Enquire Now

Request A Quote

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?


गेला पंधरवडा 'निरव मोदीं'च्या संग्रहातल्या चित्रांच्या इडीनं केलेल्या लिलावाच्या बातम्यांनी व्यापला. त्याचे चर्वितचर्वण संपते न संपते तोच आज येस बँकेच्या 'राणा कपूर' यांच्या संग्रहाच्या  बातम्या झळकल्या आहेत. त्यांच्याकडे म्हणे ४४ पेंटिंग सापडली आहेत. त्यांची किंमत २००० करोड आहे वगैरे वगैरे. चित्रकलेच्या क्षेत्रात नेमकं काय घडलं आहे ? याचं दर्शन घडवणाऱ्याच या बातम्या आहेत. या संग्रहात हयात चित्रकारांचा समावेश असेल का ? मला नाही वाटत. किंबहुना नसेलच. चित्रकार वर गेला की त्याच्या चित्रांना प्रचंड मागणी येते. आपल्याकडेही तेच घडू लागलं आहे. 


बरं या साऱ्यातून चित्रकारांना तरी फायदा होत असेल का ? तर मुळीच नाही. मंदीनं तर चित्रकारांचा कणाच मोडून टाकला आहे. गावाकडून मुंबईकडे आलेले अनेक चित्रकार मुंबईतले आपले स्टुडिओ विकून पुन्हा माघारी आपापल्या गावाकडे वळले आहेत. ज्यांना ते शक्य नव्हतं त्यांनी नोकऱ्या पत्करल्यात किंवा दुबई वगैरे सारख्या ठिकाणी जाऊन काम मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. 

चित्रकारांची ही स्थिती तर चित्रकला विद्यार्थ्यांचे हाल कुत्रंही खात नाही अशी परिस्थती आहे. वीस एक वर्षांपूर्वी सार्वजनिक मुताऱ्यांप्रमाणेच गावगन्ना काढलेली महाराष्ट्रातील विनाअनुदानित कला महाविद्यालये तर बंद पडत चालली आहेत. ही कला महाविद्यालये म्हणजे चित्रकला शिक्षक बनवण्याचे ( ? ) फोकनाड कारखानेच होते. राजकारणात उठबस करणाऱ्या गुंडपुंडांनी गावागावात हे कारखाने उभे केले आणि चित्रकारांच्या दहा - वीस पिढ्या अक्षरशः कापून काढल्या आहेत. 

गेल्या २५ - ३० वर्षातल्या प्रत्येक सरकारने आणि तंत्र शिक्षणमंत्र्यांनी या क्षेत्राची लावता येईल तेव्हढी वाट लावून ठेवली आहे. जेजेसारख्या जागतिक कलाक्षेत्रात महत्व असलेल्या कलासंस्थेत शिकवायला कायम स्वरूपी शिक्षक किंवा प्राध्यापकच नाहीत अशी अवस्था करून ठेवली आहे. महाराष्ट्राचं मानाचं कलासंचालक पद देखील गेली अनेक वर्ष रिक्त आहे. कला क्षेत्राशी दुरान्वयाने देखील संबंध नसलेल्या मूर्खांची तेथे वर्णी लावून सरकारने कलाक्षेत्रावर गाढवाचा नांगर फिरवला आहे. ( नांगरे नावाचे कलासंचालक इथे होऊन गेले. त्यांची जर कुणाला आठवण झाली तर त्याला मी जबाबदार नाही. )

जे उच्च कला शिक्षणाचे तेच शालेय कला शिक्षणाचे. ग्रेड परीक्षांमधून 'नेचर' हा विषय काढून टाकून महाराष्ट्र सरकारने अक्षरशः आपल्या अकलेचे दिवाळे काढून दाखवले आहेत. आता तर काय म्हणे चित्रकला हा विषयच शालेय शिक्षणातून काढून टाकण्याचे ऐकतो आहे. महाराष्ट्रातले कला शिक्षक धाय मोकलून रडतायत. पण ते ऐकायला देखील कुणाला वेळ नाही किंवा स्वारस्य नाही. 'जेजे स्कूल ऑफ आर्ट बंद केलं तर कुणाचं काय बिघडणार ?' असले उर्मट उद्गार काढणारे राजकर्ते पुन्हा सरकारात आले आहेत. सगळ्यांचं लक्ष अर्थातच जेजेच्या जागेवर असणार आहे. पण याच जेजेच्या कर्तृत्वामुळे आज अब्जावधी रुपयांचा व्यवहार कलाक्षेत्रात होतो आहे. याचं कुणाला सोयरसुतक देखील नाही. निरव मोदी प्रकरणामुळे हे सारं उघडकीला आलं. ( त्या आधी महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याने कोट्यवधींच्या जमवलेल्या चित्रांची प्रचंड बोंब झाली. पण पुढं काय झालं कुणास ठाऊक ? ) आजच्या राणा कपूर प्रकरणाने चित्रांमध्ये होणाऱ्या अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीचे रहस्य उलगडू लागले आहे. 

यातून कलावंतांचा काही फायदा होतो का ? या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे . फायदा होतो तो फक्त विक्रेत्यांचा, दलालांचा, कलादालनाचा आणि या सर्व व्यवहारांना चालना देणाऱ्या राजकारण्यांचा. त्यांचीही नाव आता उघड होऊ लागली आहेत आणि मला वाटतं ही फक्त आता सुरुवात आहे. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...