला अडकवायचा. ज्यानं आयुष्यभर आपल्या अंगठ्याच्या रेषा शाईनं उगळल्या तो आता जाताना छातीवर एखाद्या आर्मीतल्या जवानाला पदक मिळावं तशा थाटात बसला असायचा. अगदी मरणोत्तर साक्षर झाल्यासारखं.

ह्या सगळ्या धांदलीत माझं मात्र अजून एक काम असायचं. ते म्हणजे खुर्चीवर बसलेल्या मढ्याला मागून धरून ठेवायचं. त्या लाकडी खुर्चीतून हात घालून न दिसता त्या मयताचे खांदे किंवा दंड पकडायचे. एक शेवटचा आधार त्या वात नसलेल्या मेणबत्तीला. 

हे सगळं चाललेलं असायचं एका फोटो साठी. आपल्या आई-बापाच्या शेवटच्या आठवणीसाठी. त्या कॅमेऱ्यात 120mm चे फक्त 12 फोटो निघायचे. पप्पा तो रोल धुवायला कोल्हापूरला घेऊन जायचे. त्यांच्या मित्राचा मंगळवार पेठेत चौगुले फोटो स्टुडिओ होता तिथे. डेव्हलप करून आणलेले फोटो ते घरीच रंगवून, माउंटींग आणि फ्रेमिंग करायचे. फोटो चिकटवायला घरीच तयार केलेल्या बाभळीच्या डिंकाचा वास अजून मेंदूला चिकटून आहे. फोटो रंगवायला फ्युजी फिल्म्सचे कलरचे पुस्तक मिळायचे. त्याचे तुकडे फाडून फोटो कलर करायचे. काळ्या पांढऱ्या चेहऱ्यावर रंग भरायचे. कुणाचा पटका लाल- हिरवा व्हायचा तर आयुष्यभर मिशरी आणि दातवण लावलेल्या म्हातारीच्या ओठावर लाली चढायची.
साध्या-सुध्या लोकांच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या जन्म-मृत्यू, सुख-दुःखाच्या नोंदी होत्या. आजकाल आपण शेकडो फोटो काढतो. कॅमेऱ्याचं मेमरी स्टोरेज पण वाढलंय. पण तो मोजून मापून काढलेला एकच फोटो आयुष्यभराची मेमरी असायची. त्या एकाच फोटोत आख्ख कुटुंब स्टोअर व्हायचं. 

पप्पांमुळे आणि त्या Yashica-635 मुळे अगदी लहान वयातच अशा विलक्षण आणि मजेदार वाटणाऱ्या गोष्टी कायमच्या मनावर कोरल्या गेल्या. दोघांनीही चौकटीत राहून चौकटीच्या बाहेरचं जग बघायला शिकवलं. गप्प खाली मान घालून कष्ट करायला शिकवलं आणि मग समोरचं आपोआप आत्मसात होत गेलं. पुढे मी आर्ट कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षाला असताना पप्पानी भेट दिलेला हाच तो Yashica-635 आजही माझ्या स्टुडिओत ऐटीत बसून माझ्याकडे बघतोय आणि प्रत्येक दिवशी एवढंच म्हणतोय. Ready… Steady… - Smile Please.  
संजय यमगर

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...