चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ''''बिटवीन द लाईन्स'''' हे हंस, मौज, लोकमत, किस्त्रीम आणि रविवार सकाळमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या सुमारे १७ लेखांचं पुस्तक राजहंस प्रकाशनानं जुलै २०२० मध्ये मोठ्या दिमाखात प्रकाशित केलं आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची रंगरेषांइतकीच शब्दांवर देखील प्रचंड पकड आहे. हे त्यांच्या या लेखांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. फेसबुकवर असलेल्या साऱ्यांनाच आता कुलकर्णी काय नवे लिहिणार आहेत याची रोजच उत्सुकता असते इतकं त्यांचं लेखन प्रभावी आहे.
पत्रकार संपादिका अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेले मलपृष्ठावरील ब्लर्ब या पुस्तकाविषयीची उत्सुकता निश्चितपणे वाढवते. या तब्बल २४० पानांच्या पुस्तकात कुलकर्णी यांना ज्यांचा ज्यांचा सहवास लाभला त्या त्या दिग्गजांविषयी अतिशय मनापासून लिहिलेलं आहे. ज्यात कवी ग्रेस पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंतच्या दिग्गजांचा समावेश आहे. ज्यांना चित्रकला किंवा चित्रकारांविषयी वाचायला आवडतं अशांनाच नाही तर चित्रकलेविषयी फारशी माहिती नसलेल्या सर्वसामान्यांना देखील या पुस्तकातलं कुलकर्णी यांचं लिखाण पुस्तक संपेपर्यंत बांधून ठेवील यात कुठलीही शंका नाही.
बिटवीन द लाईन्स
किंमत रु. ३००