Enquire Now

Request A Quote

प्रेमा तुझा रंग कसा ?

परवा "प्रश्न'चिन्ह" कार्यक्रमाची घोषणा करताना पहिला कार्यक्रम हा चित्रकार 'प्रकाश बाळ जोशी' यांच्याशी गप्पांचा असेल असं मी जाहीर केलं खरं पण नंतर अचानक परिस्थिती एकदमच बदलून गेली. म्हणजे झालं काय की उदाहरणार्थ अचानक वृत्तपत्रातून कलासंचालक ( ? ) 'राजीव मिश्रा' यांच्या संदर्भातल्या बातम्या झळकल्या. ( ज्यांना त्या वाचण्यात रस आहे त्यांनी कृपया कलाबाजारच्या पेजला भेट द्यावी. ) बातम्यांचा मतितार्थ असा होता की राज्यातली सरकारी आणि खाजगी कलामहाविद्यालयं सुरु करण्याबाबत कलासंचालक रस घेत नाहीत , त्यामुळे राज्यातल्या कला विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं कलाशिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलंय वगैरे . 

खरं तर राज्यातल्या कलाशिक्षणाला कॅन्सरपेक्षाही भयंकर रोग लागला असून , ते आता सुधारण्याच्याही पलीकडं गेलंय असं माझं स्पष्ट मत आहे , ( जिज्ञासूंनी पुन्हा कलाबाजार पेजला भेट द्यावी .) आणि ते मी गेल्या दोन तीन दशकापासून सतत मांडत आलो आहे , ( अति जिज्ञासूंनी माझे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लिखाण आणि कलाबाजार अंक वाचावा .) पण त्यावेळी त्याकडं कुणी लक्ष देण्याची तसदी दिली नाही , आता ज्यांना पुळका आला आहे ते त्यावेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या आत्ममग्न अवस्थेत होते . पण ते एक असो . पोटं भरल्यावर ढेकर देण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते .पुन्हा एकदा  असो ! विषयांतर झाले . 

साहजिकच अलीकडच्या काळात मी हे सारेच विषय मनातून काढूनच टाकले होते . मनात विचार आले की मी ते झटकून टाकत असे. पण कोरोनाने मात्र या संदर्भात मला विचार करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचाच मुळात खेळखंडोबा झालाय. वृत्तपत्रात सतत येणाऱ्या बातम्यांनी ते आपल्याला सातत्यानं दिसून येत आहे. त्यात चित्रकलेला काडीमात्र स्थान नाही हेही उघड झालं. तशातच तथाकथित राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यात देखील कला शिक्षणाला स्थान असल्याचं आढळून येत नाही. 

परीक्षा घेण्या संदर्भात ज्या काही राजकीय कोलांट्या उड्या मारल्या गेल्या त्याला नेहमीप्रमाणेच अखेरीस न्यायालयाने चपराक दिली. पण कलाशिक्षणाच्या क्षेत्रात बाजू प्रभावीपणे मांडणारी सुसंस्कृत माणसंच नसल्यामुळं नेहमीप्रमाणेच कला शिक्षणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. त्यातच कलाक्षेत्राची संपूर्ण माहिती असणारी व्यक्ती कलासंचालक पदी नसल्यामुळं कोणे एके काळी भारतातील सर्वच राज्यात सर्वोच्च स्थानी असलेलं कलाशिक्षण आता पार रसातळाला गेलं आहे. कोरोना नंतरच्या काळात किती महाविद्यालयं पुन्हा उघडली जातील या विषयी शंकाच आहे. जी उघडली जातील त्यात किती  शिक्षक मंडळी असतील ? त्यांना वेळीच वेतन दिलं जाईल का ? विद्यार्थ्यांना खरोखरच ज्ञान मिळेल का ? असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. 

महाराष्ट्र सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या चार कलामहाविद्यालयांची गेल्या तीन ते चार दशकात जी अवस्था सरकारनं, संबंधित यंत्रणेनं आणि प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेनं करून टाकली आहे ती भयंकर आहे. भविष्यात त्यातून काहीही हाती लागेल असं वाटत नाही. कोरोना नंतरच्या काळात घाला पडेल तो अनुदानित किंवा विनाअनुदानित कलामहाविद्यालयांवर हे नक्की. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कलाशिक्षणार्थीना काहीतरी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल हे निश्चित. 

या संदर्भात आणि "प्रश्न'चिन्ह' " कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावंतांच्या संदर्भात अधिक विचार करीत असताना अचानक 'प्रेम आवळे' या मुलाचं नावं समोर आलं. 'चिन्ह'चे जे नियमित वाचक आहेत त्यांना प्रेम आवळे विषयी वेगळं काही सांगायला नको. पण जे नव्यानं जाणून घेऊ इच्छितात त्यांच्या साठी सांगणं आवश्यक आहे. 

प्रेम आवळे ज्यावेळी 'चिन्ह'च्या व्हाट्सअप आर्टिस्टग्रुपमध्ये सहभागी झाला तेव्हा त्याच्या विषयी मला काही एक ठाऊक नव्हतं. महाराष्ट्रातले असंख्य चित्रकार जसे व्हाट्सअपग्रुप मार्फत 'चिन्ह'शी जोडले गेले आहेत तसाच तो असावा. त्यामुळे त्याची रिक्वेस्ट येताच मी त्याला सहभागी करून घेतलं होतं. गंमत पुढेच झाली तीन - चार महिन्या नंतर त्यानं आपलं एक रेखाटन ग्रुपवर टाकलं आणि नंतर एकच धमाल उडाली. त्या रेखाटनाचा दर्जा बघून भलेभले आश्चर्यचकित झाले. काहींनी तर त्याचा 'सर सर' म्हणून उल्लेख करायला सुरवात केली. तेव्हा प्रेमने त्यांना सांगितलं मला 'प्रेम' म्हणा, 'सर म्हणू नका' मी नुकताच दहावी पास झालो आहे. हे ऐकल्यावर मात्र ग्रुपवर एकच गदारोळ झाला. सर्वांनीच त्याला तुझं आणखीन काम दाखव म्हणून विनंती केली. 

त्याप्रमाणे त्यांनी आपली कामं ग्रुपवर टाकली. ती कामं पहिली मात्र आणि सारेजण अक्षरशः थिजून गेले. दहावी पास झालेला मुलगा असं काम करू शकतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. प्रचंड चर्चा सुरु झाली. मग 'चिन्ह'शी संबंधित स्नेहल बाळापुरेने हा सारा प्रकार 'चिन्ह'च्या वेबसाईटवर टाकला व त्याची लिंक फेसबुकला दिली. आणि मग जे काही घडलं ते अभूतपूर्व होतं. त्या पोस्टला तब्बल दीड लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या. किती व्हाट्सअप ग्रुपवर ती पोस्ट फिरली याची गणतीच नाही. शेअर्स, लाईक्स यांचा नुसता पाऊस पडला. 

याच काळात प्रेमच्या एका मित्रानं त्याचं एक काम त्याला कळू न देता स्पर्धेसाठी पाठवलं. तेही भारतातल्या नव्हे तर परदेशातल्या. तेही इटलीमधल्या 'फ्लोरेन्स एकॅडमी ऑफ आर्ट' सारख्या जगविख्यात संस्थेच्या स्पर्धेत. त्या स्पर्धेत प्रेमच्या चित्राला चक्क तिसरं पारितोषिक मिळालं आणि फ्लोरेन्स एकॅडमी ऑफ आर्टनं त्याला शिष्यवृत्तीसाठी फ्लोरेन्समध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. आता आली का पंचायत ! ते निमंत्रण स्वीकारावं अशी काही प्रेमच्या वडिलांची परिस्थिती नव्हती, ते बिचारे पुण्यात कुठेतरी सुरक्षा रक्षकाचं काम करीत होते. 

ही सर्व वस्तुस्थिती 'चिन्ह'नं मांडताच असंख्य लोकांचं लक्ष वेधलं गेलं. पण ते सारं आता सांगत बसत नाही. 'चिन्ह'ने प्रकाशित केलेले लेख आम्ही "प्रश्न'चिन्ह' "वर रिपोस्ट करणार आहोत. इतकंच नाही तर त्या काळात प्रेमाने जेजे काही फेसबुकवर लिहिलं तेही आम्ही रिपोस्ट करणार आहोत. 

हे सारं अशा साठी सांगतोय कारण "प्रश्न'चिन्ह' " कार्यक्रमाचा शुभारंभ हा प्रेम सोबतच्या गप्पांनी आम्ही करणार आहोत. आधी जाहीर केलेला प्रकाश बाळ जोशी यांच्या सोबतचा गप्पांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे २६ सप्टेंबर रोजीच होणार आहे. पण प्रेम सोबतच्या गप्पांचा कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करणार आहोत. 

चित्रकलेच्या दृष्टीने चित्रकला शिक्षणाच्या दृष्टीनं संपूर्णपणे नकारार्थी वातावरण असताना पुण्यातल्या एका साध्याशा सुरक्षा रक्षकाचा १९ वर्ष वयाचा मुलगा चित्रकलेचं कुठलंही शिक्षण प्रशिक्षण न झालं असताना केवळ वाचन, चिंतन, मनन, निरीक्षणशक्ती या द्वारे फ्लोरेन्स एकॅडमी सारख्या जागतिक संस्थेची मान्यता मिळवू शकतो ही घटनाच मुळी विलक्षण आहे. कोरोना नंतरच्या काळात भवितव्याच्या चिंतेनं ग्रासलेल्या केवळ चित्रकलेच्याच भावी विद्यार्थ्यांना नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थाना अत्यंत अनुकरणात्मक ठरेल, विचार करावयास भाग पाडेल म्हणूनच हा बदल करण्यात आला आहे. 

लॉकडाऊन सुरु होण्या आधी दोन - चार दिवसासाठी आई सोबत प्रेम पुण्याहून गेला होता आपल्या नातेवाईकांकडे इचलकरंजीला. तो गेले सहा महिने तिथंच अडकून पडलाय. वडील बिचारे एकटेच पुण्यात राहतायत. ज्या नातेवाईकांकडे तो गेलाय त्यांच्याकडे इंटरनेट वगैरे नाही. पण आमचे कोल्हापूरकर मित्र चित्रकार 'अनंत खासबारदार' मदतीला धावून आले. ते स्वतः प्रेमचे फॅन. ते म्हणाले कोल्हापूरला आमच्याचकडे फेसबुक लाईव्ह करूया. त्यामुळे १३ तारखेला प्रेम सकाळीच उठून इचलकरंजीहून कोल्हापूरला जाणार आहे. तिथूनच "प्रश्न'चिन्ह' "च्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आणखीन एक मोठा धक्का मला द्यायचाय पण तो आज नाही १३ तारखेला कार्यक्रमातच प्रेमव्दारे तो मी देईन. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. हा कार्यक्रम चुकवू नका. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...