Enquire Now

Request A Quote

भोला पागला
जेजेमधलं शिक्षण संपताच प्रतीक जाधव सायकलवरून भारत प्रवासाला निघाला. खिशात नाही कवडी पण जिद्द मात्र दांडगी. मित्रमंडळींना कळताच कुणी काय दिलं तर कुणी काय दिलं.  कुणीतरी सायकलसुद्धा दिली. आणि मग निघाला की हा बिनधास्त प्रवासाला. या प्रवासाचा त्याचा हेतू होता. भारताच्या कानाकोपऱ्यात फिरून लोककलांची नोंद करणं, अभ्यास करणं. पहाणी करणं वगैरे. आता जवळजवळ सहा महिने झाले त्याच्या प्रवासाला. काल रात्री त्याचा फोन आला, तेव्हा म्हणाला, सध्या बंगालमध्ये आहे, इथून आसामला जाईन. 'किती महिने चालेल हे ?' तर म्हणाला आणखी निदान वर्षभर तरी. विचारलं 'काही वाईट अनुभव ?' तर म्हणाला एकही नाही. म्हटलं लिहितोस का ? तर म्हणाला रोज डायरी लिहितो आणि डायरीतच चित्रं काढतो. शिवाय फोटोग्राफी, ध्वनीमुद्रण चालूच आहे. जाताना त्याला म्हटलं होत लिहावंसं वाटेल तेव्हा 'चिन्ह'च्या वेबसाईटवर लिही. आम्हीच जाणीवपूर्वक त्याला लिहिण्याचा आग्रह केला नव्हता. कारण तो प्रवास करणार का लिहिणार ? आता इतक्या दिवसाने त्याने जो लेख पाठवलाय तोच हा. 

हो !!  तो भोला 'पागला'च जगासाठी.....माझ्यासाठी तो चित्रात पागल असंच म्हणेल मी ...बंगाली भाषेत पागलला 'पागला' म्हणतात.....
भोला पागला

त्याचं नाव काय? गाव काय ? कोणाला काहीच माहीत नाही. कधीतरी सिलिगुडीच्या एखाद्या गल्लीत तो दिसतो.नेहमीच काहीतरी खरडत असतो कागदावर. कधी कधी लहान मुलं दगडं घेऊन मागे लागलेली असतात.किंवा शहाणेसुद्धा त्याला धुडकावून लावताना दिसतात. तो काहीच बोलत नाही. कोणीही त्याचा एक शब्दसुद्धा ऐकलेला नाही. लोक त्याला 'भोला पागला' म्हणतात.

         माझ्या या सायकल प्रवासात मी सहा महिन्यानंतर  पश्चिम बंगाल च्या सिलिगुडी शहरात येऊन पोहोचलोय. इथे एक कलाप्रेमी परिवार योगायोगानं भेटला आणि या चक्रवर्ती परिवाराने मला त्यांच्या घरी अगदी प्रेमानं रहायला दिलं. सायन चक्रवर्ती यांचं पूर्ण घर कलाकृतीनी भरलेलं आहे. जणू एखादं संग्रहालयच आहे.

         एकदा बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "आमच्याकडे एक माणूस नेहमी आमच्या पत्रपेटीत काही चित्रं आणि लॉटरीची तिकिटं टाकून जातो.  तो कधीही भेटत किंवा बोलत नाही. एकदा नेमकं तो पत्रपेटीत काही टाकताना मी बाहेर येऊन पाहिलं आणि त्याला विचारले की काय करतोयस रे? तर तो भल्या रागाने पाहून निघून गेला.

         हा भोला पागला काय करतो तर , कचऱ्यात मिळतील ती खोक्याचे पुठ्ठे उचलून त्यावर अमूर्त आकार रेखाटत बसतो. त्याचं रंग मध्यम म्हणजे फक्त पेन किंवा पेन्सिल. अर्थात त्याला सहज हेच मिळू शकतं. बाह्य जगाशी त्याचा एकच संवाद होतो . तो म्हणजे पेनाची कांडी संपली की तो दिसेल त्याला लिहिण्याची कृती करून दाखवतो. बोलत नाही. ज्याला कळालं ते पेन देतात नाहीतर हुसकावून लावतात. एक चहावाला त्याला रोज चहा पाजतो, पण तो चहावालाही काही माहिती सांगू शकला नाही. 

         भोला पागला काढलेल्या चित्रांचं करतो काय?
         तर हा काढलेल्या चित्राला लोकांच्या घरासमोर असलेल्या पत्रपेटीत गुपचूप जाऊन टाकतो. सोबत काही लॉटरीची तिकिटं असतात. आता ज्यांना ती चित्रं वाटली त्यांनी कदाचित ती ठेवली असतील. पण इतरांनी नक्कीच कचरा समजून फेकून दिली असणार. पण सायन दादाने सर्व चित्र जपून ठेवली आहेत. माझ्यासमोर त्याने या चित्राने भरलेली एक पिशवी रिकामी केली. वेगवेगळ्या आकाराच्या पुठठ्यावर ही चित्रं होती. या वेगवेगळ्या पुठ्ठ्यामुळे त्यांना वेगळंच दृश्यसौंदर्य लाभलं होतं. आणि त्यावर पेनाने एक एक रेष मारून बनवलेले अमूर्त आकार. ते पाहून मी भारावून गेलो होतो. या भोला पागलाचं विश्वच किती वेगळं आहे. या जगाची भाषा कदाचित त्याला कळत नसावी आणि जगाला त्याची ही चित्रभाषा कळत नसणार. म्हणूनच तर ते त्याला पागल म्हणतात. या सगळ्या चित्रांनी मला फार अस्वस्थ केलंय. या चित्रांचं मनोवैज्ञानिक विश्लेषण केलं तर काय काय असेल ? बापरे! 

      पेनाचं टोक किती लहान आणि हा एक एक रेष संयमाने मारून आकार निर्माण करतो. आणि विशेष म्हणजे या मोठ्या आकाराच्यामधे छोटे छोटे रिक्त आकार असतात. त्यात कुठेही पेनाची रेष इकडे तिकडे झालेली दिसत नाही. याचं चित्रप्रेम जगावेगळं आहे. एकट्या सायन दादा कडे एवढी चित्र त्याने टाकली आहेत तर शहरात इतर लोकांकडे किती असतील तोच जाने. 

      तो चित्र लोकांच्या पत्रपेटीत का टाकत असावा? मला वाटतं तो स्वतः रस्त्यावर राहतो पण त्याला वाटत असावं की त्याची चित्र तरी घरात राहावीत म्हणून तो लोकांना देत असेन काय?

      हे सगळं भारावून टाकणारं आहे. सायन दादा सोबत जाऊन गल्ल्या गल्ल्या फिरून अखेर त्याचा शोध घेतला. तेव्हाही तो त्याचा कागद पेन घेऊन मग्न होता. अवतीभोवती काही गाठोडी होती. आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण उत्तर काहीच नाही. मलाही त्याची ही चित्रसमाधी तोडणं योग्य वाटेना, म्हणून परत निघून आलोत. सायनदाला विनंती करून त्याची काही चित्रं मी घेतली आहेत. लोकांसाठी भलेही तो पागल असेल पण मी त्याच्याकडून पुढे सतत काम करत राहण्याची मोठी प्रेरणा घेऊन  निघालो आहे. आता पूर्वोत्तर  राज्यांच्या दिशेने रवाना होत आहे.


काही तांत्रिक अडचणीमुळे 'भोला पागला' याची चित्रं आम्हाला प्रकाशित करता येत नाहीत. जिज्ञासूंनी ती चित्रं 'चिन्ह'च्या https://www.facebook.com/chinha.art/   या फेसबुक पेजवर पहावीत. 

प्रतिकच्या प्रवासाला  अगदी सुरवातीपासून 'चिन्ह'ने प्रसिद्धी दिली होती. ते लेख मोठ्या प्रमाणावर वाचले गेले. एका लेखाला तर एक लाखापेक्षा अधिक हिट्स मिळाल्या होत्या. हे लेख वाचून अनेकांनी त्याला वस्तूंची किंवा आर्थिक मदत देखील देऊ केली होती. हे सर्व लेख 'चिन्ह'च्या संकेतस्थळावर वाचावयास मिळतील. http://www.chinha.co.in/user-story.aspx हे सर्व लिखाण वाचून जर कुणाला प्रतिकशी संपर्क साधायचा असेल तर त्याचा नंबर आहे. ८९२८६ ८२३३० फक्त त्याला फोन दिवसा करू नये, कारण तो प्रवासात सायकलवर असतो. त्याच्याशी संपर्क साधण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्याला व्हाट्सअपवर मेसेज करणं. 

संपादक 

प्रतीक जाधव

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...