स्त्रिया आज जरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन जगत असल्या तरी देखील ‘पुरुष प्रधान संस्कृती’मध्ये समाजातील ही कीड काही कमी होताना दिसत नाही. काही पुरुषांना स्त्री हा चेष्टेचा विषय वाटतो. स्त्री दिसली रे दिसली की विचित्र नजरेनं पहाणं, अश्लील बोलणं किंवा हावभाव करणं, तिच्या मागे अफवा उठवणं हा काही पुरुषांचा छंद असतो. चित्रकला या माध्यमाचा वापर करून हीच पुरुषी वृत्ती नष्ट व्हावी यासाठी पुण्यातील चित्रकार सचिन निंबाळकर यांनी आपल्या चित्रात प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाला टागोर नॅशनल एक्झिबिशन ऑफ पेंटिंग या स्पर्धेत ५० हजार रुपयांचं पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह मिळालं आहे. हा समारंभ येत्या फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशात होणार आहे.