Enquire Now

Request A Quote

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

'चिन्ह'च्या चित्रकलाविषयक दोन वॉट्सअप ग्रुप खेरीज आणखीनही एक ग्रुप आहे. तो म्हणजे ज्यांना संगीताची विशेषतः शास्त्रीय संगीताची आवड आहे अशांचा. त्यातही बहुसंख्य चित्रकाराच आहेत. त्या ग्रुपवर आज चित्रकार आणि गायक सुनील बोरगांवकर यांनी उ अमीर खॉ साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्तानं एक अप्रतिम लेख लिहिला आहे. अमीर खॉ साहेबांच्या गायिकीची सारीच वैशिष्ट्य त्यांनी अतिशय बारकाईनं शब्दांकित केली आहे. तो लेख आर्ट न्यूजवर द्यायचा मोह आवरत नाही. याच लेखासोबत त्यांनी फिल्म्स डिव्हिजनने अमीर खॉ साहेबांवर केलेली फिल्म देखील शेअर केली आहे. ती केवळ अप्रतिम आहे. त्या फिल्मच्या चित्रचौकटी आणि वापरलेल्या बंदिशी अक्षरशः स्मरणात रुतून बसतात. आपण ही याचा अनुभव अवश्य घ्या ! 

"पिया के आवन..."

( दि.१३ फेब्रुवारीला पद्मभूषण उस्ताद अमीर खाँसाहेबांची पुण्यतिथी होती ! त्या निमित्ताने...! )

भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात खूप महत्त्वाचं, मोलाचं योगदान दिलं अशा काही मोजक्या कलावंतांमध्ये खूप मोठं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे उस्ताद अमीर खाँसाहेब ! 
आज त्यांची ४६ वी पुण्यतिथी! दि.१३ फेब्रुवारी १९७४ रोजी एका मोटार अपघातामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
उ. अमीर खाँसाहेबांचं वेगळेपण म्हणजे अतिशय सुंदर स्वराकृतींनी ओतप्रोत भरलेले सौंदर्यपूर्ण, विद्वत्तापूर्ण, अती‌ विलंबित लयीतलं खयाल गायन आणि त्यामधे रागाची केलेली अप्रतिम, बांधीव मांडणी व बढत ! 
मेरूखंड पद्धतीचा सुरेख वापर, गायकी अंगाने केलेला सरगमचा प्रभावी वापर, खटका, मुरकी, मींड चा सौंदर्यपूर्ण वापर ! तीन सप्तकात लिलया फिरणाऱ्या अतिशय वेगवान सपाट ताना, अतिशय कठीण  पण तितक्याच सहजपणे स्वच्छ सुस्पष्टपणे गायलेल्या अनवट ताना, छूट पद्धतीच्या ताना ! 
खाँसाहेबांनी खयाल गायनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय ! त्यांच्या गायकीत एक काव्यात्मकता होती. (त्याला ते गायकाचा 'पोएटीक सेन्स' असं म्हणायचे.) 
खाँसाहेबांचं गाणं ऐकताना प्रकर्षानं जाणवतो तो  म्हणजे त्यांच्या गाण्यातला ठहराव ! विलक्षण परिणामकारक... विरघळवून टाकणारी शांतता ! 
खाँसाहेबांनी साथीला हार्मोनियम किंवा सारंगी क्वचितच घेतली. 
त्यांच्या विलक्षण गायकी सोबत साथसंगत करणं हे खरंतर महाकठीणच होतं !  

त्यांच्या साथीला असायचा फक्त षड्ज पंचम निषादाचा सहा तारांचा तानपुरा... आणि ही ध्यानस्थ शांतता !

त्यांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच असलेला त्यांचा अतिशय धीरगंभीर, ध्यानस्थ, भारदस्त, वजनदार पण हृदयस्पर्शी पोत असलेला, अंतर्मुख करणारा आवाज रसिक श्रोत्याला खोलवर, आतमध्ये कुठेतरी घेऊन जातो ! शांत, ध्यानस्थ योग्याप्रमाणे बसून कुठलीही अवाजवी हालचल, हातवारे न करता, अगदी शुद्ध मुद्रेने , आवाजाच्या अगदी सहज लगावाने ते अतिशय मुश्किल गायकी अगदी सहजपणे गात असत !
त्यांचं मालकंस रागातलं खर्जातलं काम ऐकलं की असं वाटतं आपण अज्ञात, थंड अंधारात खोलवर कुठेतरी उतरत चाललोय! थोर संगीतज्ञ मानतात की खाॅंसाहेबांसारखा 'मारवा' नंतर कोणी गायलाच नाही. त्यांचा दरबारी कानडा, मिया मल्हार, ललत, चारुकेशी, तोंडी, बसंत मुखारी, कोमल रिषभ आसावरी, नंद, अजिबात सरगम चा वापर न करता गायलेला शुद्ध आलापीयुक्त  'राग शुद्ध कल्याण' ... असे कितीतरी राग... त्याबद्दल लिहावं तेवढं थोडंच ! 

एखाद्या सिद्धीप्राप्त, तेजस्वी तपस्वी ऋषीने मांडलेल्या प्रत्येक विचाराचं ब्रह्मवाक्य व्हावं , तसा खाँसाहेबांनी गायलेला प्रत्येक राग आहे !
त्यांचं तराणा गायन आणि त्यावर त्यांनी केलेला सखोल अभ्यास, आणि अनेक रागांमध्ये "सुर रंग" या नावाने बांधलेल्या अतिशय सौंदर्यपूर्ण बंदिशी, हेही त्यांचं महत्त्वाचे योगदान ! 
त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण गायकीला त्यांनी "इंदूर घराणं" असे नाव दिले.  

खाँसाहेबांच्या शुद्ध , सौंदर्य युक्त सांगीतिक विचाराने, अद्भुत गायकीने प्रभावित झालेल्या अनेक गायक-वादकांमध्ये पं.भीमसेन जोशी, सारंगी वादक उस्ताद सुलतान खान, सतारवादक उस्ताद विलायत खाँसाहेब आणि पं. निखिल बॅनर्जी, पं. हृदयनाथ मंगेशकर ( हृदयनाथ हे खाँसाहेबांचे पट्टशिष्य), डॉ.प्रभा अत्रे, पं. पन्नालाल घोष, उ. रशीद खान‌ अशी कितीतरी नावं घेता येतील.

खाँसाहेबांनी प्रसिद्धीसाठी किंवा लोक रंजनासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी कधीही सांगीतिक कसरती केल्या नाहीत आणि ठुमरी, दादरा, भजन, अभंग, गझल या उपशास्त्रीय संगीत प्रकारांचा आधार ही घेतला नाही. 
मैफिलीमध्ये एक राग गाऊन झाला की मंत्रमुग्ध झालेले रसिक भानावर येण्यापूर्वीच आणि त्यांच्या टाळ्या सुरू होण्याआधीच खाँसाहेब दुसऱ्या रागामध्ये लिलया प्रवेश करायचे. ते खरंतर ठुमरी-गझल अतिशय उत्तम प्रकारे गात असत, पण त्यांनी मैफिलीमध्ये कधीही ठुमरी, गझल, भजन वगैरे गाणं कटाक्षानं टाळलं..  
खाँसाहेब म्हणायचे की "हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा प्रचार - प्रसार करणं हे माझं काम आहे." यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
त्यांनी चित्रपटांसाठी गायलेली गाणी म्हणजे सुद्धा रागदारी बंदिशीच आहेत. 

त्यांनी फक्त एकदा विश्वविख्यात सरोद वादक उस्ताद अली अकबर खांसाहेब यांनी संगीत दिलेल्या "क्षुधीत पाषाण" या बंगाली चित्रपटासाठी मिश्र खमाज रागातील "पिया के आवन की" ही ठुमरी गायली. त्यांनी रेकॉर्ड केलेली ही एकमेव ठुमरी ! (त्याची युट्युब लिंक खाली देत आहे.) 

खाँसाहेबांचा...हुरहुर लावणारा 'मारवा' मनात रुंजी घालू लागला की आत कुठे तरी संध्याकाळ होऊ लागते.   
काळ्याभोर मखमली अंधारावर चंद्र चांदण्याचा सडा टाकणारा त्यांचा मालकंस ...!
त्यांचा कोमल रिषभ आसावरी भर रात्री ऐकला तरी प्रकाशमान झाल्यासारखं वाटतं. 

ऋषितुल्य उस्ताद अमीर खाँसाहेबांना  माझी आदरांजली !


( फिल्म पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=-Ew7U684X9Q&feature=youtu.be  )
सुनील विनायक बोरगांवकर.

Top Features

 

Feature 1

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

अधिक वाचा

Feature 2

आता नाही तर कधीच नाही!

अधिक वाचा

Feature 3

आठवणीतले केकी मूस !

अधिक वाचा

Feature 4

तिने चौकट ती मोडली !

अधिक वाचा

Feature 5

काळाच्या निकषावर...

अधिक वाचा
12345678910...