Enquire Now

Request A Quote

झीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम !

'कुंभाराचा गणपती' हा म्युझिक आल्बम नागपूरमधील शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थांनी तयार करून नव्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या कामाचं कौतुक आज जगभरातून होतंय. त्यांचा हा सामाजिक संदेश देणारा म्युझिक आल्बम 'झी म्युझिक' द्वारे नुकताच प्रदर्शित केला गेला. गेल्या काही तासातच या आल्बमला ११ मिलियन्सपेक्षा जास्त प्रेक्षक लाभला आहे. 


धो-धो कोसळणारा पाऊस आणि अनेक तांत्रिक अडचणी सांभाळून या गाण्याचं चित्रीकरण अवघ्या एका आठवड्यात पूर्ण करून ते झीकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच 'ZEE Music' ने हे गाणं प्रसारमाध्यमांवर प्रकाशित केलं आणि ते प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरलं. 

'कुंभाराचा गणपती' या गाण्याच्या शीर्षकावरूनच ही कथा कुंभारासंबंधित असेल या
चा अंदाज प्रेक्षकांना येतो, आणि संपूर्ण गाणं बघितल्यानंतर एकूण कथेचा अर्थ आणि गाण्याचा आशय आपोआप उमगत जातो. नृत्य, संगीत आणि गाण्यातील एकूण एक बोल याला लेखक, गायक, संगीत दिग्दर्शकानं जसा न्याय दिलाय तसाच गाण्यातील प्रत्येक नटानं दिलाय. फक्त चार साडेचार मिनिटांच्या या गाण्यात प्रेक्षक नक्कीच अंतर्मुख होतात आणि याचं संपूर्ण श्रेय टीमला जातं. 

या गाण्याचा कॉन्सेप्ट 'सुबोध आनंद' याचा असून 'राकेश पाठराबे' याने कलादिग्दर्शक म्हणून तर अभिलाष विश्वकर्मा याने DOP म्हणून काम सांभाळलंय. सुबोध आनंद हा केवळ चित्रकारच नाही तर अत्यंत संवेदमक्षम नट देखील आहे. त्यानं अलीकडेच दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे त्याचं नुकतंच रिलीज झालेलं 'कुंभाराचा गणपती' तर काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'आठवणींची सावली' अशी दोन्ही गाणी झी म्युझिकनेच  प्रकाशित केली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यानं अतिशय चांगली कामगिरी केल्याचं या दोन्ही गाण्यातून दिसतं. सुबोध सांगतो, 'कुंभारकाम' याविषयावर तो बऱ्याच दिवसापासून अभ्यास करीत होता. या विषयावर त्याला एक पूर्णवेळेचा सिनेमा 
तयार करायचा आहे. त्याआधी एक प्रयोग म्हणून त्यानं हे गाणं तयार केलं आहे. त्याचं चित्रीकरण अगदी व्यावसायिक चित्रपटासारखं आहे. त्याचा हा अनोखा प्रयोग आज लाखो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. 

राकेश पाठराबे हा चित्रकार एक चांगला मूर्तिकार देखील आहे. या गाण्याच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेल्या सगळ्या गणेशमूर्ती राकेशने स्वतः तयार केलेल्या आहेत. राकेशने याआधी नागराज मंजुळे यांच्या 'झुंज' चित्रपटासाठी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. पण पूर्णवेळ व्यावसायिक कलादिग्दर्शक म्हणून काम करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. अभिजित हा अप्लाइड आर्टमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण पूर्ण करून करियरला सुरुवात करणारा विद्यार्थी. राकेश आणि सुबोधशी त्याची कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला मैत्री झाली. सुबोधबरोबरच्या चर्चेतून त्याला एकत्र काम करण्याची संधी मिळाली याशिवाय बरीच मराठी गाणी आणि लघुपटावर त्यानं DOP म्हणून स्वतंत्रपणे काम केलंय. या तिघांनी मिळून आजपर्यंत जी गाणी आणि ज्या पॉकेटफिल्म्स केल्यात त्यांची निर्मिती त्यांनी नागपूरमध्येच केल्या आहेत. यामागे उद्देश एवढाच होता की, त्यांना आपल्या कामाची ओळख आपल्या गावातूनच दाखवायची होती. 
 कुंभाराचा गणपती या गाण्याच्या कथेतील प्रमुख नट 'मुकुंद वसुले' हे आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप टाकली आहे. सागर कानेर यांनी गीतलेखन केले असून ऋषिकेश करमरकर हे गायक म्हणून तर मोहीत मनुजा यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. या व्यतिरीक्त रुद्रप्रसादसिंग ठाकूर, संग्रामसिंग ठाकूर, आकाश तायडे, कल्पना तेलंग, नितीन मरसकोले आणि मंजिरी कावळे इत्यादी कलाकार या निर्मितीत सहभागी झाले आहेत. 

एका कलाकाराचं भावनिक सत्य हळुवार उलगडत नेणारा आणि त्यातूनच योग्य तो संदेश देणारा हा नव्या कलाकारांचा म्युझिक आल्बम अवश्य पहा. 

स्नेहल बाळापुरे 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...