Enquire Now

Request A Quote

आत्ता नाही तर कधीच नाही !

'जेजे स्कूल ऑफ आर्ट बंद झालं तर महाराष्ट्रात कुणाचं काय बिघडणार आहे ?' उन्मत्तपणे असा प्रश्न विचारणारी पुन्हा सत्तेवर आली आहेत. त्यामुळे जेजे बोरीबंदर स्टेशनसमोर राहणार का ? देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर जाणार ? असा प्रश्न आता पडला तर आश्चर्य वाटू नये. पार अगदी सॉलोमन साहेबांच्या काळापासून राजकर्त्यांची जेजेच्या जागेवर वक्रदृष्टी होतीच. पण तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्यात किमान सुसंस्कृतता होती ते जनमताला घाबरत होते आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देखील जागरूकता होती त्यामुळे नंतरच्या काळात तसे काही घडू शकले नाही.  

राजकारण्यांच्या या असल्या कृत्त्यांची दखल घेणारे जेजेचे माजी विद्यार्थी आज हयात आहेत. पण उद्या ते नसतील तेव्हा काय ? राजकारण्यांच्या या असल्या कृत्त्यांना वाचा फोडणारे संपादक कालपर्यंत होते, म्हणून तर जेजे वाचलं ! आज ते आहेत का ? ठाऊक नाही ! उद्या ते असतील का ? सांगता येत नाही ! बहुदा ते नसतीलच. भारतात एकमेव ठरलेलं महाराष्ट्राचं कलासंचालक पद गेली अनेक वर्ष रिक्त आहे. जे कलासंचालक पदाचं तेच अधिष्ठाता पदाचं. प्राध्यापक पदांबाबत तर विचारता सोय नाही. चित्रकला शिक्षकांचे हाल तर कुत्रं खात नाही. जे शिक्षक २० - २५ वर्षांपूर्वी कंत्राटावर किंवा हंगामी म्हणून लागले त्यांची मुलं जेजेत शिकायला आली तरी ते अजून कंत्राटावरच आहेत. या वरून जेजेतल्या शिक्षण व्यवस्थेची कल्पना यावी. कोर्टाने दणका दिल्यामुळं त्यात थोडीफार सुधारणा झाली आहे, नाही असं नाही. पण एकूण अवस्था अत्यंत बिकट आहे. 

जेजेच्या फुटपाथवरून नुसतं चालत जाताना बघा काय वाताहत झाली आहे त्या परिसराची. तिथल्या हिरवळीची तिथल्या वृक्षराजीची अवस्था तर काही विचारूच नका. नियमितपणे झाडांना पाणी तरी दिलं जात असेल की नाही यावर शंकाच आहे. त्यात काही बदल झालाच नाही तर आणखीन काही वर्षानंतर आपण त्या रस्त्यानं जाताना नालंदाच्या बाबतीत आज आपण म्हणतो तस निश्चितपणे म्हणू शकू 'होय ! या इथं कोणे एकेकाळी जेजे स्कूल ऑफ आर्ट होतं.' 

###

  जेजेत एके काळी कला, शिक्षण, संस्कृती कशी गुण्या-गोविंदानं नाचत होती याचं दर्शन हल्लीच्या पिढीला घडावं हाच 'जेजे जगी जगले...' ग्रंथ प्रसिद्ध करताना डोळ्यासमोर प्रमुख उद्देश धरला होता. त्या दृष्टीनेच सर्व काम झालं. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं जेजेतून काल परवाच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या कलावंतांपासून ते आता ८०-८५ वर्षात पदार्पण केलेल्या चित्रकार मनोहर म्हात्रे, सच्चिदानंद दाभोळकर, डॉ शरयू दोशी, भानू अथय्या यांच्या सारख्या जेष्ठ कलावंतांनी देखील प्रकाशनाला उपस्थित रहावं आणि जेजे सुधारण्यासंबंधी दबावगट तयार करून महाराष्ट्र शासनाला जेजेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी भाग पाडावं. या दृष्टीनं 'चिन्ह' प्रयत्नशील राहणार आहे. हा अर्थातच 'चिन्ह'चा तिसरा आणि अखेरचा प्रयत्न असणार आहे. दुसरा प्रयत्न २००८ साली 'कालाबाजार' अंक काढून केलाच होता. पहिला प्रयत्न तर १९८१ सालापासून आजतागायत वृत्तपत्रात बातम्या देऊन, लेख लिहून अव्याहतपणे चालूच आहे. अर्थात हा सारा प्रयत्न एकांडा म्हणूनच विफल ठरला. २००८ - २००९ साली कालाबाजार अंकाच्यावेळी कलाशिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठवण्यात 'चिन्ह' यशस्वी ठरला होता. पण 'अजमल कसाब'ने त्या साऱ्याच प्रयत्नांवर अक्षरशः पाणी फिरवलं. 

'जेजे जगी' प्रकाशनाच्या निमित्तानं जेजेच्या सर्वच माजी विद्यार्थाना एकत्र आणायचा 'चिन्ह'चा प्रयत्न असणार आहे. हे सार का आणि कशासाठी तर जेजेचाच एक माजी विद्यार्थी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे. जेजे संदर्भात भविष्यात जर काही बरे घडायचे असेल तर ते आताच घडेल अन्यथा या जन्मात तरी कदापी नाही. याच भावनेनं उचल खाल्ली आणि जेजेचे हितचिंतक कामाला लागले आहेत. या ग्रंथाचा मेच्या पूर्वार्धात होणारा प्रकाशन सोहोळा न भूतो न भविष्यती असा मोठ्या दणक्यात होणार आहे. या सोहोळ्यात जेजेच्या जास्तीजास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं यासाठी 'चिन्ह' आवाहन करत आहे. ज्यांना या सोहोळ्यात सहभागी व्हायचंय किंवा जेजे संदर्भात काही करण्याची इच्छा आहे किंवा नुसती माहिती तरी मिळवण्याची इच्छा आहे अशा जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी किंवा कलारसिकांनी 'चिन्ह'च्या ९००४० ३४९०३ या व्हाट्सअप नंबरवर आपल्या नावासह JJ BG मेसेज पाठवून  ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये नोंद करायची आहे. एका ब्रॉडकास्ट ग्रुपतर्फे या संदर्भात जे काही घडेल ते सर्वानाच वेळोवेळी कळवलं जाणार आहे. तेव्हा 'चिन्ह'चा हा नंबर आजच सेव करा आणि आपल्या परिचयातल्या जेजेच्या माजी विद्यार्थ्यांकडे फॉरवर्ड करा. या संदर्भातले सारे अपडेट्स याच जागी तर मिळतीलच पण फेसबुकच्या JJ Jagi Jagle / जेजे जगी जगले या पेजवर देखील मिळू शकतील. तसेच ट्विटर, हॅलो, इंस्टाग्राम, शेअरचॅट येथे ही उपलब्ध होतील. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...