Enquire Now

Request A Quote

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

''गच्चीवरील गप्पां''मध्ये आपण आजपर्यंत अनेक चित्रकारांशी किंवा शिल्पकारांशी गप्पागोष्टी केल्या. एकदा तर असं झालं की, गप्पांच्या केंद्रस्थानी एखादा चित्रकार किंवा शिल्पकार होता पण त्यावर बोलणारा मात्र, एखादा लेखक किंवा अन्य क्षेत्रातली व्यक्ती होती. पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे चित्रकार,शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या वरचा कार्यक्रम. बाकरे यांच्या वरच्या अप्रकाशित पुस्तकाच्या निमित्तानं नामवंत कादंबरीकार अनंत सामंत हेच या गप्पांमध्ये सहभागी झाले होते. पण असे एक दोनच अपवाद वगळता या ''गच्चीवरील गप्पां''मध्ये बहुसंख्य कलाकार मंडळीच सहभागी झाली होती. 

५० कार्यक्रम पूर्ण झाल्यावर,आता मात्र या कार्यक्रमाच्या स्वरूपात आम्ही थोडासा बदल करणार आहोत. उदाहरणार्थ या कार्यक्रमात आम्ही दृश्य कलावंतांसोबतच दृश्य कलावंत नसलेल्या पण तरी देखील दृश्यकलेशी संबंध असलेल्या व्यक्तींना देखील निमंत्रित करणार आहोत. उदा. एखाद्या पुस्तकाच्या निमित्ताने, एखाद्या कलावंताच्या निमित्ताने, एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने, आम्ही कलेशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींना देखील गप्पांसाठी निमंत्रित करणार आहोत. 

उदाहरणार्थ येत्या शनिवारी आपण भेटणार आहोत अनिल किसन दुधाने यांना. हे दुधाने मूळचे तालुका महाबळेश्वर, जिल्हा साताऱ्याचे. पण सध्या त्यांचं वास्तव्य आहे चिंचवड, काळेवाडी फाटा, थेरगाव, पुणे इथे. ''ईना बेरिंग इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, तळेगाव'' या कंपनीत गेली वीस वर्ष ते नोकरी करत आहेत. ही झाली त्यांची तोंडओळख पण त्यांचं खरं कार्यक्षेत्र हे अगदी वेगळंच आहे. ते शेतीत काम करतात. माती विरहित शेती तंत्रज्ञानात स्ट्रॉबेरी पिकासाठी २०१४-१९ या कालखंडात त्यांच्या स्ट्रॉबेरी पिकाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात कृषी किमयागार, समृद्ध किसान, सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार, फिनोलेक्स कृषी पुरस्कार यांचा समावेश आहे. २०१९ साली तर त्यांना शेती व इतिहासासाठी ''सातारा भूषण'' हा पुरस्कार मिळाला होता. 

याही पेक्षा त्यांचं अचाट कार्य म्हणजे महाराष्ट्रातल्या २५० तर महाराष्ट्राबाहेरील राजस्थान,  कर्नाटक, मध्यप्रदेश इत्यादी राज्यातल्या १८० किल्ल्यांना त्यांनी आजवर भेट दिली आहे. केवळ प्रवासाच्या उद्देशानं त्यांनी हे कार्य आरंभिले नाही. तर या प्रचंड भटकंतीत त्यांनी भारतातील गड-किल्ले, मंदिरे, वाडे, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, ज्ञात- अज्ञात व्यक्तींच्या समाध्या, स्मारकं आणि वीरगळ तसेच सतीशिळा यांची एक लाखापेक्षा अधिक छायाचित्रे टिपली आहेत. 

वीरगळ हे प्रामुख्याने युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूरवीराच्या स्मरणार्थ उभे केले जातात. तर सतीशिळा हे त्या वीराच्या चितेत उडी घेतलेल्या सतीच्या स्मरणार्थ. या विषयाचं ऐतिहासिक महत्व जाणून त्यांनी या वीरगळ आणि सतीशिळांचं दस्तावेजीकरण केलं आहे. या दस्तावेजीकरणाची संपूर्ण माहिती देणारं ''इतिहासाचे मूक साक्षीदार, वीरगळ आणि सतीशिळा'' या शीर्षकाचं अप्रतिम पुस्तक लिहून प्रकाशित केलं आहे. एक प्रकारे हा शिल्पकलेतून उलगडलेला इतिहासच आहे. म्हणूनच त्यांच्या या अचाट उपक्रमाची माहिती करून घेण्यासाठीच येत्या शनिवारच्या गप्पांमध्ये ''चिन्ह''नं त्यांना आमंत्रित केलं आहे. ''चिन्ह''चे संपादक सतीश नाईक त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. 
हा कार्यक्रम ऐकायला आणि पाहायला विसरू नका. 

शनिवार दि. २५/९/२०२१
सायं. ५:३० वाजता 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...