सहा महिन्यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक 'रवी जाधव' यांच्या वरची पोस्ट लावताना असं मनात देखील आलं नव्हतं की उद्यापासून आपल्याला आपल्या या संकेतस्थळावर काही एक लावता येणार नाहीये. आणि काही एक न लावता येण्याचा हा प्रकार थोडे थोडके नाही तर तब्बल सहा महिने चालणार आहे. सारंच अकल्पित घडलं होतं. असं काही घडेल आणि ते इतका काळ लांबेल याची पुसटशी कल्पना देखील तेव्हा करता आली नव्हती.
'चिन्ह'चा आजवरचा प्रवास अत्यंत धकाधकीचा होता. अंक किंवा ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया अनेकदा विलक्षण त्रासदायक किंवा कधीकधी खरं तर यातनामय भासत असे. अर्थातच ही सारी आव्हानं प्रामुख्यानं आर्थिक असत. प्रचंड अडीअडचणीतून मार्ग काढून अंक किंवा ग्रंथ प्रकाशित केला की संबंधितांची बिलं भागवता भागवता अक्षरशः नाकीनऊ येत. आज अत्यंत तटस्थपणानं त्या विषयी लिहिता येतं. पण त्यावेळी अनेकदा येणारे अनुभव तर भयंकर असत. कधीकधी तर असं वाटे की तो दिवसच उजाडू नये. सारं काही, काही काळासाठी, निदान दोन - चार दिवसांसाठी ठप्प व्हावं बँकासुद्धा उघडूच नयेत. म्हणजे आपल्यावर ते पेमेंट करण्याची वेळ येणार नाही वगैरे. असं काही तरी भलतं सलतं मनात येत असे.
पण मनात येणारं हे सारं अशा पद्धतीनं कधीतरी प्रत्यक्षात येईल असं मात्र कधीच वाटलं नव्हतं. पण आता ते प्रत्यक्षात आलंय. गेले सहा महिने आपण सारेच हे सारं अनुभवतोय. आपणच नव्हे तर सारं जगच हे अनुभवतंय. आणखीन किती काळ हे सारं चालणार आहे कुणास ठाऊक ? आपण सारेच यात अक्षरशः होरपळून निघतो आहोत. यात वादच नाही. बरं हे सारं सांगायचं तरी कुणाला आणि ऐकणार कोण तोही एक मोठा प्रश्नच आहे.
'चिन्ह'च्या संकेतस्थळावर आज लिहायला सुरवात करताना आज हे सारं आठवतंय. अनेकदा हे सारे दिवस आठवताना थरकाप उडतोय. अनेक सुहृद या काळात गमावले. कलाक्षेत्रातले देखील असंख्य कलावंत आपण गमावले. पण कुणाचंही अखेरचं दर्शन घेता आलं नाही. एरवी अशा बातम्या आल्या म्हणजे आवर्जून उपस्थित राहण्याची सवय जडलेली होती. पण गेल्या सहा महिन्यात मात्र नात्यातले जे कुणी गेले, मित्र परिवारातले जे कुणी गेले, ज्यांच्या सोबत अनेक वर्ष कामं केली होती अशा स्नेह्यांपैकी काही गेले. अनेक कलावंत ज्यांच्याशी तासंनतास गप्पागोष्टी होत त्यांच्यापैकी कुणाच्याच साध्या अंत्यदर्शनाला देखील जाता आलं नाही मग अंत्ययात्रेला उपस्थित राहणं तर दूरचंच. ( काही मात्र या काळात गाड्या उडवत महाबळेश्वरला देखील गेले. पण हे सारं आपण पाहायचं आणि वाचायचं. बस ! ) या साऱ्याचीच खंत आयुष्यभर डचत राहील यात शंकाच नाही. आज देखील संबंधितांच्या आप्तजनांशी त्या संदर्भात बोलता आलेलं नाही किंवा फोनवरून साधं सांत्वन देखील करावसं वाटलेलं नाही. हे सारं अत्यंत वाईट आहे पण हीच वस्तुस्थिती आहे. आपल्या आयुष्यातला हा अत्यंत निराशाजनक कालखंड आहे असं मनापासून वाटतं.
जे व्यक्तिगत जीवनात तेच अन्य क्षेत्रातही, विशेषतः कलाक्षेत्रात हे अधिकत्वानं घडलं. गेल्या सात - आठ किंबहुना दशकाभरात कलाक्षेत्राला मंदीनं ग्रासलंय. या मंदीनं चित्रकलाक्षेत्राची तर पार ससेहोलपटच केली आहे. अनेक कलादालनं बंद पडली आहेत. उदघाटनाच्या पार्ट्या तर कधीच इतिहास जमा झाल्या आहेत. चांगले चांगले कलावंत महानगरं सोडून छोट्या शहरात किंवा गावात जाऊन राहणं पसंत करू लागली आहेत. ज्या कलावंतांनी कधीही नोकऱ्या केल्या नाहीत ते कलावंत आता नोकऱ्यांच्या शोधात आहेत. चित्रविक्री पूर्णतः बंद झाली आहे. सहा महिन्यापूर्वी किमान परदेशी कलादालनांशी ज्यांचा संपर्क होता अशा कलावंतांना त्याची फारशी झळ लागली नव्हती. पण कोरोनानं त्यांना जमिनीवर आणलं आहे.
प्रारंभीचा काळ वगळता 'चिन्ह' गप्प बसलं नव्हतं. आम्हीही आमच्या परीनं प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांमधला एक भाग म्हणजे 'चिन्ह'चा 'वाचता वाचता' हा एक व्हाट्सअप समूह आणि दुसरा भाग म्हणजे लवकरच सुरु होऊ घातलेला 'प्रश्नचिन्ह' हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम. सुरवातीच्या भागात तर आम्ही अशांची निवड केली जे कोरोनावर मात करण्यास बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. 'प्रश्नचिन्ह'च्या या प्रत्येक गप्पाष्टकातून ऐकणाऱ्याला जीवन विषयक, कला विषयक काहींना काहीतरी मिळावं या दृष्टीनं या कार्यक्रमाची आम्ही आखणी करीत आहोत. त्याविषयीची प्रत्येक घोषणा इथंच पहिल्यांदा करू. वाचत राहा ! वाचत राहा !!