Enquire Now

Request A Quote

राज कारणापलीकडचा चेहेरा !

काल काही कामानिमित्ताने गडकरी रंगायतनमध्ये जाणं झालं. रिकाम्या रंगायतनच्या कँटीनमध्ये चहा घेत बसलो असताना अचानक असं लक्षात आलं की कँटीन गर्दीनं भरून गेलं आहे. पाहतो तर जिकडे तिकडे मनसेचे नेते. मग लक्षात आलं आज राज ठाकरे यांची रंगायतनमध्ये मुलाखत असल्याने सारे तेथे आले असावेत. काम आटोपून घरी आलो तेव्हा साडेसात झाले असावेत. हेडलाईन बघायला टीव्ही ऑन केला तर रंगायतनमधली राज ठाकरे यांची मुलाखत लाईव्ह चालू होती. पत्रकार अंबरीश मिश्र ती घेत होते. 

आपल्याला जे म्हणावयाच आहे ते अत्यंत प्रभावी रीतीने राज ठाकरे मांडतात. कालही ते त्याच मूडमध्ये आणि त्याच तयारीने आले होते. प्रत्येक शब्द मोजून मापून आणि शब्दावर योग्य ते वजन देऊन कसा वापरायचा याचं तंत्र राज ठाकरे यांना चांगलंच अवगत आहे. पण समोर अंबरीश मिश्र सारखा गप्पिष्ट आणि मैफल रंगवणारा पत्रकार मुलाखत घेणार म्हटल्यावर राज ठाकरे मोकळे झाले नसते आणि ती मुलाखत रंगली नसती तर नवलच ठरलं असतं. 

दृश्य माध्यमाची संपूर्ण जाण असलेले राज ठाकरे अतिशय व्यवस्थित पोज घेऊन बसले होते. तर समोरच्या बाजूला अंबरीश मिश्र अत्यंत मोकळेपणाने पायबीय सोडून ऐसपैस बसले होते. दोघांच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये अगदी टोकाचं अंतर होतं. का कुणास ठाऊक मला दूरदर्शनच्या काळातली एक जुनी मुलाखत आठवली. प्रख्यात कवी अरुण कोलटकर यांची मुलाखत दिलीप चित्रे घेत होते. मुलाखत सुरु झाली आणि अचानक अरुण कोलटकरांनी आपले पाय समोरच्या टीपॉयवर ठेवले आणि दिलीप चित्रेंना प्रश्न विचारला की 'हे असं पाय वर ठेऊन बसलं तर चालेल का ?' तिकडे चित्रेंची भयंकर पंचाईत झाली कसेबसे हसत ते म्हणाले 'हो हो चालेल की' आणि मग नंतर अरुण कोलटकरांची संपूर्ण मुलाखत तशीच टीपॉयवर पाय ठेऊन पार पडली. आजही मुलाखतीतला तो क्षण विसरता येत नाही. अंबरीश मिश्र यांचा कालच्या मुलाखतीतला एकूण मोकळाढाकळा वावर कोलटकरांच्या मुलाखतीची आठवण करून देऊन गेला हे नक्की. 

टीव्ही समोर बसलो म्हणजे रिमोट हातातच असतो. सतत सर्फिंग चालूच असतं जाहिराती आल्या म्हणजे तर बघायलाच नको. या चॅनेलवर काय चाललंय त्या चॅनेलवर काय चाललंय वगैरे  नाक खुपसून बघत कार्यक्रम बघणं होतं  . सलग दीड दोन तास टीव्हीवरचा कार्यक्रम रिमोटला स्पर्शही न करता शेवटचा कधी पाहिला ते आता नक्की सांगता येणार नाही. पण काल मात्र  मी तो  पाहिला . साडेसातच्या सुमारास टीव्ही ऑन करण्यासाठी रिमोटला हात लावला आणि ती संपूर्ण मुलाखत संपल्यानंतरच नऊ साडेनऊच्या सुमारास तो पुन्हा हाती घेतला तो टीव्ही ऑफ करण्यासाठीच. खरचं सांगतो मध्ये एकदाही रिमोटला स्पर्श केला नाही वा घड्याळाकडेही लक्ष गेले नाही . इतकी ती मुलाखत एखादी गाण्याची मैफल रंगते ना तशी रंगली . मझा आला . राज ठाकरे यांचा राजकारणापलीकडचा चेहेरा दाखवण्यात अंबरीश मिश्र कमालीचे यशस्वी ठरले यात शंकाच नाही . 

या मुलाखतीतील  बराचसा भाग  चित्रकला , व्यंगचित्र , जेजे स्कूल ऑफ आर्ट , ऍनिमेशन , पेंटींग , कलानगर , हुसेन , गायतोंडे वगैरे चित्रकलेशी संबंधित विषयांनीच व्यापला असल्याने आर्ट न्यूज वर या मुलाखतीची दखल घेणे आणि ज्यांनी  ती पाहिली नसेल त्यांच्यासाठी त्या मुलाखतीची लिंक उपलब्ध करून देणे आम्हाला गरजेचे वाटते. https://marathi.abplive.com/news/mumbai/cartoonist-raj-thackeray-telling-about-cartoons-drowning-art-in-thane-746580?fbclid=IwAR26BdiR6drbO9NXhZUXyJXpXkGOr9YZh6juoSkkVbLjXmOhw-tBciSIY2Y
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...