Enquire Now

Request A Quote

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

'चित्रा राजेंद्र जोशी' या 'चिन्ह'च्या चाहत्यांपैकी एक. तसा चित्रकलेशी त्यांचा थेट संबंध काहीच नाही पण प्रचंड वाचन साहाजिकच त्या 'चिन्ह'कडे ओढल्या गेल्या नसत्या तर नवलच ठरले असते. फेसबुकवर त्या सतत कार्यरत असतात. कुणीतरी लिहिलेलं वाचायला आणि वाचलेलं कुणाला तरी सांगायला त्यांना आवडतं. त्यातूनच त्या लिहित्याही झाल्या. परवा ठाण्यातला 'तुझी आम्रि'चा प्रयोग पाहून त्यांनी फेसबुकवर लेख लिहिला. तोच त्यांच्या परवानगीनं इथं देत आहोत. 


काही कलाकृती मनात इतक्या भरतात की त्या बघून समाधान होत नाही. कलावंताच्या आयुष्याचा वेध घ्यायलाही त्या भाग पाडतात. त्याचं कुटुंब, त्याच्यातील सृजनशीलतेचा आवाका आणि मिळालेला वाव हे सगळं समजून घेण्याची उत्सुकता नक्कीच जागी होते. अमृता शेरगिलच्या मूळ चित्रकृती जुलै २०१४मध्ये मुंबईच्या राष्ट्रीय कलासंग्रहालयातल्या प्रदर्शनात पाहिल्यानंतर अशीच अवस्था झाली. एकदा जाऊन समाधान झालं नाही म्हणून पुन्हा दुसर्‍यांदा जाणं झालं. प्रत्येकवेळी त्या चित्रांसमोर उभं राहताना एक प्रकारचं भारावलेपण वाटत राहिलं. अमृता त्या कॅनव्हाससमोर उभी राहताना तिच्या मनाची अवस्था कशी असेल, जे चित्र काढायचं आहे त्याबद्दल तिच्या मनात काय-काय येत असेल... आणि ‘त्यावेळचे निव्वळ तिचेच असणारे ते क्षण, ते मूळ चित्र आज आपण थेट बघू शकतोय म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत’ असंच वाटत राहिलं.


मूळ बघितलेली चित्रं आंतरजालावर पुन्हा पुन्हा बघताना तिच्याविषयी अधिक जाणून घ्यावंसं वाटू लागलं. ‘अमृता शेर-गिल - अ सेल्फ पोर्ट्रेट इन लेटर्स ॲण्ड राईटींग्स - व्हॉ.१ व २’ ह्या विवान सुंदरम् यांनी संपादित केलेल्या पुस्तकांची माहिती झाली. पण, चित्रकला हा अभ्यासाचा विषय नसल्याने आणि त्यातून इंग्रजी, ह्यामुळे ते घेण्यास मन धजावलं नाही. मात्र त्यावर मराठीत ‘चित्रकार अमृता शेर-गील’ या रमेशचंद्र पाटकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची माहिती मिळाली अर्थात, त्याची खरेदीही लगेचच झाली. कोणताही विषय नव्याने समजून घेण्यासाठी मातृभाषाच आपलीशी वाटणार ना ?


याच पुस्तकावर आधारित ‘तुझी आम्री’ हे दोन अंकी दृकश्राव्य पत्रनाट्य अनुभवताना पुन्हा एकदा ती मूळ चित्रं आठवत राहिली. ठाण्यातल्या ‘ठाणे स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘नित्य नवा कलास्पर्श’ यांनी कला-विद्यार्थी आणि कला-रसिक यांच्यासाठी खास प्रयोग आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी चितारलेल्या अमृताच्या चित्रांच्या आणि पत्रांच्या प्रतिकृतींनी सभागृहात वातावरणनिर्मिती छान झाली.


शेखर नाईक यांच्या संकल्पना-संकलन-दिग्दर्शनातून साकार झालेला हा प्रयोग आवडला. ऋचा आपटे आणि अमृता पटवर्धन यांच्या अमृता आणि इंदिरा जणू मूळ स्वरूपात अवतीर्ण झाल्या. दोघींच्या वेशभूषांची समर्पक साथ लाभली. रंगमंचावरील चित्रकाराचा स्टुडिओदेखील नेपथ्यातून चांगला साकारला गेला.


अमृताच्या पत्रांतून प्रकट होणारा तिचा आत्मविश्वास-सडेतोडपणा, आई-वडिलांबद्दलचं प्रेम-काळजी, कार्ल खंडालवाला यांच्याशी असलेलं मैत्रीपूर्ण नातं, याबरोबरच इंदिराशी असलेलं उत्कट जिव्हाळ्याचं नातं ऋचा आपटेच्या अभिनयातून सर्वार्थाने प्रकट झालं. त्याचप्रमाणे, अमृता पटवर्धनच्या इंदिरेनेही आपल्या जिवलग बहिणीचं वेगळेपण सार्थपणे व्यक्त केलं. रंगमंचावरील सहज वावराने दोघींतले प्रेमळ बंध थेट पोचले. ह्या सगळ्या जिवंतपणात तांत्रिकतेनं उत्तम भर घातली. त्या पत्रांमध्ये उल्लेख असलेली अमृताची चित्रं बघायला मिळाली.


तरीही, आणखी काहीतरी यात हवंय असं सतत वाटत राहिलं. ‘चित्रकार अमृता शेर-गील’ हे पुस्तक बाहेर काढलं आणि त्याचा ब्लर्ब वाचत असताना ‘ते राहिलेलं’ काय असू शकेल ते लक्षात आलं. त्यातील हा भाग महत्त्वाचा वाटला -- ‘... कुठच्याही बाह्य हस्तक्षेपाचा मला राग येतो. माझी तशी विशिष्ट मानसिकता घडली आहे. प्रत्येक गोष्ट स्वत:च शोधून काढावी, असे मला नेहमीच वाटायचे.’


त्याचप्रमाणे, तिच्या लेखातील (जानेवारी-फेब्रुवारी १९३७च्या `Indiam Ladie's Magazine', खंड १० मधल्या क्र.१च्या अंक) तिला स्वत:विषयी काय वाटते हे सांगणारा भागही -- ‘... पोहण्याची, होड्या वल्हवण्याची व घोडदौड करण्याची मला आवड असली तरी घराबाहेर असण्यापेक्षा घरात राहायला मला फार आवडते. पण अर्थातच माझा खरा पेशा चित्रे काढण्याचा, रंगवण्याचा आहे. माझ्या जीवनात मी झपाटले आहे आणि माझ्या कलात्म आदर्शांशी मी प्रामाणिक राहणे हे माझे लक्ष्य आहे.’ फक्त २८ वर्षांच्या अल्पायुष्यातल्या तिच्या अफाट कामाचं रहस्यच जणू ह्यात दडलेलं आहे असं वाटलं.


तिच्या पत्रांमधून तिच्या ‘स्वत्वाशी आणि तिच्याशी ‘थेट भेट’ घडते. तरीही, ‘स्वत:शी असलेली परिपूर्ण ओळख आणि तिचा सुयोग्य रितीने केलेला पाठपुरावा’ हेदेखील नाट्यातून अधोरेखित होणं गरजेचं वाटलं.


कोणत्याही कलावंताचं आयुष्य, कितीही कमी कालावधीचं असेना का, ते ना पुस्तकांच्या पानांमध्ये मावत, ना सिनेमा-नाटकाच्या चौकटीत! पण, अशा प्रयोगांमुळे रसिक प्रेक्षकाच्या मनातलं त्या कलावंताचं, त्याच्या कलेबद्दलचं, त्या कलेला केलेल्या समर्पणाविषयीचं कुतुहल जागं होतं आणि जगण्यात समृध्द भर घातली जाते.

चित्रा राजेंद्र जोशी  

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...