Enquire Now

Request A Quote

बसोली : शैली नव्हे चळवळ !

सत्तरच्या दशकात जेव्हा जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये फाईन आर्टला प्रवेश घेतला तेव्हा एक तरुण शिक्षक आम्हाला कलेचा इतिहास शिकवायला आले. नाव 'चंद्रकांत चन्ने'. वर्ण काळा सावळा, लांब लांब दाढी मिशा, अस्ताव्यस्त केस आणि नेहमीच त्यावेळच्या फॅशननुसार पॅन्टवर खादीचा झब्बा घालणारे चन्ने सर प्रथमदर्शनीच आवडून गेले. तोंडातल्या तोंडात बोलत पण जे बोलत ते प्रभावी असे. आमच्यासारखेच आमच्यासोबत ते हिरवळीवर किंवा लाल कट्ट्यावर वगैरे बसत, चहा पाजत, गप्पा मारत. त्यांचं शिकवणं आम्हा विद्यार्थ्यांना आवडलंच होतं. 


अचानक काय झालं कुणास ठाऊक एके दिवशी ते जेजेच्या आवारातून दिसेनासेच झाले. कुठे गेले काहीच कळलं नाही. कशामुळे गेले तेही कळलंच नाही. गेले होते एवढं मात्र नक्की. सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय वाईट वाटलं. त्यांच्या जाण्याबद्दल कुणी काय सांगायचं,  कुणी काय. एके दिवशी बातमी आली की सर आले होते तेथेच म्हणजे नागपूरला गेले. आम्ही त्यांना विसरून देखील गेलो. 

एके दिवशी नागपूरच्या वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी एक लेख आलेला वाचला. चन्ने सरांनी नागपूरमध्ये लहान मुलांसाठी  बसोली ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला असून त्यातच ते आता व्यस्त असतात वगैरे. आधी काही कळलंच नाही. बसोली हे नाव देखील ओळखीचं वाटलं पण कुठल्यातरी चित्रशैलीशी ते संबंधित असावं असंही वाटून गेलं. पण त्या लेखात चन्ने सरांच्या या अभिनव उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तो लेख वाचून खूपच आनंद झाला. त्यांना फोन केला, एकदा दिल्लीत देखील आम्ही भेटलो, खूप गप्पा मारल्या. त्यानंतर मात्र मी त्यांचा ट्रॅक ठेवू लागलो.


चन्ने सरांनी नंतर प्रामुख्यानं नागपूर हेच आपलं कार्यक्षेत्र केलं. दिवसा विद्यार्थ्यांना शिकवणं, रात्री आपलं पेंटिंग आणि मिळेल तो वेळ बसोलीसाठी देणं हेच त्यांनी आपलं ध्येय मानलं. शालेय विद्यार्थ्यांना चित्रकलेची गोडी लावण्यात चन्ने सरांचा मोठा वाटा आहे. १९७५ पासून आजतागायत त्यांचं हे काम सातत्यानं चालूच आहे. आणखीन चार वर्षानं या बसोलीची पन्नाशी किंवा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होईल. तब्बल पन्नास वर्ष असं कार्य करणं अतिशय अवघड आहे. पण चन्ने सरांनी ते सोपं करून दाखवलं आहे. नुसतीच चित्रकला नाही तर साऱ्याच कलांबाबत चन्ने सरांनी अत्यंत नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. साहित्य, चित्रपट, संगीत, विज्ञान अशी कुठलीच क्षेत्र त्यांनी त्याज्य मानलेली नाहीत. यातल्या प्रत्येकातून काहीतरी घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या तब्बल ४५ पिढ्या घडवल्या आहेत. त्यांच्या हाताखालून गेलेल्या आणि आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या बसोलीच्या विद्यार्थ्यांनी चन्ने सरांचं हे ऋण अत्यंत मोकळेपणानं मान्य केलं आहे. चन्ने सरांमुळे आम्ही घडलो, बसोलीनं आम्हाला घडवलं हे ही सारी मंडळी अत्यंत ठासूनपणे सांगतात. 


चन्ने सरांसमोर असंख्य अडचणी आल्या, अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. पण ते खचले नाहीत, डगमगले नाहीत. स्वीकारलेलं काम अत्यंत मूकपणे, प्रामाणिकपणे करत राहिले. यातून त्यांना काही आर्थिक फायदा झाला असेल असं त्यांचे टीकाकार देखील म्हणू धजणार नाहीत. तब्बल ४५ वर्ष चालू असलेल्या या ज्ञानयज्ञ चळवळीविषयी जाणून घेण्यासाठी 'चिन्ह'नं त्यांना 'गच्चीवरील गप्पा' या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केलं आहे. शनिवार दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता या गप्पा होणार आहेत. चुकवू नका. 


सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...